जनशिक्षण संस्थानतर्फे गावागावांत कौशल्य विकास प्रशिक्षणाचे नियोजन – डॉ. नातू

रत्नागिरी : रत्नागिरीत सुरू झालेल्या जनशिक्षण संस्थानतर्फे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गावागावांमध्ये अत्यल्प शुल्कात कौशल्यविकास प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती व्यवस्थापन मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू आज पत्रकार परिषदेत दिली.

भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातर्फे आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, सौ. उमा प्रभू यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत जनशिक्षण संस्थान ही योजना सुरू करण्यात आली आहे. मानव साधन विकास संस्था (मुंबई) पुरस्कृत जनशिक्षण संस्थान गेले सहा महिने रत्नागिरीत सुरू असून आता सर्व तालुक्यांत आणि गावागावांत प्रशिक्षण घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेचे शुल्क फक्त १० रुपये आहे. शिकवणी शुल्क ४५० रुपये आहे. तसेच एससी, एसटी, दिव्यांगजन, समाजातील आर्थिकदृष्ट्या दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांसाठी शिकवणी शुल्क आकारले जाणार नाही. संस्थेमार्फत असिस्टंट ड्रेस मेकर, ब्युटी केअर मदतनीस, फळ आणि भाज्या प्रक्रिया व साठवणूक, भरतकाम मदतनीस, ज्यूट हस्तकला उत्पादन निर्मिती, टू, थ्री व्हिलर मेकॅनिक हेल्पर, सहाय्यक संगणक ऑपरेटर, इलेक्ट्रिकल टेक्निकल हेल्प, प्लंबर, स्वच्छता मदतनीस, असिस्टंट वेल्डर, फॅब्रिकेटर हे अभ्यासक्रम व मागणीनुसार अन्य अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहेत. याचा कालावधी ६० दिवस ते १२० दिवस असून उद्योजकता मंत्रालयाने याचा अभ्यासक्रम निश्चित केला आहे.

डॉ. नातू म्हणाले, गावस्तरावर व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. यासोबत साक्षरता, पर्यावरण, आरोग्य, महिला प्रबोधन या विषयांवरही जनजागृती केली जाते. भारताच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त लोकसंख्येमध्ये ग्रामीण जनतेचा समावेश आहे. या जनतेला व्यवसायाभिमुख कौशल्य प्रशिक्षण देऊन या आर्थिकदृष्ट्या उन्नत करणे, स्थानिक व्यापाराला चालना देणे व नवीन व्यावसायिक संधी निर्माण करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे.

या योजनेअंतर्गत १५ ते ४५ वर्षे वयोगटातील अ-साक्षर, नवसाक्षर, औपचारिक शिक्षण मध्येच सोडलेल्या, बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना अनौपचारिक पद्धतीने व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दिले जाते. प्राधान्य गटांमध्ये महिला, एससी, एसटी, अल्पसंख्याक आणि इतर मागास घटकांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील दुर्बल व दुर्लक्षित समाजघटकांपर्यंत किमान पायाभूत सुविधा व संसाधनांसह पोहोचत आहे. किमान २० व्यक्ती इच्छुक असल्यास व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन त्या त्या गावात केले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या प्रशिक्षणार्थ्यांनी पुढे काय केले याचाही पाठपुरावा केला जातो, त्यांना अग्रणी बॅंकेकडून कर्ज मिळाले का, याबाबतही पाठपुरावा करण्यात येतो.

संस्थेचे कार्यालय १६१० ब, तळमजला, निजामपूरकर बिल्डिंग, विहार वैभव कॉम्प्लेक्सच्या मागे, बंदर रोड, रत्नागिरी येथे आहे. अधिक माहितीसाठी (०२३५२) २९९११० किंवा ९७६६४७९११० या क्रमांकावर इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. नातू यांनी केले.

पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष सौ. आदिती सावंत, संचालक सौ. सीमा यादव, विश्वस्त मंडळ सदस्य महेश गर्दे आदी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply