रत्नागिरी : नैसर्गिक शेतीच्या प्रवासावरील ‘उर्वरसा’ माहितीपट नेपाळणमधील आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखविण्यात येणार असून या माहितीपटाचे लेखन रत्नागिरीची लेखिका सायली खेडेकर हिने केले आहे.
रासायनिक शेतीचे परिणाम धक्कादायक असल्यामुळे शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळत आहेत. पद्मश्री पुरस्कार विजेते सुभाष पाळेकर यांनी घडवलेल्या नैसर्गिक शेतीच्या यशस्वी मॉडेलवर पंढरपूर येथील शेतकरी रामहरी कदम यांनी नैसर्गिक शेतीचे मॉडेल बनवले. या थक्क करणाऱ्या प्रवासावर माहितीपट पुण्यातील दृश्यम कम्युनिकेशन्स आणि जीवभावना संस्थेने साकारला आहे. हा चित्रपट काठमांडूमध्ये (नेपाळ) आयोजित हिमालयन व्हेगन फेस्टिव्हलमध्ये दाखविला जाणार आहे. या माहितीपटाची निर्मिती दृश्यम कम्युनिकेशन्स संस्थेने केली आहे. माहितीपटाचे दिग्दर्शन राहुल नरवणे आणि लेखन रत्नागिरीची सायली खेडेकर हिने केले आहे.
हिमालयन व्हेगन फेस्टिव्हल १६ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. शेतीच्या भविष्याभोवती सार्वजनिकरीत्या एकत्र येण्याची अत्यंत गरज आहे, त्यासाठी हा माहितीपट महत्त्वपूर्ण आहे. रत्नागिरीची सायली खेडेकर दृश्यम कम्युनिकेशन्सची सहसंचालिका असून निवेदिका, व्हॉइसओव्हर आर्टिस्ट म्हणूनही ती काम करत आहे. सहसंचालक राहुल नरवणे चित्रकार असून पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक आहेत.
दृश्यम कम्युनिकेशन्सने यापूर्वी विविध माहितीपट, शॉर्टफिल्म्स बनवल्या असून त्या अनेक ठिकाणी नावाजल्या गेल्या आहेत. यावेळी त्यांनी नैसर्गिक शेतीकडे लक्ष वळवले. यासाठी दृश्यम कम्युनिकेशन्सची संपूर्ण टीम गेले वर्षभर विविध पातळीवर काम करत होती. सिनेमॅटोग्राफर सतीश शेंगाळे, अभिजित रंधावे, एडिटर मदन काळे, सत्यम अवधूतवार, मयूरेश कायंदे, म्युझिकसाठी ओंकार रापतवार व संशोधनासाठी आनंद कुलकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.



