कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहोचवू या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ‘लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. शासन प्रशासन गतिमान आहे, हा संदेश आपल्या कामातून देऊ या,’ असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (३० जून २०२२) केले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव, तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या वेळी बैठकीस उपस्थित होते. सायंकाळी ७.३० वाजता राजभवनात झालेल्या छोटेखानी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. फडणवीस यांनी पद स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले होते; मात्र केंद्रीय नेतृत्वाकडून झालेल्या सूचनेनंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं.

येत्या २ व ३ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘आपण नवीन सुरुवात करत आहोत. आपल्यासोबत अनुभवी असे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही. राज्यातील विकासकामे, विविध प्रकल्प यांना गती द्यावी लागेल. विविध समाजघटकांना न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते. शासन आणि प्रशासन ही एका रथाची दोन चाके आहेत. लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो आपल्याला सार्थ ठरवायचा आहे. शासन-प्रशासन गतिमान आहे, असा संदेश आपण कामांच्या माध्यमातून देऊ या. मेट्रोचे प्रकल्प, हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, तसेच जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे.’

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘आपल्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. गतिशीलतेने आणि निर्णयक्षमतेने महाराष्ट्र पुढे नेऊ या.’

या वेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, तसेच सर्व विभागांचे सचिव उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील खरीप हंगाम, पीक पाणी, पीक विमा, तसेच राज्यातील कोरोना प्रादुर्भावाबाबतची परिस्थिती यांचे सादरीकरण करण्यात आले.

तत्पूर्वी, मंत्रालयात आगमन केल्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

एकनाथ शिंदे यांनी आठवड्याभरापूर्वी सुरतमधून सुरू केलेल्या बंडनाट्याचा पहिला अंक अनेक अनपेक्षित वळणं घेणाऱ्या घडामोडींनंतर काल (२९ जून) उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर संपला. सर्व आमदारांसह गुवाहाटीतून काल गोव्यात गेलेले एकनाथ शिंदे आज मुंबईत दाखल झाले. त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन नंतर राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply