रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : आज (एक जुलै) सायंकाळपर्यंतच्या स्थितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ४४९ जण करोनामुक्त झाले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५४ जणांनी करोनावर मात केली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात काल (एक जुलै) सायंकाळपासून १५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६१४ झाली आहे. काल सायंकाळपासून आढळलेल्या नवीन बाधितांचा तपशील असा – कापसाळ, ता. चिपळूण – ३, गोवळकोट, ता. चिपळूण – ३, घरडा, लोटे, ता. खेड- ६, खेड – २, समाजकल्याण, रत्नागिरी – १.
जिल्हा कोव्हिड रुग्णालयातून २, तर कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण, रत्नागिरी येथून ८ अशा १० रुग्णांना आज बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४४९ झाली आहे. सध्या रुग्णालयात असलेल्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३९ आहे. त्यात पुन्हा दाखल केलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
आज राजिवडा, रत्नागिरी हे क्षेत्र करोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. रत्नागिरी तालुक्यातील साखरतर, पानवल, वाटद, शिरगाव, करबुडे, राजिवडा-शिवखोल, कर्ला आणि जुना फणसोप, तरवळ, पानवल फाटा ही क्षेत्रे करोनामुक्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी दोन रुग्णांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१६ झाली आहे. हे दोन्ही रुग्ण सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा गावचे आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या १५४ झाली असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात ५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून, एक रुग्ण उपचारांसाठी मुंबईत गेला आहे. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून आजअखेर एकूण एक लाख १९ हजार ८७३ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
…….
