दापोलीत रविवारी समर सायक्लोथॉन स्पर्धा

दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे असून सायकल संस्कृती वाढावी तसेच सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे येत्या रविवारी (दि. २२ मे) दापोली समर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही सायकल स्पर्धा दापोलीच्या आझाद मैदानातू सकाळी साडेसहा वाजता सुरू होईल.

स्पर्धा फॅन राइड आणि चॅलेंज राइड अशी २ गटांत आहे. फन राइड विनामूल्य आहे. चॅलेंज राइड ५ ते २५ किलोमीटरची असून त्याकरिता प्रौढांसाठी २०० रुपये आणि विद्यार्थ्यांसाठी १०० रुपये प्रवेश शुल्क आहे. सायकल राइड मार्ग आझाद मैदान, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण चौक, पांगारवाडी जालगाव, लालबाग, उदयनगर आणि पुन्हा आझाद मैदान असा ५ किलोमीटरचा आहे. त्यावर फेऱ्या मारून ५ ते २५ किलोमीटरचे अंतर पूर्ण करता येणार आहे. हे अंतर पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना आकर्षक पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

स्पर्धकांमधून लकी ड्रॉने बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यासाठी २ सायकल, हेल्मेट अशी ५० हजारांची बक्षिसे वाटण्यात येणार आहेत. सर्वांत कमी वयाचा आणि जास्त वयाचा सायकलस्वार, सजवलेली सायकल अशी काही खास बक्षिसे देण्यात येणार आहेत. सायकल मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, सरबत, एनर्जी स्नॅक्स, अॅम्ब्युलन्स, वैद्यकीय मदत असेल. स्पर्धेत खेड, गुहागर, पुणे, मुंबईहून काही स्पर्धक सहभागी होणार आहेत. तसेच दापोलीतील अनेक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, पोलीस इत्यादी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत, सायकल चालवत सहभागी होणार आहेत.

स्पर्धेसाठी नोंदणी अर्ज समर्थ कुशन एजन्सी (अर्बन कॉलेजजवळ), सुनील ऑटोमोबाइल (बुरोंडी नाका), विनी इलेक्ट्रिकल (फॅमिली माळ), श्री सायकल शॉप (केळसकर नाका), सम्यक किराणा शॉप (लष्करवाडी), मंदार कार अॅक्सेसरीज (सुतारवाडी, गिम्हवणे) आणि जोशी ब्रदर्स मेडिकल (बाजारपेठ) येथे भरता येतील. सुरवातीला नोंदणी केलेल्या पहिल्या २०० सायकलस्वारांना गुडी बॅग मिळणार आहे. अधिक माहितीसाठी अंबरीश गुरव (८६५५८७४४८६), पराग केळसकर (९४२२४३३२९१) यांच्याशी संपर्क साधावा.

स्पर्धेचा अर्ज ऑनलाइनही भरता येईल. त्यासाठी लिंक अशी –
https://www.townscript.com/e/dapoli-summer-cyclothon-2022-314124.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply