टेंब्ये स्वामी महाराजांचा आत्मिक समाधान देणारा मठ – मु. पो. पोमेंडी

ह. भ. प. विष्णुबुवा कृष्ण पटवर्धन यांनी रत्नागिरीजवळच्या पोमेंडी गावात उभारलेल्या प. पू. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांच्या मठाला शंभरहून अधिक वर्षे होऊन गेली आहेत. आज आषाढ शुद्ध प्रतिपदा, टेंब्ये स्वामींची पुण्यतिथी. त्या निमित्ताने, टेंब्ये स्वामींचा हा आत्मिक समाधान देणारा पोमेंडी येथील मठ आणि त्याच्या संस्थापकांविषयी…
….

पोमेंडी येथील मठ

रत्नागिरीहून काजरघाटीमार्गे चांदेराईच्या दिशेने जाताना काजरघाटीच्या उतारावर उजव्या अंगाला, मुख्य रस्त्यापासून थोड्याशा आतील भागात ह. भ. प. विष्णुबुवा कृष्ण पटवर्धन (खोत) यांनी शंभरहून अधिक वर्षांपूर्वी श्रद्धायुक्त अंतःकरणाने बांधलेला ‘वासुदेवानंद सरस्वती भजन मठ’ आहे. पोमेंडी खुर्द गावातील हा मठ अत्यंत साधा आहे. दत्तभक्तांची पावले या मठाकडे वळतात ती या साधेपणामुळे, येथील शांत, प्रसन्न व आत्मसमाधान लाभत असलेल्या वातावरणामुळे.

२०१३-१४मध्ये प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे समाधी शताब्दी वर्ष होऊन गेले आहे. दत्तसंप्रदायातील अनेक उपासना पद्धतींमध्ये सनातनी शाखेचा अंतर्भाव आहे. श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंहसरस्वती, श्री नारायण स्वामी, श्री गोविंदस्वामी यांच्या परंपरेत श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामींचा अतिआदराने उल्लेख व समावेश होतो. श्रावण वद्य पंचमी, शके १७७६ (रविवार, दि. १३ ऑगस्ट १८५४) रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे जन्मलेल्या स्वामींनी साठाव्या वर्षी आषाढ शुद्ध प्रतिपदा शके १८३६ (मंगळवार, २४ जून १९१४) रोजी रात्री साडेअकरा वाजता गुजरातमधील नर्मदातीरावरील श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे समाधी घेतली. कर्म-भक्ती-योग-ज्ञान अशा उपासना मार्गाचा अवलंब करून त्यातील ध्येयपदवी प्राप्त करून त्यांनी अनेक मुमुक्षु भक्तांना मार्गदर्शन केले. यानंतर भक्तोद्धारासाठी आसेतुहिमाचल भ्रमण करून वैदिक धर्म व श्री दत्तसंप्रदायाचा प्रसार केला. (लेखाच्या सर्वांत वर असलेला फोटो माणगाव येथील स्वामींच्या जन्मस्थानातील मूर्तीचा आहे.)

इ. स. १८७३मध्ये विष्णुबुवा पटवर्धन यांचा जन्म मौजे पोमेंडी खुर्द येथे झाला. पटवर्धन हे खोत घराणे होते. तरीही एकंदर आर्थिक परिस्थितीमुळे विष्णुपंतांना भटकंतीचा आधार घ्यावा लागला. त्यांनी भजन-कीर्तनाचा अभ्यास केला होता. हा अभ्यास हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले. त्यांना अनेक कौटुंबिक अडचणी आल्या. ऐन उमेदीत पत्नीचा मृत्यू झाला. मुलगा शिक्षण, व्यवसायासाठी बाहेरगावी गेला. त्यांना अपस्माराचा विकार जडला. अशा परिस्थितीतही भगवंताचे अनुसंधान त्यांनी सोडले नव्हते. काशी तीर्थक्षेत्री गेलेले असताना विष्णुबुवांना दत्तावतारी प. पू. टेंब्येस्वामींची माहिती कळली. त्यांच्या दर्शनासाठी ते ब्रह्मावर्ताला गेले. स्वामींची कृपा त्यांना लाभली आणि त्यांना जडलेल्या अपस्माराच्या व्याधीतून त्यांची मुक्तता झाली आणि ते स्वामींचे एकनिष्ठ भक्त झाले.

स्वामींच्या महात्म्याची प्रचीती विष्णुबुवांना अनेकदा आली. त्यांच्याकडून अनेक उपदेशही मिळाले. मध्ये बऱ्याच काही घटना-घडामोडी घडून गेल्यानंतर विष्णुबुवांनी ब्रह्मगिरीला स्वामींकडून ‘प्रदेशमात्र’ म्हणजेच केवळ वीतभर लांबीच्या पादुका घेतल्या. ‘या पादुका पश्चिम किनारी स्थापन कर’ असा आदेश होताच विष्णुबुवा १९०४ साली पश्चिम किनारी असलेल्या पोमेंडी या आपल्या गावी घेऊन आले; पण त्यांच्या नावावर घर किंवा जागा नव्हती; पण गुरूंबद्दल असलेल्या अतिशय आदरामुळे, स्वतःची जागा खरेदी करेपर्यंत सात वर्षे विष्णुबुवा या पादुका डोक्यावर घेऊन फिरत. भिक्षेतून मिळालेल्या पैशांतून १९१०-११ साली थोडी जागा खरेदी केली आणि तिथे वासुदेवानंद सरस्वती भजन मठ स्थापन केला. १९१७ साली या मठाची विधिवत् स्थापना झाल्याचा उल्लेख आढळतो.

विष्णुबुवांनी सुरू केलेली नित्योपासना आजही त्याच पद्धतीने सुरू आहे. पोमेंडी येथील रहिवासी पटवर्धन भक्तांनी टेंब्ये स्वामी भजन मंडळ स्वतंत्ररीत्या स्थापले आहे. या मंडळामार्फत मठाचे वहिवाटदार मालक व चालक यांच्या पूर्वानुमतीने वासुदेवानंद सरस्वती यांची जयंती, पुण्यतिथी, दत्तजयंती व श्रावणातील एक्का वगैरे धार्मिक कार्यक्रम केले जातात.
पोमेंडी खुर्द येथील हा कौलारू मठ अत्यंत साधा आहे. या मठाला किंवा विष्णुबुवांच्या जीवनाशी कोणत्याही आख्यायिका जोडलेल्या नाहीत. उत्पन्नाचे साधन म्हणून हा मठ उभारलेला नाही. सध्या भजनी मंडळ वर्गणी काढून धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने साजरे करते. या मठाचा कारभार ट्रस्टमार्फत चालवला जात नाही; नव्हे, तशी लेखी इच्छाच विष्णुबुवांनी आपल्या मृत्युपत्रात व्यक्त केली होती. त्यानुसार, त्यांनीच नेमून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार त्यांच्या वारसदारांकडून (क्रम पद्धतीने) व्यवस्था पाहिली जात आहे. या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना आत्मिक समाधान मिळते, असा त्यांचा अनुभव आहे.
वसंत नारायण पटवर्धन हे सध्याचे मठाचे चालक व मालक असून, ते एरंडवणे (पुणे) येथे राहतात.

– वि. ना. पोखरणकर गुरुजी
………
(हा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या पहिल्या दिवाळी अंकात (२०१६) प्रकाशित झाला होता. १०० किंवा त्याहून अधिक वर्षे झालेल्या कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण वास्तू, महान व्यक्ती आदींचा मागोवा त्या अंकात घेण्यात आला होता. त्या दिवाळी अंकाचे ई-बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply