करोनाच्या काळात मुलांची अशी घ्या काळजी

करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यामध्ये लहान मुलांना उपद्रव होणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. अशा स्थितीत लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, याविषयी इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने माहितीपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यातील प्रश्नोत्तरे सोबत दिली आहेत.

विरार (जि. पालघर) येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी यांचा व्हिडीओ सोबत दिला आहे. तोही पाहावा.

प्रश्न : मुलांमध्ये आढळणारी करोनाची लक्षणे कोणती?
उत्तर :
ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास, सर्दी-पडसे, घसा खवखवणे, वाहते नाक, थंडी वाजणे, स्नायू वेदना, डोकेदुखी, चव किंवा वास न येणे, मळमळ, वांती, अतिसार आणि थकवा आदींसारखी लक्षणे आढळत आहेत. काही मुलांना शरीरात जळजळ होते. करोनाची लागण झाल्यावर बऱ्याच आठवड्यांनंतरही शरीरात जळजळ होऊ शकते. मुलांमध्ये आढळणारे ‘मल्टी सिस्टम इंफ्लामेंट्री सिंड्रोम’ (एमआयएससी) करोनाशी संबंधित आहेत का याचा तपास डॉक्टर करत आहेत.

प्रश्न : एमआयएससी लक्षणांमध्ये काय त्रास होतो?
उत्तर :
ताप, पोटदुखी, उलट्या किंवा अतिसार, पुरळ उठणे, मानदुखी, डोळे लाल होणे, थकवा जाणवणे, लाल व्रण उठणे, हात किंवा पाय सुजलेल्या ग्रंथी असा त्रास जाणवतो.

प्रश्न : लहान मुलांमध्ये करोना संसर्ग का वाढला?
उत्तर :
पहिल्या लाटेवेळी करोना मुलांवर प्रभाव करत नसला तरी दुसऱ्या लाटेत त्याने आक्राळविक्राळ रूप घेतले, असे तज्ज्ञांचे मत आहे. याचे कारण म्हणजे करोनाच्या विषाणूत सातत्याने बदल होत आहेत. लहान मुलांसाठी वेगळी लस निर्माण करता येईल का, या याबद्दलचे संशोधन काही देशांमध्ये सुरू आहे. त्यामुळे लस येईपर्यंत मुलांची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण मुलांवर उपचार करत असताना प्रौढांना देण्यात येणारी औषधे देऊन चालत नाही. मुलांना करोना झाला तर त्याचा परिणाम त्यांच्या प्रतिकारशक्तीवर होतो.

प्रश्न : कोविड काळात मुलांची काळजी कशी घ्याल?
उत्तर :
१. मुलांना ताप, खोकला आणि घशाचा त्रास अशी लक्षणे आढळल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही.
२. मुलांना कुठलीही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना भेटा. डॉक्टर तपशिलवार रुग्णाचा इतिहास जाणून घेतील. त्यानुसार परिस्थितीचे आकलन करतील.
३. करोना रुग्णाशी संपर्क आल्यास डॉक्टर कोविड टेस्टचा सल्ला देऊ शकतात.
४. मुलांना ताप आणि इतर लक्षणांवर उपचार नियमित औषधोपचाराने बरे केले जाऊ शकतात. त्यामुळे बालरोग तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार उपचार करणे महत्त्वाचे आहे.
५. मुलांच्या खेळण्याच्या सवयीमुळे त्यांना अशा काळात थकवा जाणवू शकतो. त्यामुळे त्यांना या काळात विश्रांतीची खूप गरज असते. पुरेसे पाणी आणि द्रवस्वरूपातील आहाराचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात.
६. मुलांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज भासू शकते. त्यामुळे चिन्हे पाहा. श्वास घेण्यास होणाऱ्या अडचणी, धाप लागणे, झोप येणे, खाण्यापिण्याच्या तक्रारी जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा.

प्रश्न : मुलांना आरोग्यविषयक सवयींना कसे प्रोत्साहित करावे?
उत्तर :
१. करोना प्रतिबंधासाठी मुलांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यांना योग्य सवयी लहानपणापासूनच लावल्यास भविष्यात होणाऱ्या चुका टळू शकतात. आरोग्य सृदृढ ठेवणाऱ्या सवयींमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. तसेच मुले या सवयी इतरांनाही प्रभावीपणे सांगू शकतात.
२. किमान २० सेकंद साबण आणि पाणी वापरून हात धुणे. सॅनिटायझरचा वापर योग्य प्रकारे करणे त्यांना शिकवावे.
३. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये. हात धुतल्याशिवाय डोळ्यांना स्पर्श करू नये.
४. मुले शिंकत किंवा खोकत असताना कोपर वापरणे, तोंड किंवा नाक झाकून ठेवतात का, याची खात्री करावी. रुमाल किंवा वापरलेल्या टिश्यूची व्यवस्थित विल्हेवाट लावतात का, याची काळजी घ्यावी.
५. मुलांनी वापरलेली खेळणी, घरातील वस्तू, रिमोट स्वच्छ ठेवावेत.
६. आपल्या कृतीतून मुलांना शिकवा. मुले मोठ्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे स्वच्छता राखण्याचे संस्कार त्यांना आपसूक येत जातील.

प्रश्न : मुलांना घरात व्यग्र कसे ठेवावे?
उत्तर :
१. लॉकडाऊनमुळे बहुतेक शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिकवण्या सुरू आहेत. त्यामुळे बराचसा वेळ त्यांच्याकडे विरंगुळ्यासाठी असतो.
२. घरगुती खेळ, पुस्तके कोडी सोडवणे आदी कामे मनोरंजनासाठी असतील. मोबाइल गेममध्ये सतत राहण्यापेक्षा चिकटून राहण्यापासून प्रतिबंधित करण्याचा तो एक मार्ग आहे.
३. मुले टीव्ही पाहण्यात किंवा संगणक, लॅपटॉपवर बराच वेळ घालवतात. त्यांची ही सवय मोडण्यासाठी काही बंधने आखून घ्यायला हवीत.
४. पेंटिंग, स्टोरीबुक वाचणे, स्वयंपाक इत्यादी छंद जोपासण्यासाठी मुलांना प्रोत्साहित केले जाऊ शकते.

तरीही करोनाची लागण झालीच, तर मुलांवर योग्य उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या!

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply