कुडाळ : अत्यंत अभूतपूर्व परिस्थिती उद्भभवल्यामुळे यंदा प्रथमच वारीच्या परंपरेत खंड पडला आहे. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांच्या मनाला हुरहुर लागून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर, सिंधुदुर्गातील कलाकारांनी एकत्र येऊन ‘वारी’ नावाचा लघुपट तयार केला आहे. ‘विद्यम् आर्टस्’तर्फे तयार करण्यात आलेला हा लघुपट आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर यू-ट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. एक वारकरी या लॉकडाउनमध्ये विठ्ठलाच्या ओढीने वारीला जायला निघतो; पण या प्रवासात त्याला कोणते अनुभव येतात, त्याचे चित्रण या लघुपटात करण्यात आले आहे. करोनाशी संबंधित सुरक्षिततेचे सर्व निकष पाळून हा लघुपट तयार करण्यात आला आहे.
वारी म्हणजे विठ्ठल नामाचा गजर, असंख्य जनसमुदाय, संतांच्या ओव्या आणि मुख्य म्हणजे भेटीचा सोहळा. विठुरायाच्या आषाढी एकादशी वारीला एक विशिष्ट महत्त्व आहे. सातशे ते आठशे वर्षांपासून ही परंपरा अविरतपणे चालू आहे. या वारीत लाखोंच्या जनसमुदायाला असलेली एक अनोखी शिस्त आपल्याला पाहायला मिळते. हे सारे अचंबित करणारे आहे. परंतु इतकी वर्षे चालू असणारी ही वारी या वर्षी मात्र काही मोजक्या लोकांमध्ये पार पडते आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे करोना; पण तरीही ही वारी अनुभवावी, विठुरायाची भेट घेता यावी, विठ्ठलाचे दर्शन व्हावे ही उत्कट भावना काही वारकऱ्यांच्या मनात येतेच. हीच संकल्पना घेऊन आणि आताच्या परिस्थितीला अनुसरून हा लघुपट तयार करण्यात आला आहे.
या लघुपटाची कथा किशोर नाईक यांची असून, पटकथा-संवाद अजिंक्य जाधव यांचे आहेत. या लघुपटाचे दिग्दर्शन किशोर नाईक आणि नीलेश गुरव यांनी केले आहे. गीतकार डॉ. प्रणव प्रभू याच्या लेखणीतून साकार झालेले गाणे यात असून, ते झी मराठीवरील ‘सारेगमप’फेम गणेश मेस्त्री यांच्या आवाजात संगीतकार दिनेश वालावलकर यांनी संगीतबद्ध केले आहे.
या लघुपटामध्ये ‘रात्रीस खेळ चाले’फेम नित्यानंद जडये, नितीन जंगम आणि डॉ. प्रणव प्रभू प्रमुख भूमिकेत आहेत. या लघुपटाचे छायाचित्रण आणि संकलनाची बाजू मिलिंद अडेलकर या युवकाने निभावली आहे. रोहन नेरूरकर आणि संकेत जाधव यांनी डिझायनिंगची जबाबदारी सांभाळली आहे. रंगभूषाकार गुरुप्रसाद कलिंगण, तसेच समीर नाडकर्णी, रवी वारंग, मेकिंग चिन्मय परब यांचेही विशेष सहकार्य लाभले.
या लघुपटाचे चित्रीकरण कुडाळ तालुक्यातील नेरूर, वालावल, वायंगणी येथे लॉकडाउनचे सर्व नियम पाळून करण्यात आले आहे. यातील सर्व तंत्रज्ञ, कलाकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. याआधी ‘विद्यम आर्टस्’ने निर्मिती केलेल्या ‘संकासुर’ या लघुपटात या सर्व मंडळींनी आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. तसाच उदंड प्रतिसाद वारी या लघुपटालाही मिळेल, असा विश्वास दिग्दर्शक किशोर नाईक आणि नीलेश गुरव यांनी व्यक्त केला आहे. वारी हा लघुपट ‘विद्यम् आर्टस्’च्या चॅनेलवर पाहता येईल. (तो व्हिडिओ सोबत देत आहोत.)
One comment