Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

हापूस आंब्याच्या विक्रीसह कृषी उन्नतीसाठी रत्न कृषी महोत्सव

Advertisements

राज्य शासनाच्या धोरणाअंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणार्‍या हापूस आंब्याच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी रत्नागिरीत १९ ते २१ मे या कालावधीत रत्न कृषी महोत्सव होणार आहे.

……..

रत्न कृषी महोत्सवात शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरतील असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच लातूर, सोलापूर, कोल्हापूर येथून आणलेले पशुधनही शेतकर्‍यांना पाहता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवासाठी ४५ लाखाचा खर्च अपेक्षित असून जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद कृषी विभागासह आमदार निधीतून खर्चाची तरतूद केली जाणार आहे. रत्नागिरीत प्रमोद महाजन क्रीडा संकुलात हा रत्न कृषी महोत्सव आणि पशुपक्षी प्रदर्शन होणार आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले की, आंबा उत्पादक आणि बचत गटांच्या विविध उत्पादनांना थेट ग्राहक उपलब्ध करून देण्यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे. हापूस आंबा हे कोकणातील महत्त्वाचे पीक आहे. पण आता आंब्याचा हंगाम संपत आला आहे. त्यामुळे दरही खूपच उतरले आहेत. मात्र पर्यटक अजूनही कोकणात येत आहेत. त्यांना चांगला आंबा मिळेल आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल, असाही रत्न कृषी महोत्सवाचा हेतू आहे. त्यादृष्टीने नियोजन केले आहे. याशिवाय शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीविषयक मार्गदर्शनपर परिसंवादही आयोजित केला आहे. हापूसच्या हंगामात अनेक पर्यटक रत्नागिरीत येतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्केट उभारण्याबाबत विचार केला जाईल. हापूस विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात आंबा विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन करता येईल. पालकमंत्री अॅड. अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत सूचना केली आहे. लवकरच याचे नियोजनही केले जाणार आहे.

जिल्हा नियोजनमधून दहा लाख, जिल्हा परिषद पशू विभागाकडून १० लाख आणि आमदार निधीतून उर्वरित निधीची तरतूद केली जाणार आहे. पशु प्रदर्शनात येणार्‍यांना वाहतुकीची सुविधा प्रशासनाकडून दिली जाणार आहे. दर्जेदार पशू लोकांना पाहता यावेत यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचे योग्य फळ मिळवून द्यायचे असेल तर त्याच्या उत्पादनाला योग्य अशा वितरण व्यवस्थेची जोड देणे आवश्यक ठरते. त्यातही थेट ग्राहकांपर्यंत शेतकरी पोहोचला तर ते दोघांच्याही फायद्याचे ठरते. याच भूमिकेतून रत्न कृषी महोत्सव आणि पशूपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

हापूस आंबा ही रत्नागिरीची ओळख आहे मात्र येथे उत्पादित हापूस अधिक प्रमाणात बाहेरील बाजारपेठेत विकला जातो. स्थानिक ग्राहक आणि आंबा उत्पादक यांची सांगड या कृषी महोत्सवानिमित्त घातली जाईल. आंबा विक्रेते आणि ग्राहक यांच्यासाठी स्वतंत्र दालन या महोत्सवात राहणार आहे. आंबा हंगाम संपल्यानंतर यावर प्रक्रिया उद्योग करण्याची संधी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात आहे. त्यात असणाऱ्या संधी आणि प्रक्रिया उद्योगाची क्षमता यांची वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून या कृषी महोत्सवाला विशेष महत्त्व आहे.

सध्याचा काळ पारंपरिक शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देण्याचा आहे. जिल्ह्यात मुख्यत्वे भाताचे आणि त्याखालोखाल नागलीचे पीक घेतले जाते. भातपिकाच्या शेतीत रोपे तयार करणे आणि योग्य वेळी त्याची लावणी करणे आवश्यक आहे. या दोन्हीबाबत योग्य वेळ साधता आली तर भाताची एकरी उत्पादकता वाढणार आहे. हंगामाच्या कालावधीत या सर्व कामात यंत्रांचा वापर झाला तर मोठ्या प्रमाणावर वेळ आणि श्रम यांची बचत तर होईलच, सोबत उत्पादकता वाढल्याने शेतकरीदेखील संपन्न होईल.

भातशेतीसाठी वापरण्यात येणारी विविध यंत्रे तसेच बियाणे आणि भात लागवडीच्या नव्या पद्धती याची ओळख शेतकऱ्यांना या महोत्सवात होईल. शेतीसाठी अनेक वेळा आवश्यकतेपेक्षा अधिक खत वापरले जाते. खताची निवड आणि त्याचा वापर याबाबतही येथे माहिती मिळणार आहे.

नुसत्या एक हंगामी शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरे पाळणे तसेच कुक्कुटपालन आदी जोडव्यवसाय केले, तर त्यांचे उत्पन्न वाढणार आहे. याच भूमिकेतून या महोत्सवात पशू-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शेळीपालनापासून दूध उत्पादनापर्यंत अनेक पर्याय आणि पशूपक्ष्यांच्या विविध जातीप्रजाती प्रदर्शनात बघता येतील, त्याची माहिती घेता येईल.

शेतकऱ्यांना विनासायास हक्काचा वित्त पुरवठा किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळतो. पात्र शेतकरी कोणते आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार याचीही माहिती शेतकऱ्यांना याठिकाणी मिळेल. रत्न महोत्सवात परिसंवादांचेही आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांना येथे बचतगटांची उत्पादने तसेच खास कोकणी खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे.

कृषी उन्नतीसाठी होणारा हा रत्न कृषी महोत्सव सर्वांनी भेट द्यावी असाच असेल.

प्रशांत दैठणकर,
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version