रत्नागिरी : करोनाच्या पार्श्वभूमीवर सतत कार्यरत असणाऱ्या आशा वर्करचे मानधन एक हजार रुपयांवरून दुप्पट करून दोन हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या (२५ जून) बैठकीत घेण्यात आला. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
श्री. सामंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील कोकणाशी संबंधित निर्णयांची माहिती रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पत्रकारांना ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, तेव्हाच आशा वर्करचे मानधन वाढविण्याचा प्रस्ताव होता. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय झाला आहे.
शंभर टक्के अनुदान देणारी रोजगार हमीतून फळबाग लागवडीची सध्या बंद असलेली योजना कोकणासाठी पुनरुज्जीवित करण्यात आली आहे. निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना उपयुक्त ठरावी, यासाठी या योजनेचे कोकणासाठी पुनरुज्जीवन केले आहे, असे श्री. सामंत म्हणाले. ही योजना ज्यांनी १९९२ साली सुरू केली, ते तत्कालीन मुख्यमंत्री, माजी संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा केला होता. त्यांनी तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही योजना पुन्हा सुरू करायला हिरवा कंदील दाखविला आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या शाळांची पडझड आणि नुकसान झाले आहे, त्यांच्या दुरुस्तीचा २४ कोटी रुपयांचा आराखडा देण्यात आला आहे. तो मंजूर होईल, असे सांगून श्री. सामंत म्हणाले, की विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाप्रमाणेच कोकण विकास महामंडळ सुरू व्हावे, अशी मागणी रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब आणि सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र दिले आहे.
बांधकाम कामगारांची नोंदणी कामगार कल्याण मंडळामार्फत केली जाते. त्यांना योग्य त्या सुविधा दिल्या जातात. करोनाच्या पार्श्वभूमीवर नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. तुलनेने रत्नागिरी जिल्हा मोठा असूनही जिल्ह्यात केवळ साडेसहा हजार कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी येत्या एक ते दीड महिन्यात रत्नागिरीतील अधिकाधिक बांधकाम कामगार नोंदणी होण्यासाठी अभियान म्हणून काम केले जाईल, असे श्री. सामंत यांनी सांगितले. तसे आदेश कामगार कल्याण मंडळाला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
…….