पालवीला कसे फुटणार धुमारे?

पन्नास वर्षे पूर्ण केलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात नुकताच सुवर्ण पालवी शेतकरी मेळावा पार पडला. अत्यंत दणक्यात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मेळावा यशस्वी होण्यासाठी आणि त्याला पुरेशी गर्दी होण्यासाठी जेवढे प्रयत्न केले गेले, तेवढे प्रयत्न मेळाव्यातील घडामोडी लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या बाबतीत मात्र झाले नाहीत.

शेतकरी मेळावा अत्यंत सुंदर झाला, यात शंका नाही. विद्यापीठाने ५० वर्षांत केलेले संशोधन लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न विविध माध्यमांमधून करण्यात आला. पण त्याचा लाभ प्रत्यक्ष मेळाव्याला उपस्थित असलेल्या लोकांपुरताच मर्यादित राहिला. मेळाव्याचे प्रायोजकत्व पितांबरी प्रॉडक्ट्स या खासगी कंपनीने स्वीकारले होते. अशा पद्धतीने विद्यापीठाचा कार्यक्रम प्रथमच विद्यापीठाबाहेरच्या एखाद्या संस्थेने केला होता. प्रायोजकत्वावर दोन कोटींहून अधिक खर्च अपेक्षित असल्याचे प्रायोजकांनीच पत्रकार परिषदांमधून सांगितले होते. मेळाव्याचा एकंदर भपका पाहता तेवढा खर्च झाला असेल, यात शंकाच नाही. प्रायोजक म्हणून त्या संस्थेने अत्यंत उत्तम पद्धतीने नियोजन केले होते. मात्र मेळाव्यात जे काही घडले ते इतर सर्वांपर्यंत कसे पोहोचणार, हा सर्वांत मोठा मुद्दा आहे. तो अनुत्तरित राहिल्याचे जाणवते. मेळाव्याच्या उद्घाटन समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेतकऱ्यांच्या पारंपरिक ज्ञानाची सांगड आधुनिक तंत्रज्ञानाची आणि विज्ञानाशी घातली पाहिजे, असे आवाहन केले होते. तसे प्रयत्न यापूर्वीच सुरू झाले आहेत. पण त्याबाबत विद्यापीठाने नेमके काय केले, हेही कोठेतरी मांडले जायला हवे होते. त्याचे प्रत्यंतरही मेळाव्यात आले नाही.

सुवर्ण पालवी मेळावा होणार असल्याची प्रसिद्धी खूप मोठ्या प्रमाणावर झाली. मुळात हा मेळावा फेब्रुवारी महिन्यात होणार होता. पण करोनाप्रतिबंधक निर्बंधांमुळे तेव्हा तो होऊ शकला नाही. तो मे महिन्यात घेण्यात आला. त्यातील कार्यक्रम खूप चांगले होते. विविध तेरा परिसंवाद मेळाव्यात झाले. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. पण ज्या प्रमाणात मेळावा होणार असल्याची प्रसिद्धी झाली, त्या प्रमाणात या परिसंवादांना प्रसिद्धी मिळाली नाही. सर्व प्रसारमाध्यमांनी विद्यापीठाकडून आलेल्या प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात धन्यता मानली. व्यक्तिगतरीत्या कोणा पत्रकाराने मेळाव्यातील परिसंवादांची आणि त्यातील उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून दखल घेतल्याचे दिसले नाही. त्याचे कारणही शोधायला हवे. विद्यापीठाने स्वतःच्या संकेतस्थळावरून विविध परिसंवाद प्रसारित केले. ते यूट्यूबवर उपलब्ध आहेत. पण ते कोठेही योग्य पद्धतीने संकलित केले गेलेले नाहीत. अनेक व्हिडीओ चार ते पाच तासांचेही आहेत. त्यामध्ये स्टेज व्यवस्थेपासून माइक टेस्टिंगपर्यंतचे सर्व व्यवहार दिसत आहेत. हा वेळ अनावश्यकच व्यापला गेला आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने त्याचे प्रसारण झाले, असे म्हणता येणार नाही. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून एवढा मोठा मेळावा होणार असेल तर त्यामधील माहितीचा त्याच पद्धतीने प्रसार व्हायला हवा होता. त्याबाबत गांभीर्याने पाहिले गेले नाही. हे स्पष्ट दिसते. विद्यापीठात केवळ संशोधन होते. त्याच्या विस्ताराचे काम कृषी विभाग करतो, असे नेहमीच सांगितले जाते. ती वस्तुस्थिती आहे. पण पन्नास वर्षे पूर्ण करणारे विद्यापीठ त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्याची प्रसिद्धी करण्याच्या बाबतीतही गांभीर्याने पाहणार नसेल तर या मेळाव्याच्या या पालवीला नवे धुमारे फुटणार कसे? पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचा एक महोत्सव पार पडला, एवढेच समाधान विद्यापीठाला मिळेल.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २० मे २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply