रत्नागिरी : भारताच्या उभारणीत बहुमूल्य योगदान असलेल्या सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक पद्धतीत काही महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहेत. आधुनिक जगात हा अभ्यासक्रम अधिक दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या संदर्भातील विस्तृत माहिती देणारे सेमिनार सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेने मारुती मंदिर येथील व्यंकटेश सेमिनार हॉलमध्ये आयोजित केले होते.

यावेळी रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए प्रसाद आचरेकर, विकासा समिती अध्यक्ष सीए सौ. अभिलाषा मुळ्ये, सदस्य सीए शैलेश हळबे, कोषाध्यक्ष सीए केदार करंबेळकर उपस्थित होते. अभ्यासक्रमातील काही बदलांसंबंधी सीए अभिलाषा मुळ्ये यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांकरिता अभ्यासासाठी पुस्तके, मार्गदर्शन अशा प्रकारचे सहकार्य शाखेकडून करण्यात येते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात सुरवातीला ऑनलाइन माध्यमातून सेंट्रल कौन्सिल मेंबर सीए मंगेश किनरे यांनी बदलत्या अभ्यासक्रमाबाबत विवेचन केले. रत्नागिरीतून अनेक विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेला सामोरे जात असतात. करिअर करण्याच्या दृष्टीने हे क्षेत्र अतिशय आव्हानात्मक असून याकरिता भरपूर अभ्यास, मेहनत घ्यावी लागते, असे त्यांनी सांगितले. रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांकरिता रत्नागिरी शाखेने कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल विशेष अभिनंदन केले.
सीए इन्स्टिट्यूटच्या बोर्ड ऑफ स्टडीचे उपाध्यक्ष सीए विशाल दोशी यांनी या कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सीए अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी आठ महिन्यांनी कमी होणार आहे. आर्टिकलशिपचा कालावधीही दोन वर्षांचा करण्याबाबत आणि स्टायपेंडची रक्कम दुप्पट करण्याचेही प्रस्तावित आहे. देशातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही सीएचा अभ्यासक्रम पूर्ण करून, स्थानिक परिसरात यशस्वी सीए होता यावे, या दृष्टीने आयसीएआय कार्यरत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून सीएच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने सीएची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत आहे.
सीए प्रॅक्टिस, आर्टिकलशिप इंटरमीजिएट आणि अंतिम परीक्षा याबाबतही माहिती यावेळी देण्यात आली. नव्या बदलांनुसार सीए अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय मानकांचा, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा समावेश करण्यात आला आहे. याला अनुसरून ऑप्शनल विषय म्हणून संविधान विषयाचा समावेश केला आहे. नव्या अभ्यासक्रमात प्रात्याक्षिकांवर आधारित बदलांवर अधिक भर दिला आहे. देशात सीए अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. सध्या जागतिक बदलांमुळे सीएंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असेही यावेळी सीए दोशी यांनी सांगितले.
या वेळी १०० विद्यार्थी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड