रत्नागिरी : कोकणातील पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी आणि स्थानिकांना रोजगाराची नवी संधी देण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर कोकणात किनाराकुटी म्हणजेच बीच शॅक्सना मंजुरी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (२५ जून) घेण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोकणातील पत्रकारांसाठी आज घेतलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
श्री. सामंत म्हणाले, सुरुवातीच्या टप्प्यात मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी प्रत्येकी दोन किनाऱ्यांवर शॅक्सना परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, हा त्यातील प्रमुख हेतू आहे. त्यामुळे गोव्याच्या धर्तीवर पण गोव्यापेक्षा अधिक चांगल्या स्वरूपात शॅक्स सुरू करण्यात येतील. पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात आरे-वारे आणि गुहागर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली आणि कुणकेश्वर, रायगडमध्ये दिवेआगार आणि वरसोली, तर पालघरमध्ये केळवा, बोर्डी याठिकाणी ही शॅक्स चालविता येतील. त्यासाठी पूर्णतः स्थानिकांचा विचार करण्यात आला आहे. तेथे काम करणारे ८० टक्क्यांहून अधिक लोक स्थानिक असावेत, अशी अट आहे. परदेशातून नोकरीसाठी आलेले किंवा नोकरीचा व्हिसा असलेल्यांना तेथे काम करता येणार नाही. स्थानिकांना हे शॅक्स चालविण्यासाठी तीन वर्षांकरिता दिले जातील. तेथे कुक म्हणून इतरांना काम करता येईल. स्वतःही काम करता येईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
दर वर्षी एक सप्टेंबर ते ३१ मेपर्यंत दररोज सकाली सात ते सायंकाळी सात या वेळेत शॅक्स चालविता येतील. तेथे कायमस्वरूपी बांधकाम करता येणार नाही. केळी, नारळ, पोफळींपासून बनविलेल्या डिश, पत्रावळी, द्रोण अशा स्थानिक वस्तूंचा वापर तेथे करावा, जेणेकरून तशा वस्तू बनविणाऱ्या लघुउद्योगांना ऊर्जितावस्था प्राप्त होईल. झोपडीचा आकार पंधरा चौरस फूट असावा. त्यापुढे वीस फूट बाय बारा फूट एवढी जागा ग्राहकांकरिता आरामखुर्च्या, छत्री ठेवून बाके लावण्यासाठी वापरता येईल. तीन वर्षांच्या करारावर जागा दिली जाईल. त्याचे एकत्रित भाडे ४५ हजार रुपये असेल. तसेच ३० हजार रुपये अनामत घेतली जाईल. त्याकरिता जिल्हा बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज मिळवून देण्यासाठी चर्चा केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री. सामंत म्हणाले, की सध्या शासकीय जमिनीवरील या झोपड्या उभारायला परवानगी दिली जाणार असून खासगी जमीनमालकही त्यासाठी अर्ज करू शकतील. शॅक्समध्ये चहा, कॉफी मिळेल. थंड पेयांसाठी फ्रिज ठेवता येईल. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घेऊन सौम्य बीअर किंवा वाइन विक्रीला परवानगी मिळेल. दारूची विक्री करता येणार नाही. पर्यटकांची मानसिकता लक्षात घेऊन सायंकाळची वेळ रात्री १० वाजेपर्यंत वाढविण्याची परवानगी देण्याबाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्याबाबत कार्यवाही होऊ शकेल, असे श्री. सामंत यांनी सांगितले.
दूरवरून वाचता येईल, असा मोठा दरफलक लावावा लागेल. प्रत्येक शॅकवर सीसीटीव्हीची सुविधा असेल. किनाऱ्यावरील खारफुटी, वाळूचे ढिगारे यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी शॅक्सचालकांनी घ्यायची आहे. सध्या आठ बीचवर परवानगी देण्यात आली आहे. नंतर समुद्रकिनाऱ्यावरच्या सर्व तालुक्यांचा समावेश या योजनेत केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
अन्य माहिती
या संदर्भातील अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून, पुढील वर्षीपासून इतर चौपाट्यांवरदेखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येईल. एका चौपाटीवर कमाल १० कुट्या उभारता येतील. स्थानिकांना ते उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.
तसेच निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींसाठी ८० टक्के जागा राखीव असतील. या कुट्यांचे तीन वर्षाकरिता वाटप करण्यात येईल. त्यांचा आकार १५ फूट लांब आणि १५ फूट रुंद आणि १२ फूट उंच असा असेल. गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी २० फूट लांब आणि १५ फूट रुंद छत टाकता येईल. कुटी मिळणाऱ्या व्यक्तीकरिता परवान्यासाठी १५ हजार रुपये अर्जाचे नापरतावा मूल्य असेल. तसेच या कुटीसाठी पहिल्या वर्षी ४५ हजार, दुसऱ्या वर्षी ५० हजार, तिसऱ्या वर्षी ५५ हजार वार्षिक शुल्क राहील. याशिवाय ३० हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल, जी तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल. चौपाटी कुटी चालविण्यासंदर्भात पर्यटन विभागाने विविध नियम घालून दिले आहेत.
ही चौपाटी कुटी सकाळी सात ते सायंकाळी सात अशा वेळेत सुरू ठेवता येईल. तसेच संगीताचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरादेखील असेल.
…….