जन्माला आलेले मूल नको असेल, तर आम्हाला दत्तक द्या!

रत्नागिरी : जन्माला आलेले मूल नको असल्यास ते आम्हाला द्या, असे आवाहन जिल्हा महिला आणि बालविकास विभागाने दत्तक सप्ताहानिमित्ताने केले आहे.

नको असलेली गर्भधारणा झाली आणि गर्भपातही करता आला नाही, तर जन्माला आलेल्या मुलाचे काय करायचे, असा विचार करून ते बेवारस ठिकाणी सोडून दिले जाते. परंतु असे न करता संबंधित बाळाला प्रशासनाकडे सुपूर्द केले, तर बाळाला सुरक्षित निवारा व आधार दिला जातो. त्याला सुरक्षित ठिकाणी दत्तक दिले जाते. त्यामुळे नको असलेले बाळ टाकून देऊ नका, असे आवाहन जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर आणि जिल्हा बालसंरक्षण अधिकारी समृद्धी वीर यांनी केले आहे.

जिल्ह्यात महिला आणि बाल विकास विभाग, जिल्हा बाल कल्याण समिती, चाइल्ड लाइन, पोलीस यंत्रणा, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्यामार्फत नवजात अर्भकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे काम केले जाते. पालक सोडून गेलेल्या बालकांच्या पालन पोषणाची आणि निवाऱ्याची जबाबदारी प्रशासनाकडून घेतली जाते. त्यामुळे कोठेही असे अर्भक आढळून आल्यास त्वरित १०९८ हा चाइल्ड लाइनचा क्रमांक तसेच पोलीस यंत्रणा आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाला त्वरित कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

तसेच http://www.cara.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून दत्तक इच्छुक पालक कायदेशीररीत्या मूल दत्तक घेऊ शकतात. त्यामुळे अनाथ निराश्रित बालकांना हक्काचे पालक मिळू शकतात. अवैध पद्धतीने मूल दत्तक घेणे हा गुन्हा आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी (जिल्हा उद्योग केंद्राशेजारी, बोर्डिंग रोड, रत्नागिरी, फोन ०२३५२-२२०४६१) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply