रापण : कोकण किनारपट्टीचे सांस्कृतिक लेणे

सागराचे सान्निध्य लाभल्याने उकडा भात आणि माशाचे कालवण ही कोकणी माणसाची स्वर्गीय सुखाची थाळी. मग माशांचा प्रकार काहीही असो, कोकणी माणूस प्रत्येकाच्या आगळ्यावेगळ्या चवीला मानाचा मुजरा करून यथेच्छ उदरभरण करीत असतो. अर्थात मासे उड्या मारत ताटात कधीच येत नसतात. ते पकडण्यासाठी अनेक प्रकार आहेत. त्यात रापणीची मासेमारी म्हणजे एक संस्थानच! त्याचा रुबाब, त्याची अदब, सारेच आगळे आणि वेगळे! अलीकडे रापणीची ही संस्कृती कोकणच्या किनाऱ्यावरून अस्तंगत होत आहे. म्हणूनच या संस्कृतीच्या वेगळेपणापासून अर्थकारणापर्यंत आणि गीतांपासून नियमांपर्यंत अशा सर्व बाजूंची ओळख करून देणारा हा लेख… सुरेश ठाकूर यांच्या लेखणीतून…
…….
‘ॐ सहनाववतु! सहनौ भुनक्तु! सहवीर्यं करवावहै!
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै।’

हा आपल्या भारतीय संस्कृतीचा महामंत्र! आपल्या भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिलेला आहे. त्याग, संयम, वैराग्य, सेवा, प्रेम, ज्ञान आणि विवेक ह्यावरच भारतीय संस्कृती उभी आहे.

आज ज्या संस्कृतीची आपणास ओळख करून देणार आहे, ती कोकणची रापण संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृतीचेच छोटे रूप! ही संस्कृती आज कोकण किनारपट्टीवरूनही अस्तंगत होत चालली आहे. म्हणूनच तिचा अभ्यास होणे ही काळाची गरज आहे. रापण संस्कृती म्हणजे सर्व संस्कृतींचे माहेरघर जणू!

कोकणी माणसाला सह्याद्रीच्या उंच कड्याचे जेवढे आकर्षण तेवढाच ओढा सागराच्या उत्तुंग लाटांचा! त्याच लाटांच्या धीरगंभीरतेसारखी आणि वाळूच्या मुलायम माणुसकीसारखी ही रापण संस्कृती!

रापण म्हणजे काय रे भाऊ?
सागराचे सान्निध्य अगदी राहत्या घराच्या शेजारीच लाभल्याने उकडा भात आणि माशाचे कालवण ही कोकणी माणसाची स्वर्गीय सुखाची थाळी. मग माशांचा प्रकार पापलेट, कर्ली, इसवण, सवंदाळे, सरंगा, बांगडा, तारली… काहीही असो, कोकणी माणूस प्रत्येकाच्या आगळ्यावेगळ्या चवीला मानाचा मुजरा करून यथेच्छ उदरभरण करीत असतो. अर्थात मासे उड्या मारत ताटात कधीच येत नसतात. ते पकडण्यासाठी येंडी, शेंडी, कांडाळी, तियाणी अनेक प्रकार आहेत. त्यात रापणीची मासेमारी म्हणजे एक संस्थानच! त्याचा रुबाब, त्याची अदब, सारेच आगळे आणि वेगळे! अलीकडे रापणीची ही संस्कृती कोकणच्या किनाऱ्यावरून अस्तंगत होत आहे. त्याची जागा गिलनेट मच्छिमारी, पर्ससीननेट मच्छिमारी आदींनी घेतली. त्यामुळे कोकण किनाऱ्यावर वारंवार मत्स्यदुष्काळ जाहीर करावा लागत आहे, अगदी दर वर्षी. म्हणूनच आपणास रापण संस्कृती समजून घेतली पाहिजे.

एक आगळी संस्कृती
‘रापण’ हा कोकण किनारपट्टीच्या सागरी संस्कृतीचा एक जिताजागता इतिहास. कोणत्याही समाजाला आपल्या प्रगतीची कारणे, अधोगतीची कारणे, आपली संस्कृती, आपला वारसा आपल्या परंपरा माहिती असणे आवश्यक असते. ह्या रापण संस्कृतीला कोकणच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत फार मोलाचे स्थान आहे. म्हणूनच ह्या रापण संस्कृतीच्या पाऊलखुणा प्रत्येक कोकणी माणसाने हृदयाच्या कप्प्यात अगदी ‘मत्स्यगंधा’प्रमाणे जपून ठेवाव्यात. कोकणात नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला शुभारंभ होतो; पण मासेमारीला खरा ऊत येतो (हा खास मालवणी वाक्प्रचार) तो दिवाळीच्या दिवसांच्या दरम्याने. आता रापणीच्या जागा लहान लहान पातींनी (छोटी जाळी) घेतल्या. आंब्याच्या होडीची जागा (ज्याला गाबीत लोक ‘पगार’ असे म्हणत) फायबर बोटींनी घेतली. अगदी त्याच वेळी रापण संस्कृती मावळण्याचे ढग कोकण किनारपट्टीवर जमू लागण्यास सुरुवात झाली. आम्ही लहानपणी पाहिलेल्या किनारपट्टीवरील मोठाल्या रापणी कधीच बंद झाल्या. आता काही भागात आहेत, त्या अगदी लहान लहान हातरापणी. त्यांना ती ‘रापण संस्कृती’ नाही.

‘क्षितिजास पालाण घालणाऱ्या’ रापणी
रापण ही पाट्या – पाट्यांनी बनलेली असते. एक पाटा म्हणजे आठ मीटर बाय आठ मीटर अशी विणलेली जाळी. पूर्वी ९० – ९५ पाट्यांच्या मोठाल्या रापणी असायच्या. एका एका रापणीला ५० ते ६० रापणकर मच्छिमार बांधील असायचे. त्या ६० – ७० कुटुंबांतील २०० – २५० माणसांची ‘तारणहार’ ती रापणच असायची. केवळ पाटे जोडून रापण तयार होत नसे, तर त्या रापणीला सर्वांचीच मनेही जोडली जात. एका माणसासोबत तीन – चार माणसे वावरत असत. रापणीच्या झिलग्यांची पेज, जेवण पोहोचविणे, आपल्या आलेल्या वाट्याचे मासे विकणे, संपूर्ण रापण सुकविणे, वाळत घालणे त्याला आगूळ देणे, तुटलेल्या रापणीचे पाटे शिवणे, ती रापण दुरुस्त करणे, जाळी होडीवर चढविणे, माशांच्या थव्याचा – ज्याला मालवणी भाषेत ‘खांडाव’ म्हणतात – त्याचा अंदाज घेणे. आणि रापण मारून झाल्यावर हमावण्या म्हणत ती ओढणे.

एक तरी ‘हमावणी’ अनुभवावी!
कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘तारू’ अगर ‘गलबत’ आणत असताना अगर समुद्रात लोटताना कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार उत्स्फूर्तपणे जी गीते गातात त्यालाच हमावणी म्हणतात. रापणीची होडी वर काढत असताना किंवा रापण ओढत असताना ह्या हमावण्या सुरू होतात. रापणीची दोन्ही टोके ओढून ती समुद्राबाहेर काढण्यासाठी दोन्ही बाजूंचे २५ – २५ मच्छिमार ती आळवितात. दोरखंडाला एक दांडक्या बांधलेला असतो. त्याला टांगूल असे म्हणतात. प्रत्येक दोरीला अशा जोड्या असतात. टांगलांवर पाठीच्या कण्याचा कमरेकडचा भाग रेलून रापण मागे मागे खेचतात. तेव्हा हमावणीची गंमत रंगात येते. त्यात हमावणारा म्हणजेच शुभारंभ करणारा गोड गळ्याचा एक पुढारी असायचा. तो शुभारंभ करायचा. बाकी सर्व जण त्याला साथ द्यायचे. त्यांचे ते शब्द आणि काव्य जात्यावरच्या ओवीप्रमाणे किंवा पिळेतून जसे सूत निघते एवढ्या सहजतेने निघत असे.

(रापण घालणे, ओढणे, हमावणी, मांगरी दर्शन असा एकत्रित व्हिडिओ लेखाच्या शेवटी दिला आहे. सौजन्य : विराज शिवराज सावंत)

साधारणपणे त्याचा शुभारंभ असा असे. पुढे पुढे स्थलकालाचे संदर्भ जोडून उत्स्फूर्त हमावणी पुढे पुढे सरकत असे. तसे ते मासे भरलेले जाळे मागे मागे किनाऱ्यावर येत असे.

हमावणी अशी असायची –

हमावणारा – ऐलाम्बेऽऽ
कोरस देणारे मच्छिमार – है ले रेऽऽ
हमावणारा – देवी भराडी तू पाव (कुलदेवतेला हाक)
कोरस – है ले याल्लाऽऽ
हमावणारा – अलांबे देवा रवळनाथ तू पाव
कोरस – है ले यालाऽऽ

जसजशी जाळी जवळ यायची, तसे दोन्ही गट जोरदार हमावणी म्हणायचे –

यारी खुदाचीऽऽ दोस्ती पिराची
कोळी माळीऽऽ भरला डोळीऽऽ
डोळका मासा पारधी खासाऽऽ
पारध केलीऽऽ वाया गेलीऽऽ
वायत्या वाऱ्यांचीऽऽ मातन झाली.

अशी हमावणी सुरू होत असे. रापणीला जर मासे भरपूरच लागले असतील, तर मग त्या वेळी हमावणीचे सूर गगनाला भिडत. या हमावण्या त्यांच्या बोलीभाषेत असत. त्यांच्या देवाचे वर्णन चारकमान्यांचे वर्णन त्यांच्या हमावण्यांत असे. बऱ्याच हमावण्या प्रासंगिक असायच्या. समोरचा अथांग सागर आणि डोक्यावरील निरभ्र आकाश हे मच्छिमारांच्या हमावण्यांचे मूलस्रोत असत. मला अनेक हमावण्या अगदी तोंडपाठ होत्या.

रापणीची साधने…. स्केच : पवनकुमार पराडकर, आचरे

रापणीची विविध साधने आता दुर्मीळ
रापण मोठी असायची. त्याची निगराणी घ्यावी लागे. त्यासाठी विविध साधने असायची. त्यांची नावे आणि अस्तित्वही आता कोकण किनारपट्टीवरून अस्तंगत होत आहे. दोन रापणींची कपी अडकविण्यासाठी शिवाजी. कुटी (खतासाठी सुकी मासळी) सुकत घालण्यासाठी ‘भंगारी’, मासळी सुकत घालण्यासाठी उथळ अशी ‘शितरी’, मासळी एकत्र करण्यासाठी ‘लाकडी खोरे’, समुद्रावरच रापणीचे दोर बनविण्यासाठी वापरण्यात येणारा ‘घुगरा’, माशांची वाहतूक करण्यासाठी ‘येंडकुल’, जाळ्यांचे फाळके रापण ओढण्यासाठी, ‘टांगूल’ आणि ‘हरास’ होडीतले पाणी बाहेर काढण्यासाठी वापरण्यात येणारे ‘शेलना’ आणि मासळीच्या मोजमापासाठी चिव्यांच्या काठीचा बेळांचा भला मोठा ‘मण.’ प्रत्येक रापणीला किती मण मासळी मिळाली हे यावरून मापत असत. अशी ही रापणीची विविध साधने, आता पाहायला मिळणेही दुर्मीळ. रापणीच्या खऱ्या वैभवाचा काळ मला देवबाग, मालवण, आचरे या समुद्रकिनाऱ्यावर लुटता आला हे माझे भाग्य!

रापणीची साधने…. स्केच : पवनकुमार पराडकर, आचरे

रापणीची अर्थव्यवस्था आणि श्रमविभागणी
रापण समुद्रातून बाहेर काढल्यावर तेथेच त्या रापणीतील मासळीचा लिलाव होत असे. लिलावाचा वाटा रापण संघाशी संबंधित असलेल्या प्रत्येक मच्छिमाराला तर मिळायचाच. तो तर त्यांच्या रोजगाराचा वाटा असे; पण त्या व्यतिरिक्त प्रत्येक वेळी पाच वाटे जास्त काढले जात असत. त्यातील पहिला वाटा हा रापण संघाचा फंड म्हणूनच काढला जाई. त्यातून जमा होणारी रक्कम एकत्र ठेवण्यात येई. ज्येष्ठत्वाने अगर अपंगत्वाने निवृत्त होणाऱ्या मच्छिमाराला निवृत्त होताना यातून रक्कम देण्यात येत असे. दुसरे दोन वाटे ‘शिमगा’ आणि ‘दिवाळी’ ह्या सणांसाठी काढले जात. त्या रकमेतूनच दोन्ही सणांना मच्छिमार बांधवांना उत्सव बोनस किंवा पोस्त देण्यात येत असे.

चौथा वाटा पावसाळीसाठी काढला जायचा. संपूर्ण पावसाळा सिझनमध्ये रापणी बंद असल्याने वर्षभर जमलेल्या ह्याच रकमेतून मच्छिमार बांधवांना पावसाळी पगार देण्यात येत असे आणि पाचवा वाटा उचल म्हणूनच काढला जायचा. मच्छिमार बांधवांना तातडीची मदत लागली, तर ती या रकमेतून उचल म्हणून परतफेडीच्या बोलीवर देण्यात येत असे. अशा प्रकारे ‘कामगार कायदे आणि नियम’ माहीत नसलेल्या अल्पशिक्षित मच्छिमारांनी आखून दिलेली अर्थव्यवस्था तोंडात बोट घालायला लावते. एखाद्या मच्छिमाराचे लग्न ठरले, तर लग्नाच्या वेळी वरासभर पगारी रजा दिली जात असे. म्हणजेच त्या वेळी रापण लागली असेल, तर त्याला रापणीचा वाटा घरपोच होत असे. अशी रजा नवऱ्या मुलाच्या लग्नाचा पाच दिवसांचा पूर्ण सोहळा पूर्ण होईपर्यंत मिळत असे.

ज्ञानेश देऊलकर

रापण संघातील सदस्याच्या घरात कोणाचा मृत्यू झाला असेल किंवा इतर कार्य असेल, तेव्हा कार्य पूर्ण होईपर्यंत अशा प्रकारे भरपगारी रजा दिली जात असे. भरपगारी रजा याचाच अर्थ कामाला न येता मासळीचा वाटा घरपोच. त्या वाट्याचे काय करायचे, कोणाला विकायचा ते तो ठरवेल. आपल्या रापण संघात असलेल्या मच्छिमार बांधवाच्या मुलीचे किंवा मुलांचे लग्न ठरले असेल, तर सर्व मदत तो रापण संघ बांधिलकीच्या नात्याने करत असे. लग्नमंडपापासून ते जेवणाच्या व्यवस्थेपर्यंत सर्व जण एकजुटीने मदत करीत असत. रापण संघात कोणी आजारी पडला, तर सर्व खर्च रापण संघच करीत असे. ही सहजीवनाची आगळीवेगळी माहिती मालवण येथील मच्छिमार संघटनेचे नेते (स्व.) ज्ञानेश देऊलकर सर यांनी मला सांगितली होती.

किनाऱ्यावर आपण सारे भाऊ भाऊ
रापण संघात खरे सहजीवन असे. तंटा-बखेडा अजिबात नव्हता. आचरे गावातल्या दक्षिणवाडा रापण संघाचे ७५ वर्षे वयाचे सुरेंद्र टिकम याबाबत अधिक माहिती सांगताना म्हणाले, ‘रापण संघात हेवेदावे नसायचे, याला कारण प्रत्येक रापण संघाने स्वीकारलेली अलिखित घटना. किनारपट्टीचा भाग ज्या ठिकाणी कमी असेल आणि रापण संघांची संख्या जास्त असेल, तेथे ‘पालाव’ पद्धतीने रापणी मारण्यात यायच्या. म्हणजे रापणीच्या वेळा ठरवून दिलेल्या असायच्या. त्याचे कोणीही उल्लंघन करीत नसे. ज्या समुद्रकिनाऱ्यावर कमी रापण संघ असायचे, त्या ठिकाणी ‘जेची आग तेचो सोडो’ या पद्धतीने रापण घालण्यात यायच्या. ‘जेची आग तेचो सोडो’ याचा अर्थ मासळीचा समुद्रात शोध लावण्यासाठी प्रत्येक रापण संघाचा एक तज्ज्ञ मत्स्यशोध जाणकार असायचा. तो समुद्रातून सुंभाचा ढलपा जाळून समुद्रातूनच किनाऱ्यावर विशिष्ट खाणखुणा करायचा. त्या खुणेवरून कोणत्या प्रकारची किती मासळी आहे हे किनाऱ्यावरील जाणकार रापणकर ओळखायचे. ज्या रापण संघाच्या जाणकाराने सर्वांत प्रथम आग दाखविली असेल, तोच रापण संघ रापण टाकायला रापणीची होडी समुद्रात ढकलायला सुरुवात करीत असे. अन्य रापण संघ त्या वेळी रापण घालत नसत.

असे होते सागरी नियम
जेव्हा समुद्रकिनाऱ्यावर काही अपरिहार्य कारणामुळे मासेमारी बंद करावी लागत असे, तेव्हा समुद्रकिनाऱ्यावरील सर्वांत ज्येष्ठ श्रेष्ठ मच्छिमार किनारपट्टीवरील हिरवीगार ‘मर्यादावेल’ नामक वेल तोडून रापणीच्या होडीच्या नाळीत म्हणजेच पुढील भागात टाकत असे. ती रचना, आदेश मानून इतर होड्यांच्या नाळीत ती मर्यादावेल टाकून तो आदेश सर्व जण मानत. यालाच ‘दुराई’ टाकणे असे म्हणत. जोपर्यंत ‘दुराई’ उठत नाही, तोपर्यंत कोणीही मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात जात नसे. केवढी ही स्वयंशिस्त!

त्याचप्रमाणे रापण घालायची असल्यास त्या सर्वांनाच ‘रापण कधी घालणार’ याची वर्दी रापणीचा मुखिया द्यायचा. ती वर्दी ऐकून कोणी रापण ओढायला आला नाही, तर शिक्षा म्हणून त्याच्या वाट्यात कपात होत असे. त्या वर्दीला ‘पानसुपारी’ म्हणत. वर्दी म्हणजे रापण कोणत्या वेळी घालणार याची वेळ जाहीर करणे. त्या वेळेबाबतही रापण संघात गुप्तता पाळली जायची, हे विशेष.

या मांगरीत माझ्या…
प्रत्येक रापण संघाची समुद्रकिनाऱ्यावर स्वत:ची अशी जमीन असे. त्या जमिनीवर त्या रापण संघाची ‘मांगरी’ असे. ती मांगरी म्हणजे झापांनी शाकारणी केलेली दुपाखी भव्य अशी वास्तूच! ती मांगरी म्हणजे प्रत्येक रापण संघातील भागधारकांचा जीव की प्राण! यामध्ये दोन होड्या. एक रापणीची मोठी होडी व दुसरी मासे शोधणारी होडी, अशा होड्या पावसाळी हंगामात असतात. तसेच उलांडी, रापणीची बावकांडे, छोटा पगार, रापणीचे पाटे, रापणीचे दोरखंड, आदी सामग्री ठेवण्याची व्यवस्था त्या मांगरीत करण्यात आलेली असे. या मांगरीला मधोमध एक मोठी मुहूर्तमेढ असे. मुहूर्तमेढ म्हणजे मधोमध उभारलेला खांब. त्या मुहूर्तमेढीवर मारुती, भद्रकाली, रामेश्वर आदी देवतांची तसबीर लावलेली असे. तिला दिवाबत्ती लावण्याची सोय असे. रात्री-अपरात्री केव्हाही रापण लावावी लागे. त्यामुळे सर्व रापणकरी आपले अंथरूण पांघरूण त्या मांगरीतच ठेवत. तसेच हिशेबाच्या वह्या, पैशांचा हिशेब आदी त्या रापण संघाचे सर्व रेकॉर्ड त्या मांगरीतच असे. त्या ठिकाणी भागधारकांची हजेरी ठेवणे, साहित्यखरेदीच्या नोंदी ठेवणे, रापण संघाची देवकार्ये पार पाडणे आदी कामे होत. प्रत्येक रापण संघाची ती मांगरी म्हणजे कार्यालय, निवास, मनोरंजन केंद्र, धार्मिक स्थळ आदी ‘ऑल इन वन’च!

रापण संघाचे सांस्कृतिक जीवन
प्रत्येक रापण संघ न चुकता काही धार्मिक विधी साजरे करीत असतात. त्यांचे जीवन त्या तरंगत्या लाटांवरच! म्हणूनच ईश्वरावर त्यांचा भरोसा जास्त असतो. दर वर्षीचे मांगरीतील ब्राह्मणभोजन, वाडवाळ विधी, सत्यनारायण पूजा, शिमगोत्सव आदींमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतात. ब्राह्मणभोजन मांगरीतच होते. ब्राह्मण पूजाविधी करून जेवण करतात. सर्व भागधारक जेवायला असतात. ‘वाडवळ’ हे शाक्त देवतांना शांत करण्यासाठी असते. कोंबडी, बकरे यांचे बळी देतात. सर्वांसाठी मांसाहारी जेवणाची मौज असते. रापणकरांचा शिमगा तर औरच असतो. देवाचा मांड भरून नाच-गाणे होते. नाटके होतात. दशावतारी नाटकेदेखील होतात. काही काही ठिकाणी रापण संघाची बँडपथकेही असतात. काही काही हौशी रापण संघ आपली कलापथकेही स्थापन करतात. पूर्वी देवबाग, मालवण, आचरे आदी किनारपट्टीवर रापण संघांनी आपल्या रापणीच्या मांगरीजवळ माडाच्या बागा तयार केल्या आहेत. जेव्हा रापण नसेल, तेव्हा त्या बागेत ते राबत. त्यांना मासळीचे खत दिले जाई. पाणी तेथील छोट्या छोट्या विहिरींतून काढून दिले जाई. त्या विहिरींना ‘डुरके’ असे म्हणत. त्यातील पाण्यावर बागा उभ्या करीत असत. ज्या वेळी रापणीचा धंदा बंद असेल, त्या वेळी ते कल्पवृक्ष त्यांच्या मदतीला धावून जात. किती हे सुंदर नियोजन!

अनेक साहित्यिकांच्या साहित्यातही ‘रापण’
रापणीची ‘भूल’ अनेक साहित्यिकांना पडलेली आहे. कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने आदींमध्ये त्यांनी रापणीचे वर्णन केलेले आहे. प्रातिनिधिक स्वरूपात ह्या ठिकाणी मी दोन उदाहरणे देत आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘माझा गाव, माझा मुलुख’ ह्या ललित पुस्तकात ‘मिजास मालवणची’ हा लेख आहे. त्या लेखातील वर्णन असे –

मधु मंगेश कर्णिक

रूपेरी बांगड्या, तारल्यांनी फडफडणारी रापण किनाऱ्यावर लागते तेव्हाचे दृश्य विलक्षणच असते. रापणीची दोन्ही टोके ओढून ती समुद्रातून बाहेर काढण्यासाठी दोन्ही बाजूला पांच-पंचवीस मच्छिमार ओढत असतात. नि ‘हायल्लेस हायल्लेस’ हे ‘त्यांनाच कळणारे आणि स्फुरण आणणारे’ शब्द जोरजोराने ओरडत रापण ओढू लागतात. घटकाभरातच समुद्रातून रापण बाहेर येऊ लागते नि आत सापडलेले हजारो मासे पाण्याबाहेर येतात. त्यांना पकडून किनाऱ्यावर टाकण्यासाठी मच्छिमार बायकांची एकच धांदल उडते. वर कावळे, घारी भिरभिरत असतात. रापणीवर झडप घालून मासे वरच्यावर पळविण्यात त्यांचा पहिला नंबर. पाठोपाठ गोरगरिबांची पोरे रापणीतून निसटलेले बारीकसारीक मासे पळवतात. त्यांची धावपळ तर पाहण्यासारखी असते; पण सगळ्यात लक्षात राहते ती पाण्याबाहेर आलेल्या हजारो रूपेरी जिवंत माशांची अंतकाळची व्याकूळ तडफड!

मालवणचे सुपुत्र, ज्येष्ठ चित्रकार आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या फाइन आर्ट पेंटिंग विभागाचे माजी डीन आदरणीय प्रल्हाद अनंत धोंड यांनी आपल्या आत्मचरित्रालाच ‘रापण’ हे नाव दिले आहे. त्या आत्मचरित्राच्या प्रस्तावनेतच ते आपण आपल्या आत्मचरित्राचे नाव ‘रापण’ असेच का ठेवले, ते सांगतात.

प्रल्हाद अनंत धोंड

माझ्या आत्मचरित्राला ‘रापण’ हे नाव कोकणातल्या गाबितांच्या रापणीवरूनच सुचले. लांबलचक प्रचंड जाळे समुद्रात दूरवर पसरून त्यात मासे अडकले, की ते जाळे दोन टोकांनी वीस-वीस माणसे ओढून किनाऱ्याला आणतात. त्यात मोरी, इस्वण, रावस, दाडा इत्यादी मोठे मासे आणि बांगडे, पेडवे, शेतके, मुडदशा इत्यादी लहान मासे असतात. या सर्व माशांचे जेवढे जाळे ओढणारे तेवढे वाटे किनाऱ्यावर घालतात; पण एक जास्त वाटा असतो. तो ‘देवाचा वाटा.’ त्यातील हवे ते आणि हवे तेवढे मासे कुणीही फुकट नेऊ शकतात. माझ्या आठवणीच्या ‘रापणी’च्या या पुस्तकात आहे ‘फक्त देवाचा वाटा.’ या देवाच्या वाट्यातील आपणाला आवडेल ते घेऊन जा.

प्रल्हाद अनंत धोंड यांची किती छान कल्पना – ‘देवाचा वाटा!’

या पुस्तकात हमावणीचे छानदार वर्णनही प्रल्हाद धोंड यांनी केले आहे.

नारळी पौर्णिमेनंतरच रापणी सुरू व्हायच्या. शिवकालीन प्रथेप्रमाणे सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवाजीचा सोन्याचा नारळ (आता बेगड लावलेला) समुद्रात टाकल्याची वर्दी मिळाल्याशिवाय गावकऱ्यांनी समुद्रात नारळ टाकावयाचा नाही. त्यानंतरच नारळाची वृष्टी समुद्रात होई. हा समारंभ झाल्यावर सर्व लोक समुद्राचे पाणी मस्तकाला लावून ‘रापणी’ (फतेमाऱ्या) लोटण्याचा कार्यक्रम बघायला यायचे. आम्हा कोकणातल्या लोकांचे जीवन सागराशी एकरूप झाले आहे. त्याला तृप्त केल्याशिवाय आमचे व्यवहार कधीही सुरू होणार नाहीत.

लोखंडी दोरखंडांनी बांधलेल्या फतेमाऱ्या शे-पाऊणशे माणसांनी ढकलायच्या, तेही रगाड्याच्या मदतीने. तो रगाडा फिरवताना जोर येण्यासाठी गाबीत, तांडेल लोक गाणी म्हणायचे.

‘व्हलय रे तारया होऽडी
यमना बुडाला पयल्या तिरी’

रगाडा फिरवणारे लोक कुचराई करू लागले, तर त्यांना चीड आणण्यासाठी खास इरसाल गाणी म्हटली जात. पण त्यात कधी कोणाला अश्लीलता वाटण्याचा प्रश्नच नव्हता.

चित्रकार प्रल्हाद अनंत धोंड यांनी आपल्या रापण या पुस्तकात वर्णन केलेली ही इरसाल मालवणी गाणी म्हणजेच हमावण्या. त्या पहिल्या पावसाळ्यानंतर ‘तारू’ समुद्रात लोटण्याच्या हमावण्या!

उदयकुमार आजगावकर

रापण बांधून समुद्रातच ठेवणे – एक प्रकार!
ज्यांचे बालपण देवबागच्या किनारपट्टीवर गेले, ते ठाणे येथील ज्येष्ठ आणि प्रथितयश मूर्तिकार उदयकुमार आजगावकर यांनी मला रापणीच्या समुद्रात बांधून ठेवण्याच्या आगळ्यावेगळ्या मनोरंजक प्रथेविषयी सांगितले. ते म्हणाले, ‘पूर्वी मासळी टिकविण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर बर्फ नसायचे. शीतगृहे नव्हती. मासळी वाहून नेण्यासाठी तशी दळणवळणाची साधने नव्हती. एखाद्या दिवशी एखाद्या रापणीला प्रचंड रापणी मिळाली असेल, तर ती रापण समुद्रकिनारी पाण्यातच दोन मोठाली होडी आणि दोरखंडांनी बाहेरच बांधून ठेवण्यात येई. त्याला रापण फारावून ठेवणे असे म्हणत. त्यानंतर किनाऱ्यावरील किंवा आजूबाजूच्या बागायतदारांना रापणीच्या मुखियाकडून निरोप जायचे. त्यांना माडांच्या बागायतीला खत घालण्यासाठी ती मासळी विकत देत. जसजसे बागायतदार येत, तसतशी त्यांना जिवंत मासळी जशी लागेल तशी देण्यात येत असे. काही काही वेळा पाच ते सहा दिवस रापण बांधून ठेवावी लागत असे, एवढी प्रचंड मासळी मिळायची. त्यांची मोजदाद मणावर होत असे.’

उदयकुमार आजगावकर आणि त्यांचे मामा (सीताराम विष्णू सामंत – नमस परुळे) यांनी तेथे बांधून ठेवलेल्या रापणीमधून मत्स्यखरेदी केलेली आहे.

आजगावकर पुढे सांगतात, ‘त्या वेळी सर्व व्यवहार विश्वासावर चाले. रापण मंडळाला त्वरित पैसे द्यावे लागत नसत. संपूर्ण किनारपट्टी एकमेकांवर असलेल्या विश्वासाने वागायची!’

रापण – संस्कृतीचे एक लेणे!
अशी ही रापण नावाची संस्कृती! केवळ कोकण किनारपट्टीलाच नाही, तर सर्व मानवजातीला बंधुभावाची, समतेची, सलोख्याची शिकवण देणारी संस्कृती हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मांचे लोक किनारपट्टीवर एका तालात, एका सुरात ‘ऐलाम्बे ऽऽ है लै याल्ला’ करायची ती संस्कृती! आता किनारपट्टीवरून पूर्ण अस्तंगत झाली आहे. रापणीची पारंपरिक मच्छिमारी गेली आणि आता किनाऱ्यावर पर्ससीननेट आणि पारंपरिक मच्छिमार यांचे लढे होऊ लागले. मासळी समुद्रातून ओरबाडून काढणे सुरू झाले. सारा समुद्रकिनारा अशांत झाला.

परंपरेने ज्या अनेक गोष्टी चालत आल्या, त्यातीलच ही रापण! किती थोर परंपरा आपल्या किनाऱ्याची! आपल्या समाजाला अशा परंपरांच्या इतिहासाची फार गरज असते. आपल्या प्रगतीचा काळ कोणता, अधोगतीची कारणे कोणती, हे त्या परंपरा, ह्या संस्कृती आपणास किनाऱ्यावरील दीपस्तंभ बनून दाखवत असतात. म्हणूनच पुढील पिढीसाठी रापण संस्कृतीचे एक माहितीपूर्ण संग्रहालय कोकण किनारपट्टीवर शासनाच्या वतीने व्हावे. आपल्या दृष्टीसमोरील अथांग सागर आणि माथ्यावरील निळेशार अंबर यांनाच साक्षी ठेवून ही रापण संस्कृती आमच्या मच्छिमार बांधवांनी निर्माण केली. पुढील अनेक पिढ्यांना त्याग, संयम, सेवा, प्रेम, ज्ञान, विवेक यांचे दर्शन घडविणारी ही संस्कृती! नव्हे हे संस्कृतीचे लेणेच जणू! त्याचे स्मारक झाले नाही, तर पुढील अनेक पिढ्यांना ती हमावणीच म्हणावी लागेल.

पारध केली ऽऽ वाया गेली ऽऽ
म्हयनत केली ऽऽ वाया गेली ऽऽ
वायत्या वाऱ्याची ऽऽ मातन झाली ऽऽ
है ले याल्ला ऽऽ याला याल्लाऽऽ
ऐलाम्बे ऽऽ है ले याल्ला ऽऽ

(रापण घालणे, ओढणे, हमावणी, मांगरी दर्शन असा एकत्रित व्हिडिओ सोबत दिला आहे. सौजन्य : विराज शिवराज सावंत)
(लेखातील रापणीचे फोटो : सौजन्य : महेंद्र पराडकर, मालवण)

  • सुरेश श्यामराव ठाकूर
    (ललित लेखक, स्तंभलेखक; कार्योपाध्यक्ष, बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण; कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष; अ. भा. साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष)
  • पत्ता : १२८, आचरे-पारवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६१४
  • मोबाइल : ९४२१२ ६३६६५
  • ई-मेल : surshyam22@gmail.com
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply