रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे बचत गट, उद्योगिनींचे दिवाळी प्रदर्शन सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे सलग पंधराव्या वर्षी दिवाळीनिमित्त आयोजित महिला बचत गट, उद्योगिनींनी निर्मिती केलेल्या वस्तूंचे दिवाळी प्रदर्शन आजपासून जे. के. फाइल्स येथील साई मंगल कार्यालयात सुरू झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ. युगंधरा राजेशिर्के यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सौ. राजेशिर्के म्हणाल्या की, आपण महिला एकत्रित आलो तर कोणतीही गोष्ट शक्य नाही असे नाही. त्यामुळे महिलांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यातून आपण शिकलो तर स्पर्धा भरपूर आहे. ताणतणावाचे जीवन आहे. मनशांतीसाठी या कार्यक्रमानंतर विशेष कार्यक्रम आयोजित करू. मॉल, ऑनलाइन खरेदी वाढली आहे. त्यामुळे बचत गट, महिला उद्योजिकांना वेगळे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. दर्जेदार वस्तू बनवणे, आकर्षक पॅकिंग करणे, ग्राहकांशी बोलावे कसे या साऱ्याचे प्रशिक्षण आयोजित करू या.

माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे, महिला पतसंस्थेच्या उपाध्यक्षा स्वप्ना सावंत यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी संचालिका सुजाता तांबे, उद्योजिका सौ. पेटकर, आयोजिका प्राची शिंदे आदी उपस्थित होत्या.

प्रदर्शनात दिवाळीसाठी आकाशकंदिल, पणत्या, रांगोळी, उटणे, चविष्ट फराळ, शोभिवंत वस्तू, कपडे, कोकणी मेवा, आयुर्वेदिक प्रॉडक्टस, सौंदर्य प्रसाधने, साड्या, ज्वेलरी, हस्तकौशल्यातून साकारलेल्या वस्तू, शोभिवंत कुंड्या, खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रदर्शनाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध स्पर्धा, लायन्स क्लबतर्फे अॅड. कल्पलता भिडे यांचे व्याख्यान, हिमोग्लोबिन तपासणी, फुलांची रांगोळी स्पर्धा व बक्षीस वितरण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

मान्यवरांचा सत्कार श्रीमती शिंदे यांनी पुष्परोपटे देऊन केला. प्रदर्शनात सुमारे चाळीस स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. संध्या नाईक यांनी सूत्रसंचालन केले. शकुंतला झोरे यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply