श्री महालसा स्तोत्र (संपूर्ण मराठी)

श्री महालसा म्हणजे श्री विष्णूचा मोहिनी अवतार. श्री महालसेचे महाजन कौशिक, अत्री, भारद्वाज, गार्ग्य आणि वत्स अशा पाच गोत्रांचे आहेत. कोनकर, खांडेकर, टोळ्ये, चुनेकर, काकिर्डे, भाटवडेकर, प्रभुदेसाई, बाक्रे, जांभेकर, साधले, रायकर, खानवेलकर, पेळपकर, शेवडे, देऊसकर, तळेकर आदी आडनावाच्या कऱ्हाडे ब्राह्मणांचा त्यात समावेश आहे. (म्हणजेच श्री महालसा ही त्यांची कुलदेवता.) गोव्यातील म्हार्दोळ येथे श्री महालसा नारायणीचे मोठे मंदिर आहे. गोव्यातच वेर्णा येथे देवीचे मंदिर आहे. कर्नाटकातही कारवार आणि आणखी काही ठिकाणी नवी मंदिरे झाली आहेत.

श्री महालसेचे म्हार्दोळ (गोवा) येथील मंदिर

कुंकळ्ळी (गोमंतक) येथील कवी व्यंकटेश विष्णु वैद्य यांनी श्री महालसेचे मराठी स्तोत्र अनेक वर्षांपूर्वी रचले आहे. मुंबईतील झावबाची वाडी येथील ललिता प्रकाशनाने श्रावण शुद्ध प्रतिपदा शके १९०० या दिवशी (म्हणजे इ. स. १९७८) या स्तोत्राच्या पुस्तकाची पुनर्मुद्रित आवृत्ती प्रसिद्ध केली होती. म्हणजे त्याआधी त्याची मूळ आवृत्ती प्रसिद्ध झाली होती. हे स्तोत्र म्हणजे ‘आयुरारोग्य, धनलाभ, सुखशांति, सत्कीर्ति, पुत्रपौत्र, विजय, समृद्धी आणि समाधान देणारा मंगल पाठ!’ असे वर्णन त्या पुस्तकात आहे. ‘हे स्तोत्र नित्यनियमाने श्रद्धापूर्वक पठण करा. सर्व अडचणी, दुःखें नाहीशी होऊन आनंद, दीर्घायुरारोग्य, विपुल संपत्ति व सुखें प्राप्त होतात, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. देवी तुमच्या-आमच्या सदा पाठीशीं आहे. ती सर्वांचें कल्याण करील, मंगल करील, सर्व मनोरथ पूर्ण करील,’ असेही त्या पुस्तकात लिहिले होते. ते पुस्तक दुर्मीळ असल्याने सर्व भाविकांसाठी हे स्तोत्र येथे उपलब्ध करत आहोत.

श्री शुभं भवतु । तथास्तु ।
…………
।। श्री गणेशाय नमः ।।
श्रीवाग्देवी सरस्वती । मोहनाशिनी ज्ञानमूर्ति ।
नमन भावें तिजप्रती । काव्यारंभी ।।१।।

श्वेतवसना, मंजुस्वनी । कमलासना, हंसवाहिनी ।
सुस्वर वीणाधारिणी । संजीवनी ।।२।।

सकल कलांचें उगमस्थान । सकल विद्यांचें गुणनिधान ।
सकल शास्त्रांचें संविधान । आत्मरूपा ।।३।।

श्रीमहालसा स्तोत्र-गान । करण्या देवों बुद्धि पावन ।
ज्ञानामृताचें सिंचन । करोनियां ।।४।।

भारत राष्ट्रांतर्गत । महाराष्ट्र देश ख्यात ।
त्यांत गोमंतक प्रांत । पुण्यभूमि ।।५।।

सह्याद्रि आणि सागर । यांमधील रम्य परिसर ।
सासष्टी महाल मनोहर । तयामधीं ।।६।।

मठग्राम, वेरणें, कुशस्थळी । केळशी, नागवें, शंखावली ।
राय, कुडतरी, लोटली । बाणावली ।।७।।

हे दशग्राम भारी पावन । सारस्वतांचें आद्यस्थान ।
वेदघोष, होम, हवन । नित्य चाले ।।८।।

दाक्षिणात्य सारस्वत । पंचगौडांतर्गत ।
दशविध भेद निश्चित । ब्राह्मणांचे ।।९।।

सरस्वती तीरनिवासी । सारस्वत अभिधा यांसी ।
प्राचीन काळी गोमंतकासी । येणें झालें ।।१०।।

जेथ अघनाशिनी सरिता । सार्थ नामें, सह्याद्रिसुता ।
विलयसि न्यावया दुरितां । वाहतसे ।।११।।

ठायींठायीं सरोवरें । पोफळीची आगरें ।
नारळी-तरू फलभारें । शोभिवंत ।।१२।।

पश्चिमेसी चंद्राकार । तीर्थराज सागर-तीर ।
भूमातेसी धुवांधार । स्नान घाली ।।१३।।

पूर्वेस चंद्रनाथ पर्वतीं । चंद्रमौलिश्वराची वस्ती ।
मूर्तिमंत भुवनपती । भूतनाथ ।।१४।।

यथाकाळीं पर्जन्यवृष्टि । हरितवर्णा सर्व सृष्टी ।
निसर्ग सौंदर्यानें दृष्टि । लोभतसे ।।१५।।

आपगांचें मधुर पाणी । सस्यश्यामला होई धरणी ।
वैभवशाली मनोहारिणी । सर्व काल ।।१६।।

पापभीरू, ज्ञानी जनता । श्रमिक, विश्वासू, न्यायनिरता ।
सेवापरायणा वनिता । स्वयंभावें ।।१७।।

म्हाळ पै नामें चतुर नर । नागवें ग्रामीचा विप्रवर ।
कौशिक गोत्री धुरंधर । सव्यसाची ।।१८।।

ऋग्वेदी, आश्वलायन । शाखा, सूत्र, वेदाध्ययन ।
हरिभक्ति ज्ञानपरायण । सौजन्यमूर्ति ।।१९।।

नागवेंचा देशपती । पै उपनांव विख्यात कीर्ति ।
म्हाळ शर्मा ग्रामीण कुलपती । सन्मानित ।।२०।।

त्यागोनि पूर्वजांचें धाम । वेरणें ग्रामीं निर्मिलें सद्म ।
नित्य नेमें गृहस्थ-धर्म । आचराया ।।२१।।

राजकारणी मुत्सद्दि । त्यांत दैवाची लाभे सद्दी ।
चातुर्याची प्रसिद्धि । चोहींकडे ।।२२।।

राजसेवेंत मिळवी नांव । रंकाचा झाला महाराव ।
राष्ट्रकूट नृपतीध्रुव । सन्मान देई ।।२३।।

गोमंतकाचा राज्यपाल । तयास नेमी नृपाल ।
म्हाळ पैचा उत्कर्षकाल । सुरू झाला ।।२४।।

गोमंतकीं विशंती महाल । म्हाळ पै त्यांचा राज्यपाल ।
न्यायनीतीनें यथाकाल । पालन करी ।।२५।।

सासष्टी, बारदेश, तिसवाडी । अंत्रूज, भतग्राम, हेमाडी ।
बाल्ली, काकोडें, चंद्रवाडी । अष्टागर ।।२६।।

चंदगड, बांदें, कुडाळ । अडवट, सुपें, हल्याळ ।
सत्तरी पेडणें, साळ । मालवन ।।२७।।

मांडवी, कालिंदी, अघनाशिनी । गंगावली, गोमती, मालिनी ।
सप्तगंगा, जलवाहिनी । पुण्यसलीला ।।२८।।

धर्म आणि देशरक्षण । परचक्राचें निवारण ।
गोब्राह्मणांचें प्रतिपालन । शौर्ये करी ।।२९।।

पार्थासमान महान वीर । हरिश्चंद्रापरी सत्त्वधीर ।
कर्णासमान दाता थोर । परोपकारी ।।३०।।

त्याच्या वंशीं कुलस्वामिनी । श्रीमहालसा नारायणि ।
सुसंरक्षिणी मोहिनी । महामाया ।।३१।।

जेव्हां सुर आणि असुर मिळून । केलें सागराचें मंथन ।
चतुर्दशरत्नें महान् । निपजलीं जगीं ।।३२।।

अमृताचा कलश लाभला । तेव्हां असुरवृंद लोभावला ।
संग्रामासी आरंभ झाला । भयानक ।।३३।।

दारुण झालें संगर । नाटोपती शूर असुर ।
सुरांनीं स्तविला श्रीवर । संकटकाळीं ।।३४।।

जयजयाजी वैकुंठपाळा । अंतकाळ पातला आगळा ।
रक्षीं रक्षीं गा या वेळां । स्वदासांसी ।।३५।।

धांव पाव गा श्रीलक्ष्मीपती । देवा नारायणा संप्रती ।
तुमच्यावांचूनि आम्हां गति । अन्य नाहीं ।।३६।।

ऐकूनि सुरांचा आर्त स्वर । अंतरीं द्रवला रमावर ।
वेगें कामिनी सत्वर । स्वयें झाला ।।३७।।

लावण्यवती भामिनी । अकस्मात् देखिली नयनीं ।
तेव्हां असुरांचे मनीं । लोभ उपजे ।।३८।।

विस्मरले घोर युद्ध । पंचशरें झाले विद्ध ।
जयापजयाची जिद्द । नष्ट झाली ।।३९।।

लावण्यवती वेल्हाळी । भान हरपे तये वेळीं ।
टकमकां बघती भोळीं खुळीं । दैत्यबाळें ।।४०।।

विचारिती तूं कोठूनि आली । लावण्यप्रभेची माउली ।
वीरवरांची छाया साउली । संजीवनी ।।४१।।

मोहिनी वदे मंजुल रवें । रणकंदन नव्हे बरवें ।
सावत्र भाऊ तुम्हीं, असावें । प्रेमभावें ।।४२।।

अमृतासाठीं संगर । अनाचाराचा प्रकार ।
अहित सुहिताचा विचार । मनीं आणा ।।४३।।

समभावें सकलां समर्पावी । समप्रमाण सकलां वांटावी ।
संग्रामाची समाप्ति व्हावी । हीच इच्छा ।।४४।।

लावण्य-मोहाचिया छंदीं । नेत्रपटलीं चढली धुंदी ।
मान्यता दिधली दैत्यवृंदीं । आनंदानें ।।४५।।

सुरांसुरांच्या विभिन्न पंक्ति । केल्या, योजिली शाठ्य नीति ।
कौशल्यें सुधा अर्पिली हातीं । देवांचिया ।।४६।।

मोहिनीची पाहूनि करणीं । दैत्य क्षोभलें अंतःकरणीं ।
कर चोळुनी क्रोधें, चरणीं । भूमि ताडिती ।।४७।।

परी आतां नुरला उपाय । प्राशूनि अमृताचें पेय ।
अमर झाले अदितेय । धैर्यधारी ।।४८।।

साह्यासी लाभे मोहिनी । असुरमर्दिनी मायाविनी ।
सबल, सायुध उद्धरिणी । निर्झरांची ।।४९।।

असुरांचा निःपात झाला । देववृंद संतोषला ।
सुधा प्राशनानें त्यांजला । स्वर्ग लाभे ।।५०।।

जन्ममृत्यूचा चुकला फेरा । नंदनवनाचा लाभला वारा ।
कल्पतरूची श्रमपरिहारा । छाया मिळे ।।५१।।

सुरांनीं स्तविला श्रीहरी । सज्जन रक्षक भवदुःख हारी ।
विनंति करिती निर्धारीं । भक्तिभावें ।।५२।।

या तुझ्या रूपाची स्मृति । भूवरी रहावी मागुति ।
क्षीराब्धिवासी श्रीपति । सर्वकाल ।।५३।।

सद्धर्म रक्षायास्तव । तारावया अज्ञ मानव ।
खल, दुर्जन पराभव । करण्यासाठी ।।५४।।

प्रसन्न झाली मोहिनी । ‘तथास्तु’ म्हणे तैं पासुनी ।
श्रीमहालसा नारायणि । मृत्युलोकीं ।।५५।।

ही कुलदेवता पुनित । उत्कर्षासी कारणीभूत ।

म्हाळ पै मानी खचित । अंतःकरणीं ।।५६।।

म्हणुनियां महालसा मंदिर । भव्य निर्मिलें रुचिर ।
वेरणें ग्रामीं भू-विस्तार । पाहोनियां ।।५७।।

निवडोनि विस्तीर्ण मालभूमि । बांधिल्या अग्रशाला नामी ।
पूजाअर्चा नित्यनेमीं । सुव्यवस्था ।।५८।।

समीप जलाचा निर्झर । पुष्करिणी मनोहर ।
पुष्पलतांचे आगर । सभोंवतीं ।।५९।।

त्रिकाल आरत्या, गायन । सुस्वर वाद्यांचा मंजुस्वन ।
वेदघोष, मंत्रजागरण । भक्तिभावें ।।६०।।

भानुवासरीं शिबिकोत्सव । नृत्यागनांचा पदरव ।
अंगप्रत्यंग हावभाव । तालस्वरें ।।६१।।

देव भावाचा भुकेला हा । प्रत्ययो रोकडा आला ।
कीर्तिपरिमल पसरला । महाराष्ट्रीं ।।६२।।

तुळजापुरची भवानी । कदंबांची कुलस्वामिनी ।
परी श्रीमहालसा मानी । गोमंतकीं ।।६३।।

रायामागून सरदार । भजों लागले अपरंपार ।
वणिक, श्रीमंत परिवार । देशोदेशींचा ।।६४।।

श्रीमहालसेचे श्रेष्ठ पवाडे । वेरण्याची महती वाढे ।
भक्तजनांचे येती तांडे । दर्शनासी ।।६५।।

कलावंत, पंडित, गायक । कीर्तनकार, साधू, भजक ।
योगी, शास्त्री, ज्ञानसाधक । विज्ञान वेत्ते ।।६६।।

ज्याचा ज्याचा जैसा नवस । श्रीमहालसा पुरवी खास ।
अनुभवें पूर्ण विश्वास । लोकांतरीं ।।६७।।

राष्ट्रकूट राज गोविंद । पराक्रमी जैसा वीर स्कंद ।
प्रेमें वंदिती पदारविंदा । मांडलिक ।।६८।।

अचलपूर राजधानी । विदर्भप्रांती मोहिनी ।
सौंदर्यानें भारतभुवनीं । सुविख्यात ।।६९।।

शौर्य, विक्रम, वैराग्य । शांति, पुष्टि, तुष्टि, भाग्य ।
सवें नांदे पूर्ण आरोग्य । सर्व राज्यीं ।।७०।।

आसमुद्रवलयांकित । राज्य चाले सुव्यवस्थित ।
गोमंतक प्रांत त्यांत । समाविष्ट ।।७१।।

लक्ष्मी, सरस्वती एकसरीं । नांदती, विलसती दरबारीं ।
गजांतलक्ष्मी राजद्वारीं । तिष्ठताहे ।।७२।।

प्रभावती नामें त्याची भार्या । पट्टमहाराणी आर्या ।
सहाय्यदात्री महीत कार्या । रात्रंदिन ।।७३।।

रूपसंपन्न सच्छीलवती । सौजन्याची केवळ मूर्ति ।
दलितजनांची दुःखहर्ती । साक्षात् लक्ष्मी ।।७४।।

श्रीकृष्णनाथा रुक्मिणी । श्रीरामासी सीताराणी ।
महेश्वरासी उमा रमणी । अर्धांगिनी ।।७५।।

पोटीं नसे पुत्रसंतान । या कारणें व्यथित मन ।
अहर्नीश देवदेवतार्चन । विनीत भावें ।।७६।।

गोमंतकीं वेरणें ग्रामांत । श्रीमहालसा देवी ख्यात ।
म्हणुनियां पुत्रप्राप्त्यर्थ । नवस केला ।।७७।।

श्रीदेवी-कृपेची महती । राणी झाली पुत्रवती ।
आनंदला भूपती चित्तीं । साक्षात्कारें ।।७८।।

नवस फेडावया सांग । रायें केला विष्णु याग ।
पवित्र वेरणें ग्राम भाग । प्रयाग-भूमि ।।७९।।

देशोदेशींचे सन्मान्य पंडित । वेदवेदांग पारंगत ।
यागास्तव जमविले अमित । भूपतीनें ।।८०।।

अखंड सप्तदिनपर्यंत । दीनदुर्बलां भोजन देत ।
नित्य नूतन पक्वान्नें अर्पित । याचकांना ।।८१।।

भूमिदानें तुष्टिले ऋत्विज । वस्त्राद्यलंकारांनीं द्विज ।
दानशूरतेचें चीज । महा केलें ।।८२।।

अनेक शतकें गेलीं निघुनी । कीर्तिसौरभें भरली मेदिनी ।
श्रीमहालसा मोहिनी । वेरण्याची ।।८३।।

भारतसंपदेची ऐकूनि कीर्ती । लोभावले चोरटे चित्तीं ।
श्वेतद्विपींचे नायती । पोर्तुगीज ।।८४।।

जमवुनी चाचे साहसी । जहाजें लुटिती दिननिशीं ।
तस्करांचा पेशा विनाशी । आचरीती ।।८५।।

गोमंतकावरी घाला । त्या दुष्टांनीं घातला ।
दुष्टतेचा कहर केला । अतोनात ।।८६।।

धर्मसमीक्षणाचें वारें । जाळिली देवता मंदिरें ।
हिंदुजनासी महा निकरें । ख्रिस्ती केले ।।८७।।

धर्मप्रसाराच्या नांवें । जे कां न वर्णवे, ऐकवे ।
जुलूम केले नवे नवे । गोमंतकी ।।८८।।

आधीं धर्मवेडे पोर्तुगीज । त्यात विजयाचा माज ।
रुधीर-लांछित धर्मध्वज । भयानक ।।८९।।

त्यागोनि भूमि, मत्ता, सदन । परागंदा झाले हिंदूजन ।
तयासि त्राता कोणीहि न । ऐशी स्थिती ।।९०।।

सासष्टींतील देवमंदिरें । स्थलांतरीत केलीं त्वरें ।
हिंदुसत्तेच्या बडिवारें । सांभाळिलीं ।।९१।।

श्रीमहालसेचें मंदिर । अंत्रुजेच्या पावन भूवर ।
प्रियोळ ग्रामाभीतुर । स्थलांतरित ।।९२।।

महारवाड्याची ओळ । हरिजनांनीं दिधलें स्थळ ।
त्याचा अपभ्रंश म्हाड्डोळ । साधार झाला ।।९३।।

श्रीदेवीचा निवास होतां । क्षेत्रमहिमा लाभे तत्त्वता ।
देवालयाचा प्राकार मागुता । पावन झाला ।।९४।।

महाजनांनी भक्तिपुरःसर । पुनः निर्मिलें मंदिर ।
अग्रशाला, गर्भागार । जशाचें तसें ।।९५।।

श्रीसांतेरी, दाढा, मलहार । चौसष्टि, संकष्टि, पुरुषाकार ।
क्षेत्रपाळादि सान थोर । भिन्न भिन्न ।।९६।।

नित्य नैवेद्य, पूजेसाठीं । भूमिदानाचीं परिपाठी ।
नियोजुनी संपदा मोठी । एकत्र केली ।।९७।।

श्रीमहालसेच्या तीन कळा । सकाळीं बालिकावेष आगळा ।
माध्यान्हीं युवती सौज्वळा । षोडशवर्षा ।।९८।।

रात्रौ पुरंध्री देदीप्यमान । लावण्याचें श्रेष्ठ निधान ।
श्रीमुखारविंद-ध्यान । वंदनीय ।।९९।।

श्रीचक्रांकित पाषाणमूर्ति । दैत्यमर्दिनी स्फूर्ति-दाती ।
चतुर्हस्ता, लीलावती । उभी राहे ।।१००।।

एका हातीं धरी त्रिशूल । दुसऱ्या हस्ती खट्वांग, जाल ।
दैत्य रुधिराचें पात्र विलोल । संग्राम देवी ।।१०१।।

उरल्या हस्तीं असुरमुंडें । केशाकर्षणें असु आतुंडे ।
रक्तप्राशनासी दडे । महावृक ।।१०२।।

कंठी मौक्तिकांचे हार । मस्तकी मुकुट शोभे सुंदर ।
लोकाभिमुख मनोहर । ध्यानमूर्ति ।।१०३।।

श्रीमहालसेचें भांडागार । समृद्ध, संपन्न, चेतोहर ।
परमादरे नारी नर । पाहताती ।।१०४।।

अलंकार, रत्नें, भूषणें । वसनें, मोहरा, सुवर्णनाणें ।
शेले, शालू, प्रावर्णे । नाना परीचीं ।।१०५।।

कांचनमणिमय मेखला । हीरक-वलयें माणिकमाला ।
चंद्रहार, वांकीं, दुशाला । बाजूबंद ।।१०६।।

कनक-कंकणें रत्नजडित । मोहनमाळा हेममंडित ।
सुवर्णाभरणें सुशोभित । कोषागारीं ।।१०७।।

नीलमणि, पाचू, पुष्पराज । हेमकांचोळ्या, शिरताज ।
वैडूर्य, प्रवाल, शृंगारसाज । विविधरंगी ।।१०८।।

वैशाखमासीं वसंतोत्सव । ऋतुराजाचें अपूर्व लाघव ।
आबालवृद्ध उत्सवमग्न । मानव ।।१०९।।

बैसुनियां सुंदर यानी । महालसा जाई उद्यानीं ।
विविधरंगी पुष्पासनी । आरूढली ।।११०।।

विविध फलांचा संभार । सर्वांसि लाभे फलाहार ।
शीतल रसपान मधुर । आम्रासव ।।१११।।

श्रावणमासी प्रतिरविवारीं । रंगपुजेची माधुरी ।
श्रीनिकेतनाभीतरीं । रोषणाई ।।११२।।

सुवर्ण-शिबिका, सुवर्ण चंपक । सुवर्ण सुमनें, सुवर्ण मंचक ।
मिरवणूक बहु जनमनरंजक । भासतसे ।।११३।।

भाद्रपदीं माड्डोळीं अनावर । जातिपुष्पांना येतो बहर ।
सतत सुगंधित प्राकार मंदिर, वातावरणीं ।।११४।।

जाति-सुमनांची पूजा अपूर्वं । भरूनी जाई परिसर सर्व ।
स्तंभ, सौधा-दिकांचें वैभव । अलौकिक ।।११५।।

जाईपुष्पांचेचि तोरणे । जातिपुष्पांची आभरणें ।
जाईपुष्पांचेचि लेणें । चोहीकडे ।।११६।।

आश्विनमासीं नवरात्रोत्सव । मखराचि शोभा अभिनव ।
दोलायमान देव देव । अभ्यंतरीं ।।११७।।

पुढें कोजागरी पौर्णिमा । शुभ्र कौमुदी, विमल चंद्रमा ।
निर्मला-काशीं कारका भामा । लखलखीत ।।११८।।

सहस्रावधि मारी नर । श्रीमहालसेचा करिती गजर ।
महिमा गाती जयजयकार । आनंदध्वनीं ।।११९।।

समाराधना, संतर्पण । आकंठ प्रीति-भोजन ।
प्रसाद, नैवेद्य, पोहे अर्पण । सर्व लोकां ।।१२०।।

कार्तिकमासीं दीपाराधना । अमित दीपांची आलोचना ।
अंबरी तारका नाना । तैसी शोभा ।।१२१।।

मग होतो दशावतारी काला । श्रीकृष्णाच्या अगाध लीला ।
गोपगोपींच्या अभिनयाला । बहर येई ।।१२२।।

माघमासीं जत्रोत्सव थाट । विविध वस्तुंनीं भरतो हाट ।
नर-नारींचा समुदाय दाट । एकत्र होईं ।।१२३।।

उंच महारथा रोहिणी । देवीं महालसा नारायणी ।
बहुजनसमुदायाची श्रेणी । ओढीतसे ।।१२४।।

दुसऱ्या दिनीं नौकाक्रीडन । पुष्परिणीमध्यें संचरण ।
जलयानाचें आवाहन । आल्हादक ।।१२५।।

तिसऱ्या दिनीं मोददायक । गजयानाची मिरवणूक ।
अंबारीसहित हस्ती वाहक । मोहिनीचा ।।१२६।।

चवथ्या दिनीं विजयरथीं । श्रीकृष्ण होतो सारथी ।
भारती युद्धाची स्मृति । सामान्य जनां ।।१२७।।

विविध नाटकांचे प्रयोग । जत्रोत्सव जमला योग ।
रसिक जनांनी उपभोग । कां न घ्यावा ? ।।१२८।।

फाल्गुनमासीं शिशिरोत्सव । आधींच उल्हसित मानव ।
शिमग्याचा हर्ष अभिनव । तयां वाटे ।।१२९।।

अत्रुजेंतील सर्व मेळे । म्हाड्डोळीं जमती एके वेळे ।
मानापमानाच्या बळें । हेलावती ।।१३०।।

इति महालसा स्तोत्र । पुण्यदायक, परम पवित्र ।
श्रोत्या वाचकां पात्र । मोक्षक ।।१३१।।

रचयिता : कवी व्यंकटेश विष्णु वैद्य, कुंकळ्ळी (गोमंतक)
……..

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

झोंपाळ्यावरची गीता हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी कृपया 9422382621 या क्रमांकावर संपर्क साधावा.

स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे उल्हास परांजपे यांचे तंत्र. त्यांची पुस्तके ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी लिंक्स
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply