बंडखोर की तारणहार?

पंढरपूरच्या विठोबाला आणि पंढरीच्या वारीला महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी वारी निघाली आहे. पण यावर्षीची वारी निघाल्यापासूनच राज्यातील राजकारणाने अनिष्ट आणि अनाकलनीय वळण घेतले आहे. त्याच्या कारणांविषयी अनेकांनी आपापल्या परीने विश्लेषण केले आहे. राज्यातील अस्थिरता संपविण्याच्या दृष्टीने विधानसभेत बहुमत सिद्ध करायचा आदेश राज्यपालांनी राज्य सरकारला दिल्यानंतर त्यावरूनही मोठे वादळ उठले. हा अंक प्रसिद्ध होईपर्यंत राज्याचे राजकीय चित्र बरेचसे स्पष्ट झालेले असेल. पण तत्पूर्वी झालेल्या घटना आणि घडमोडीही विचार करायला लावणाऱ्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री आणि शिवसेनेतील प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या काही सहकारी आमदारांसह स्वतंत्र गट स्थापन केला. राज्यातील संभाव्य राजकीय वातावरणाचा अंदाज घेऊन ते गुजरातमार्गे आसामला रवाना झाले. त्यांच्या या कृतीला बंड समजले जाते. त्यांना आणि त्यांना साथ करणाऱ्या मंत्र्यांना बंडखोर म्हटले जाते. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले जाते. आमदारांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. पण त्यांनी केले ते बंड आहे की पक्ष वाचविण्यासाठी चालविलेली धडपड आहे, याचा विचार करायला हवा.

शिवसेनेच्या स्थापनेपासून अनेक जण पक्षातून बाहेर पडले. सुरुवातीच्या काळात बंडू शिंगरे यांनी तर प्रतिशिवसेना स्थापन केली होती. त्यानंतर छगन भुजबळ, नारायण राणे आणि शिवसेनाप्रमुखांची प्रतिकृती समजले जाणारे राज ठाकरे पक्षातून बाहेर पडले. त्यामुळे पक्षाला फारसा फरक पडला नाही. कारण या घडामोडी बाळासाहेब ठाकरे हयात असताना झाल्या होत्या. प्रत्येक घटनेला तोंड द्यायला ते समर्थ होते. आताची घटना वेगळी आहे. यावेळी एखादाच नेता वेगळा झालेला नाही, तर विधानसभेतील दोनतृतीयांश आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी गट स्थापन केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन अत्यंत विरोधी मतांच्या पक्षांशी आघाडी केल्यामुळे संख्याबळाच्या आधारावर पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळाले, तरी पक्षाच्या ध्येयधोरणांच्या विरोधात अनेक निर्णय सरकार म्हणून उद्धव ठाकरे यांना घ्यावे लागले. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मूळ उद्देशालाच तडे गेले. सत्तारूढ असल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांची आक्रमकता नष्ट झाली. हिंदुत्व हेच उद्दिष्ट असलेल्या भारतीय जनता पक्षाशी सतत दोन हात करावे लागले आणि हिंदुत्वाला प्रखर विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांशी कल्पनेपलीकडे जुळवून घेण्याची वेळ आली. पक्षच संपुष्टात येण्याची स्थिती निर्माण झाली. नखे काढलेल्या वाघासारखीच संघटनेची स्थिती होऊ लागली.

याबाबत शिवसेनेतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी आपली घुसमट व्यक्त केली. पण मुख्यमंत्री असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यांनी पक्षानिष्ठेपेक्षाही पदच प्रतिष्ठेचे केले. एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनीच शिवसेनेच्या तत्त्वांशीच अडीच वर्षांपूर्वी बंडखोरी केली. त्याची निस्तरणीच शिंदे आता करत आहेत. ठाकरे यांच्या त्या बंडखोरीपासून संघटना वाचवायची असेल, तर त्याचे नेतृत्व कोणीतरी केलेच पाहिजे, याच हेतूने एकनाथ शिंदे यांनी वेगळा विचार केला. गेल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ पाहिला, तर महाआघाडी सरकारने पाच वर्षे पूर्ण करीपर्यंत शिवसेनेची पक्षसंघटना पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली असेल. पक्ष संपेल. याचाच विचार करून शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. ही सत्तेसाठी केलेली तडजोड नाही, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष वाचविण्यासाठी केलेली धडपड आहे. म्हणूनच श्री. शिंदे पक्षाचे बंडखोर नव्हेत, तर तारणहार ठरले आहेत, असेच मानावे लागेल.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १ जुलै २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply