राणी लक्ष्मीबाईच्या स्मारकासाठी दोन एकर जागेचे दान

लांजा : झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या स्मारकासाठी कोट (ता. लांजा) येथील दोन एकर जागा साताऱ्यातील दत्तात्रय नेवाळकर यांनी दान केली आहे. बुधवारी (दि. २ नोव्हेंबर) त्यानिमित्ताने एक छोटेखानी समारंभ दान केलेल्या जागेत करण्यात आला.

कोट येथे तीन वर्षांपूर्वी झालेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राणी लक्ष्मीबाईच्या स्मारकाचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यानंतर संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी भव्य दिव्य स्मारकासाठी जागा मिळविण्याकरिता प्रयत्न सुरू केले. राणी लक्ष्मीबाईचे वंशाच्या साताऱ्यात राहत असल्याची माहिती श्री. लाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी संपर्क साधला आणि तेथील बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय निंबाळकर यांची कोट येथे जागा असल्याची माहिती मिळाली. श्री. लाड यांनी त्यांना राणी लक्ष्मीबाईचे स्मारक उभारण्याकरिता जागा हवी असल्याचे सांगितले. श्री. नेवाळकर यांनी जागा देण्याची तयारी दर्शविली. त्यांच्या मालकीच्या जागेपैकी ८१ गुंठे म्हणजे सुमारे दोन एकर जागा त्यांनी स्मारकाकरिता देण्याचे निश्चित केले.

दरम्यान, सुभाष लाड यांच्या अध्यक्षतेखाली रणरागिणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्टची रीतसर नोंदणी करण्यात आली. या ट्रस्टकडे आपली जागा सुपूर्द केली जाईल, असे श्री. नेवाळकर यांनी सांगितले. त्यानुसार स्मारककरिता आवश्यक असलेल्या त्या जागेची मोजणी आज पार पडली आणि श्री. नेवाळकर यांनी स्मारकाकरिता जागा देत असल्याचे आजच्या समारंभात घोषित केले. या जागेपर्यंत जाण्यासाठी त्याच गावातील ग्रामस्थ मोहन डिके यांनी रस्त्याकरिता जागा देणार असल्याचेही आज घोषित केले. श्री. नेवाळकर आणि श्री. डिके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

श्री. लाड यांनी यावेळी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा असलेल्या राणी लक्ष्मीबाईचे उचित स्मारक कोठेही नाही. तिचे जन्मगाव कोलधे आणि सासरचे गाव कोट ही दोन्ही शेजारची गावे लांजा तालुक्यात आहेत. त्यामुळेच तिचे स्मारक येथे व्हावे, त्यापासून सर्वांना प्रेरणा मिळावी, या हेतूने स्मारकाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी आता जागा मिळाल्याने काम लवकर मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे. आता दान म्हणून मिळालेल्या जागेच्या हस्तांतराची कागदपत्रे लवकरच पूर्ण करण्याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत. त्यानंतर स्मारकाचा आराखडा तयार केला जाईल. लवकरच स्मारक पूर्ण करण्याकरिता तसेच कोट गावात पर्यटकांनी आणि इतिहासप्रेमींनी यावे, यासाठी आवश्यक त्या मूलभूत सोयीसुविधा उभारण्याचा ट्रस्टचा प्रयत्न राहील, असे श्री. लाड यांनी यावेळी सांगितले. भव्य सभागृह, ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय, पर्यटकांनी राहण्यासाठी सुसज्ज सुविधा असलेली निवासस्थाने, तारांगण, अभ्यासिका अशा विविध उपक्रमांचा त्यात समावेश असेल. स्मारकाच्या जागेला झाशीच्या किल्ल्यासारखी तटबंदी असावी, असाही प्रयत्न राहील, असे श्री. लाड यांनी नमूद केले.

आज पार पडलेल्या समारंभात स्मारकासाठी सुरुवातीपासूनच आग्रही असलेले माजी सरपंच शांताराम ऊर्फ आबा सुर्वे, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, संदीप पेडणेकर, अंकुश नारकर, विजय दिवाळे, नामदेव बोलये, अनंत बोलये, संदीप बोलये, वासुदेव बोलये, सखाराम नारकर, सोना पालकर आणि अनेक वाडीप्रमुख उपस्थित होते. समारंभानंतर स्मारकाच्या जागेला एक प्रदक्षिणा घालण्यात आली.

महेंद्र साळवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply