हातखंबा (ता. रत्नागिरी) येथील मध्यवर्ती ठिकाणी रस्त्यावर करवंदे, काजूगर, आंबे विकता विकता एक उद्योजक भविष्यात फणसकिंग झाला. झापडे (ता. लांजा) येथील या यशस्वी उद्योजकाची यशोगाथा.
………

गोळप (ता. रत्नागिरी) येथे गोळप कट्टा उपक्रम ऑगस्ट २०१८ मध्ये सुरू झाला. या उपक्रमाच्या सदतिसाव्या कार्यक्रमात मान्यवर म्हणून मूळ हातखंबा येथील मात्र आता कर्मभूमी झापडे (लांजा) असलेले आणि फणसकिंग हरिश्चंद्र देसाई आणि फणस विषयात नावीन्यपूर्ण काम करत असलेले त्यांचे सुपुत्र मिथिलेश देसाई यांच्याशी संवाद साधला गेला. त्यातून उलगडत गेला कोकणातील यशस्वी उद्योजकाचा यशस्वी प्रवास. गोळप कट्टा उपक्रमाने हरिश्चंद्र देसाई यांना बोलते केले. त्यांनी आपला संपूर्ण प्रवास यावेळी सांगितला. तो त्यांच्याच शब्दांत.
माझा जन्म हातखंब्याचा. लहानपण तिथे गेले. वडील मुंबईला पान दुकानात नोकरीला होते. महिना शंभर रुपये पगार मिळायचा. त्यातील तीस रुपये ते घरी पाठवायचे. प्रचंड गरिबीमुळे आणि आणखी भावंडे असल्याने लहानपणी जबाबदारी अंगावर पडली. चौथीपासून हातखंबा तिठा येथे करवंदे, काजूगर, आंबे, चहा विकून शिक्षणासाठी आणि कुटुंबासाठी हातभार लावत होतो. या कष्टाच्या पैशांनी बीएस्सीपर्यंत शिकलो. काहीतरी वेगळे करायचे, अशी खूप जिद्द मनात होती. पण आधी नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. रत्नागिरी एमआयडीसीत कोकण कॅप्सुल कंपनीत नोकरी लागली. नंतर एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधून एक्स रे टेक्निशियन म्हणून कॉल आला.
शिरोडा (जि. सिंधुदुर्ग) येथे पोस्टिंग झाले. ती सरकारी नोकरी होती. त्यामुळे खासगी नोकरी सोडून शिरोडा येथे कामावर रुजू झालो. कामाची काहीही माहिती नव्हती. पण सगळे शिकून घेतले. कोणी रजेवर असेल तेथे मी, असा पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा फिरलो. तेथे ३२ वर्षे प्रामाणिकपणे आणि सचोटीने नोकरी केली. लांजा येथे १९९० साली बदली झाली. दहा वर्षआंनी २००० साली पत्नीचे दागिने गहाण ठेवून आठ एकर जमीन घेतली. तेथे काजूची झाडे लावली. आणखी चार वर्षआंनी २०१४ साली दापोलीत फणसविषयक कार्यशाळा होती. लहानपणी आई फणसाचे विविध प्रकार करत असे. ते डोक्यात होते. त्यामुळे त्या कार्यशाळेला गेलो. तेथे चार दिवस फणसाबद्दल खूप माहिती मिळाली. त्याबाबाबत रस निर्माण झाला. मग २०१५ साली केरळमधून ४०० फणस कलमे आणून लावली. मी फणस लावतो, म्हणून लोकांनी मला वेड्यात काढले होते. मात्र दोन-तीन वर्षांतच फणस धरायला लागल्यावर लोकांचे कुतूहल वाढले. नंतर २०१९ साली मी सेवानिवृत्त झालो. त्यानंतर पूर्णवेळ फणस या विषयात लक्ष द्यायचे ठरविले.
आता सध्या २७ एकरमध्ये ८६ प्रकारच्या काप्या फणसाची लागवड केली आहे. सुमारे १४०० झाडे आहेत. प्रत्येक झाडावर सरासरी २ किलो ते ५० किलोचे फणस लागतात. लोकांची कलमांची मागणी वाढू लागल्याने नर्सरी सुरू केली. पूर्ण महाराष्ट्रभर तसेच इतर राज्यांत कलमे गेली. यावर्षी २० हजार कलमे पाठवली गेली. त्यातून शेकडो एकर जमिनीत फणस लागवड झाली. अमेरिकेत फणसाची दोन टन पाने पाठवली. कॅन्सरवर औषध बनवण्यासाठी फणस पानाचा अर्क वापरला जातो, असे मला सांगण्यात आले. त्यनंतर पुन्हा ५ टन पानांची ऑर्डर होती, मात्र पाने तोडणीचा मजुरीचा खर्च जास्त होत असल्याने ती पाठवली नाही. पण फणसाच्या इतर उपपदार्थांवरही लक्ष केंद्रित केले. चारखंडाचे पशुखाद्य होते, आठळ्यांमध्ये प्रचंड प्रोटीन आहे. एकंदरीत फणस हा कल्पवृक्ष आहे, याची खात्री मला पटली आहे. फणस झाड कोकणाला नक्कीच समृद्ध बनवेल.
श्री. देसाई यांचे पुत्र मिथिलेश देसाई यांनीही अधिक माहिती दिली. त्यांचे हे मनोगत त्यांच्याच शब्दांत –
लहानपण लांजा येथे गेले. दहावी-बारावीला छान मार्क होते. यूपीएससी करायचे डोक्यात होते. सिव्हिल सर्व्हिसमध्ये राहुरीच्या कृषी विद्यापीठाची मुले सगळ्यात जास्त असतात. त्यामुळे राहुरी विद्यापीठात गेलो. कृषि अभियांत्रिकी पदवी उत्तम मार्कांनी मिळविली. यूपीएससीची मुख्य परीक्षाही दिली. या काळात गावाला अधूनमधून येत असताना बाबांचे फणसाचे प्रयोग पाहत होतो. त्यात रुची वाढत गेली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकदा केरळला फणस प्रदर्शनात गेलो होतो. तेथेच ठरवले की यापुढे युपीएससीचा नाद सोडून फणस या विषयात काहीतरी करायचे. मी नोकरी करू नये, असा वडिलांचा आग्रह होताच. मध्यंतरी चिरेखाणीसारखे काही व्यवसाय करून अनुभव घेतला होता. फणस विषयात कुटुंबीयांचे पाठबळ मिळाले. बाबांनी पाया रचून ठेवला होता. जुन्या आणि नव्या पिढीमध्ये वैचारिक मतभेद असतात, तसे आमच्याकडे नाहीत. आमचा खूप चांगला सुसंवाद आहे त्यामुळे खूप सोपे गेले. आता फणस या विषयातच काहीतरी करायची इच्छा आहे. देशातील पहिले फणस रिसर्च सेंटर झापडे (लांजा) येथे व्हावे आणि तिथून लोकांना अद्ययावत माहिती, प्रशिक्षण, रोपे उपलब्ध करून द्यावीत, अशी संकल्पना आहे. फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे. सरकारचा पाच कोटी रुपयांचा फणस प्रक्रियेसाठीचा स्मार्ट प्रकल्प मंजूर झाला आहे. अनेक ठिकाणांहून लोक फणसबाग बघायला येतात. फणस लागवडीबाबत जागृती होत आहे. अलीकडेच फणसाची ३०० रोपे मॉरिशसला निर्यात केली. माती नसलेल्या या रोपाचे वजन प्रत्येकी फक्त १९ किलो झाले. निर्यातीविषयीची माहिती घेतल्यामुळे बार्शीची सीताफळ रोपेही निर्यात करता आली. फणस लागवड अत्यल्प खर्चात होते. नंतर फवारणी, पाणी खर्च नाही. शिवाय आता पंधरा फुटापर्यंतच वाढणाऱ्या जाती उपलब्ध असल्याने लोकांनी फणस लागवड, फणस प्रक्रिया याकडे वळावे, असे वाटते.
याशिवाय दोघा पितापुत्रांनी असंख्य अनुभव आणि माहिती दिली. त्याचबरोबर श्रोत्यांच्या प्रश्नांचे, शंकांचे परिपूर्ण समाधान केले. गोळपसारख्या गावात असा नावीन्यपूर्ण उपक्रम सातत्याने घेत असल्याबद्दल अविनाश काळे यांचे कौतुक करून जास्तीत जास्त तरुणांनी अशा कार्यक्रमातून हजेरी लावली पाहिजे, असे या दोघांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
(संपर्क : अविनाश काळे, गोळप, ता. रत्नागिरी – 94223 72212)

