रत्नागिरीच्या किनाऱ्यावर ४६०० जणांनी केली स्वच्छता

रत्नागिरी : सागरी सीमा मंचाने आज आयोजित केलेल्या स्वच्छ सागर तट अभियानात रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्यावर ४६०० जणांच्या समुदायाने स्वच्छता केली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, ठाण्याचे आमदार आमदार संजय केळकर आणि भारतीय तटरक्षक दल सी. ओ. शत्रुजित सिंग यावेळी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सागरी सीमा मंच आणि जिल्हा प्रशासनातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील स्वच्छ सागर तट अभियानाचा मुख्य कार्यक्रम मांडवी समुद्रकिनारी झाला. सकाळी तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात कचरा संकलनासाठी ४ हजार ६०० विद्यार्थी, नागरिक, संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये ३३ शिक्षणसंस्था, २३ सामाजिक संस्था, ५ उत्सव मंडळे, ३५ धार्मिक संस्था, १० गाव भागांचा समावेश होता. यावेळी सर्व उपस्थितांनी स्वच्छ किनारे ठेवण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमात व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, ठाण्याचे आमदार संजय केळकर, अल्ट्राटेक कंपनीचे युनिट हेड डी. एस. चंद्रशेखर, भारतीय तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर शत्रुजित सिंग, पर्यावरण संरक्षण गतिविधी कोकण प्रांतसंयोजक उदय कुलकर्णी, मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दक्षिण रत्नागिरी कार्यवाह डॉ. उल्हास सप्रे, पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर आदी उपस्थित होते. राजीव कीर यांनी सर्वांना किनारपट्टी स्वच्छता दिनाची शपथ दिली. त्यानंतर प्रत्यक्ष स्वच्छता करण्यात आली. राष्ट्रगीताने सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश आयरे यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, ३६ वर्षांत सागरी तट स्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. जलचक्र पाहिले तर जैविक सृष्टी ७० टक्के पाण्यात आहे. समुद्र ही उत्पादक अशी इकोसिस्टीम आहे. कार्बन वायू शोषून घेण्याचे काम ती करते. वातावरण बदलाचा आपण आज अनुभव घेत आहोत. घराच्या बाहेरील घर स्वच्छ ठेवले नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला सहन करावे लागणार आहेत. मानवनिर्मित कचऱ्यामुळे सूक्ष्मापासून महाकाय जीवांना त्रास सहन करावा लागत आहे. सागर परिसंस्थेत आपण प्रदूषण करत आहोत. प्लास्टिकचा भस्मासुराचा अंत केला पाहिजे. प्लास्टिकचे विघटन होत नाही. त्यामुळे त्यातील सूक्ष्म घटक आपल्याला घातक आहेत. विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा वापर कमी करेन, प्लास्टिक विकत घेणार नाही, असा संकल्प आजपासून करावा. ब्रश वापरतो तो चार महिन्यांनी टाकतो. त्यातून कचरा वाढत जातो. रासायनिक खते शेतातून नदी, समुद्रात पोहोचते. जगा आणि जगू द्या या तत्त्वाने वागावे लागेल. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संकल्प स्वतःपासून करा.

आमदार संजय केळकर यांनी सांगितले की, हे अभियान म्हणजे चळवळ आहे. त्यात मोठ्या संख्येने लोकसहभाग आहे. स्वच्छतेची चळवळ लोकसहभागातूनच यशस्वी होणार आहे. आपला परिसर आणि किनाऱ्यावर अभियान करायचे आहे. आजचा दिवस साजरा करतोच आहोत, पुढच्या काळातही मी माझे घर, परिसर आणि शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करीन. एक दिवस नाही तर दररोज हा संस्कार माझ्या अंगी बाणवेन, असा संकल्प करूया.

शत्रुजित सिंग यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकामध्ये सागरी सीमा मंच प्रांत संयोजक संतोष पावरी यांनी सांगितले की, सागरी किनारपट्टीवर सागरी सीमा मंच कार्यरत आहे. सेवा संपर्क, प्रचार, युवा, जागरण, महिला सक्षमीकरण या सर्वांना स्पर्श करीत सागरपूजन, मत्स्य जयंती, आरमार विजय दिवस, पर्यावरण संरक्षण असे अनेक कार्यक्रम देशभक्ती जागृत करण्याचे काम मंच करत आहे. आजचे स्वच्छता अभियान केवळ एकच दिवसापुरते नाही तर आपल्या दैनंदिन वापरात प्लास्टिक – पॉलिथिन कसे वापरावे, त्याचा पुनर्वापर कसा होईल, याची दक्षता आपण घेतली पाहिजे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आपण थांबविला पाहिजे. हीच काळाची गरज आहे, हे आपण ओळखावे व त्वरित जागे व्हावे.

सकाळी ढोलवादनाने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मांडवी जेट्टीवर व्यासपीठ उभारले होते तर किनाऱ्यावर विद्यार्थी, नागरिक उभे होते. रा. भा. शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. आंतरराष्ट्रीय सागरी स्वच्छता दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील स्वच्छता कार्यक्रम जयगड ते जैतापूरपर्यंत झाला. यामध्ये नांदिवडे, मालगुंड, गणपतीपुळे, आरे, काळबादेवी, मिर्‍या, पांढरा समुद्र, मांडवी, भाट्ये, कसोप कुर्ली, वायंगणी, रनपार बीच, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी, वेत्ये, आंबोळगड, जैतापूर, साखरी नाटे येथे स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात वेसवी, बाणकोट, उंबरशेत, उटंबर, आडे, लखडतर हर्णे-पाज, लाडघर, लखडतर वाडी, बुरोंडी, दाभोळ, तरीबंदर, वेलदूर, असगोली, पालशेत, बुधल, बोर्‍या, कोंडकारूळ, वेळणेश्वर, साखरी आगर, हेदवतड, काताळे नवानगर कुडली येथेही अभियान राबविले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply