अमावास्येला पेटवलेली ज्ञानज्योत; कुर्धे मराठी शाळा

वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांचे प्राबल्य असताना, रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसजवळच्या कुर्धे या गावात १३० वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेच्या रूपाने ज्ञानज्योत पेटवली गेली ती सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी. त्या वेळची सामाजिक परिस्थिती पाहता ही घटना म्हणजे क्रांतिकारीच म्हटली पाहिजे. अशा या वैशिष्ट्यपूर्ण शाळेची माहिती देत आहेत त्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि आता कुर्ध्यातल्याच राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक असलेले उदय श्रीकृष्ण फडके…
………..

‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’… खरोखरच या जगामध्ये ज्ञानासारखी दुसरी पवित्र गोष्ट नाही. आणि हे जिथल्या ज्ञानी लोकांना कळलं, त्यापैकी एक म्हणजे कोकण, त्यातील रत्नागिरी जिल्हा आणि त्यातील कुर्धे हे छोटेसे गाव. या गावाने शिक्षणाचे महत्त्व फार पूर्वीपासूनच ओळखले आहे. त्यामुळे १३० वर्षांपूर्वीच येथील मुलांना प्राथमिक शिक्षणाची दारे खुली झाली. पारतंत्र्याच्या काळात म्हणजे १८ सप्टेंबर १८९१ रोजी येथे सार्वत्रिक शिक्षण देणारी पहिली ते चौथीपर्यंतची मराठी शाळा स्थापन झाली. या मराठी शाळेच्या स्थापनेच्या दिनांकाबरोबरच स्थापनेच्या तिथीलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. कारण या शाळेची स्थापना तिथी आहे सर्वपित्री अमावास्या. त्या काळात अंधश्रद्धा भरपूर होती. अशा काळात कुर्ध्यातील शाळा सर्वपित्री अमावास्येला स्थापन झाली आहे. पितृपंधरवड्यामध्ये कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात अलीकडच्या काळातही केली जात नाही; पण तशी सुरुवात कुर्धे ग्रामस्थांनी १३० वर्षांपूर्वी केली आहे. इतकी वर्षे ही शाळा अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे, हा या ग्रामस्थांच्या डोळस श्रद्धेचाच परिणाम म्हणायला हवा. मुलांच्या शिक्षणाच्या चांगल्या विचारांना स्वर्गस्थ पितरांचाही आशीर्वाद लाभला, असेही म्हणता येईल.

सुरुवातीला शाळा भरवायची कोठे, हा मोठा प्रश्न होता; पण त्याकरितासुद्धा मदत मिळाली. कुर्ध्यातले कै. राजा सावकार (अभ्यंकर) यांचेपैकी कोणाच्यातरी घरामध्ये ही शाळा सुरू झाली. प्रथम ब्राह्मण समाजातील काही मुलांनी शाळेत प्रवेश घेतला. पुढील वर्षांपासून अन्य समाजातील मुलेही शाळेत दाखल झाली. अगदी सुरुवातीला पहिली ते चौथीपर्यंत शिकविण्याकरिता एकच गुरुजी होते. त्यांच्याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नाही; पण त्यांचे नाव करमरकर गुरुजी असे होते.

फोटो सौजन्य : Rajendra Rangankar

‘इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी,’ या उक्तीप्रमाणे १८९१ साली लावलेले शाळेचे हे रोपटे आता खूपच विस्तारले आहे. स्वातंत्र्यानंतर सरकारने कायदा करून प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवीपर्यंत हक्काचे, तसेच सक्तीचे केले. आणि आमची मराठी शाळा सातवीपर्यंतची झाली. आतापर्यंतच्या सव्वाशे वर्षांत या शाळेतून किमान साडेतीन हजार विद्यार्थी शिकून गेले आहेत. त्यातील काही जण गावात राहून आपापला पारंपरिक व्यवसाय सांभाळत आहेत, तर काही जण जवळच्या शहरांमध्ये नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. काही विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन उच्च शिक्षण घेतले व अनेक मोठमोठ्या क्षेत्रांमध्ये आकाशाला गवसणी घातली. परंतु प्रत्येकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यापैकी कोणीही आपल्या शाळेला विसरले नाही. कारण हेच होते कुर्धे गावाचे व कुर्धे शाळेचे संस्कार!

शिक्षणाचे उद्दिष्टच मुळी ‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास’ हे आहे. त्यामुळे पुस्तकी ज्ञानाबरोबरच मुलांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम शाळेमध्ये आजही मोठ्या उत्साहात राबवले जातात. मुलांना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान होण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा, महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा, हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा आदींना बसण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. स्नेहसंमेलन, शारदोत्सव, वनभोजन, शैक्षणिक सहल, योगासने, क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व-निबंध स्पर्धा, हस्तलिखित असे उपक्रम घेतले जातात. विविध उपक्रम आणि स्पर्धांमधून निश्चितच चांगली संधी उपलब्ध होते.

आतापर्यंत शाळेने अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत. ‘सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम २००८’ अंतर्गत शाळेला ‘आदर्श शाळा’ पुरस्कार मिळाला आहे. गणित विषयाकरिता शैक्षणिक साहित्यनिर्मितीसाठी ‘गंमत जंमत खेळ मजेचा’ या संतोष गणेश मुकादम गुरुजी यांच्या मॉडेलची राज्य स्तरावर निवड झाली. इयत्ता सातवीसाठीच्या इंग्रजी अनुधावन शैक्षणिक साहित्याची (सौ. उमा विजय बागाव) विभागीय स्तरावर निवड झाली. शाळेने पर्यावरण जागृतीचा कार्यक्रम तयार करून त्याचे आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर प्रसारण केले आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी शैक्षणिक मदतही दिली जाते. याकरिता माजी विद्यार्थी, गावकरी, कुर्धे गावाची शिक्षण सुधारक समिती, तसेच इतर संस्थांचीही शाळेला मदत होते. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, अपंग शिष्यवृत्ती योजना, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन या शासकीय योजनांचाही लाभ शाळेतील मुलांना दिला जातो. सुवर्णमहोत्सव होऊन गेलेली गावातील शिक्षण सुधारक समिती ही शैक्षणिक संस्था मराठी शाळेसाठी आधारवडच ठरली आहे. शाळेच्या विकासाकरिता झटणारी ही संस्था शाळेतील मुलांच्या व शिक्षकांच्या पाठीवरही कौतुकाची थाप देते. शिक्षण सुधारक समितीच्या माध्यमातून शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेशाचे वाटप केले जाते. तसेच शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी दर वर्षी ‘मुळे गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ दिला जातो. म्हणूनच सर्वांच्या अशा या अथक प्रयत्नांमुळे १८९१मध्ये लावलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे.

‘आचार्य देवो भव’ असे म्हटले जाते. निश्चितच आचार्य हा देवासमान नव्हे तर देवरूपच असतो. कारण त्याच्या कृतीने, वागणुकीने, मुलांवरील प्रेमाने, त्याच्या प्रगतीच्या ध्यासाने तो शाळेचे रूपांतर सरस्वतीच्या पवित्र मंदिरात करत असतो आणि असेच अनेक देवरूप गुरुजी या शाळेला लाभले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कै. यशवंत नारायण लाखण गुरुजी, कै. इंदुताई शिवराम दाते बाई, कै. अनंत पुरुषोत्तम जोशी गुरूजी, कै. मनोहर काशिनाथ शिरवडकर गुरुजी, श्री. मुळे गुरुजी, श्री. दिनकर नारायण चक्रदेव गुरुजी यांची नावे प्रामुख्याने घेता येतील. खरोखरच हे सर्व गुरुजन म्हणजे आमच्या शाळेला लाभलेले देवतुल्य ऋषी होते. शिक्षण हा त्यांचा ध्यास होता, तर शाळा हा त्यांचा श्वास होता.

अशी ही आमची ‘जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कुर्धे,’ शतकोत्तर रौप्यमहोत्सव होऊन गेलेली! मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव झटणारी! ग्रामस्थांच्या शिक्षणप्रेमातून साकारलेली! सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी स्थापन झालेली! म्हणूनच अंधश्रद्धेचा पारा तोडून विज्ञानवादी दृष्टिकोनाला अंगीकारणारी! म्हणून आमची शाळा आम्हा सर्वांना प्रेरणा देणारी अखंड ऊर्जेचा एक स्रोत आहे. या शाळेचे गुरुवर्य कै. अनंत पुरुषोत्तम जोशी यांच्या शब्दात सांगायचे तर… ‘होय, आमची कुर्धे मराठी शाळा एक दिव्य विभूतीच आहे!’
– उदय श्रीकृष्ण फडके
………
(हा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या पहिल्या दिवाळी अंकात (२०१६) प्रकाशित झाला होता. १०० किंवा त्याहून अधिक वर्षे झालेल्या कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण वास्तू, महान व्यक्ती आदींचा मागोवा त्या अंकात घेण्यात आला होता. त्या दिवाळी अंकाचे ई-बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

…………….

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply