रत्नागिरी जिल्ह्यात माती परीक्षण प्रयोगशाळेसाठी प्रयत्न करणार : खासदार विनायक राऊत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेली माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी दिले.

येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल मैदानावर आयोजित रत्नकृषी महोत्सव आणि पशूपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. शेतीसाठी मातीचे परीक्षण करून त्याद्वारे खते आणि बियाण्यांची योग्य मात्रा ठरवता येते. यासाठी जिल्ह्यात माती परीक्षण प्रयोगशाळा कार्यक्षम करणे आवश्यक आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी प्रास्ताविकात सांगितले होते. या मागणीचा पाठपुरवठा करण्याचे आश्वासन श्री. राऊत यांनी दिले.

श्री. राऊत यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. मुख्य सोहळ्यात बळीराजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ववलन करुन सुरुवात झाली. उद्घाटनानंतर श्री. राऊत म्हणाले, शेतकऱ्यांसाठी अनुदानाच्या अनेक योजना आहेत. त्या सर्व योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील विकेल ते पिकेल संकल्पनेवर आधारित शेती करावी. कोकणातील शेतकरी कायमच प्रगतिशील राहिलेला आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने थेट ग्राहकांपर्यंत जाण्याची संधी शेतकऱ्यांना आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. राऊत यांनी केले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्या तंत्राची माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे. इथला शेतकरी चांगल्या पद्धतीची शेती करतो. याला तंत्राची जोड मिळाली तर अधिक चांगली शेती शक्य होणार आहे. खते आणि बियाण्यांचा योग्य वापर आणि उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत नेता आले, तर शेतकरी अधिक संपन्न होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यावेळी म्हणाले.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पशुसंवर्धन उपायुक्त धनंजय जगदाळे यांनी केले.

जिल्हा कृषी कार्यालय, जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय यांनी संयुक्तरीत्या या महोत्सवाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनात १२० स्टॉल लावण्यात आले असून तेथे कोकणी खाद्यपदार्थही ठेवण्यात आले आहेत. महोत्सवात परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमदेखील होणार आहेत. हे प्रदर्शन ३ दिवस सुरू राहणार आहे.

उद्घाटन समारंभात कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी हरिश्चंद्र धोंडू शिगवण (कुंभवे, ता. दापोली), मिलिंद दिनकर वैद्य (रीळ, ता. रत्नागिरी), शेखर शिवाजीराव विचारे (वरवेली, ता. गुहागर) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खरीप हंगाम भातपीक स्पर्धेत जिल्ह्यातील उच्च उत्पादन घेणारे शेतकरी शांताराम सादू खापरे (शेडवई ता. मंडणगड), विलास कृष्णा किंजळे (वाटद, ता. रत्नागिरी), वसंत सोनू घरवे (निगडे, ता. दापोली), आत्माराम भिकाजी गोनबरे (भगवतीनगर, ता. रत्नागिरी), चंद्रकांत हरिश्चंद्र जानस्कर (कोतापूर, ता. राजापूर), सूर्यकांत बाळू दाभिळकर (चिंचाळी, ता. दापोली) यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

रत्नकृषी महोत्सवात शनिवारी (दि. २० मे) सकाळी ११ वाजता कृषी पणन मंडळाकरिता संधी या विषयावर सहाय्यक सरव्यवस्थापक मिलिंद जोशी शेतकऱ्यांना माहिती देणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजता मत्सप्रक्रिया व मत्स्यसंवर्धन याबाबत शिरगावच्या मत्स्य महाविद्यालयातर्फे माहिती देण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्र आणि कोकणातील लोककलेचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

अखेरच्या दिवशी २१ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा संसाधन व्यक्ती शेखर विचारे आणि अग्रणी बँक व्यवस्थापक एन. डी. पाटील प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची माहिती देतील. दुपारी ३ वाजता प्रदर्शनाचा समारोप होईल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply