राजापूर : कातळशिल्पांच्या वारसा संवर्धनाचा जागर करून देवाचे गोठणे (ता. राजापूर) येथे परिसराचा पर्यावरणपूरक शाश्वत पर्यटन विकास साधतानाच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या शनिवारी (दि. २१ मे) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रत्नागिरीतील निसर्गयात्री संस्थेचे सदस्य आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्या प्रयत्नातून देवाचे गोठणे गावच्या हद्दीतील तसेच पंचक्रोशीतील बारसू येथील अश्मयुगीन कातळशिल्प ठिकाणे युनेस्कोच्या प्रस्तावित जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट झाले आहे. देवाचे गोठणे येथील सडा जैवविविधता वारसा स्थळ म्हणून प्रस्तावित आहे. यानिमित्ताने देवाचे गोठणे हे गाव आणि पंचक्रोशी आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले आहे. यातून या परिसरातील आंतरराष्ट्रीय पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.
कातळशिल्प रचनांसोबत देवाचे गोठणे गावाला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. या सर्व गोष्टींचे महत्त्व आणि त्याअनुषंगाने पंचक्रोशी, तालुका, जिल्हा पातळीवर निर्माण होणाऱ्या पर्यटनाच्या आणि रोजगाराच्या संधी याविषयी माहिती व्हावी, यासाठी “जागर वारसा संवर्धनाचा” या उपक्रमाअंतर्गत येत्या शनिवारी (दि. २१ मे) देवाचे गोठणे येथील भार्गवराम मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल.
देवाचे गोठणे ग्रामपंचायत, भार्गवराम मंदिर व्यवस्थापन आणि निसर्गयात्री संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा प्रशासन तसेच पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या सहकार्याने होणार असलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ आणि तरुणांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन देवाचे गोठणे ग्रामपंचायत प्रशासक, राजापूर प्रांताधिकारी, राजापूर तहसीलदार, भार्गवराम मंदिर व्यवस्थापन आणि निसर्गयात्री संस्थेने केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड