रत्नागिरी : पुढची पिढी नेहमीच आपल्यापेक्षा पुढे आणि अद्ययावत असते. मात्र त्यांच्यासमोर चांगल्या आदर्शांची गरज आहे. कारण मुले अनुकरण करतात. आपण चांगले वागलो तरच हे शक्य आहे. आपण स्वतःपासूनच बदल घडवायला सुरवात केली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सौ. रेणू दांडेकर यांनी केले.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे यावर्षीचे विशेष पुरस्कार आणि विद्यार्थी गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ आज सायंकाळी येथील राणी लक्ष्मीबाई सभागृहात झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, आपली तत्त्वे ठाम असावी लागतात आणि आचारात, विचारात बदल करायला हवा आहे. माझा विकास म्हणजे दुसऱ्याला त्रास नको, सर्वांचा विकास हवा. संत ज्ञानेश्वरांनीही ज्ञानेश्वरी लिहिली हासुद्धा मोठा बदल आहे. लोकांसाठी लिहिले म्हणून ज्ञानेश्वरीचे लोकज्ञान झाले. अनेक लेखकांनी पुस्तकी ज्ञान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे.
छोट्या छोट्या गोष्टी आणि चिखलगावातील शाळेत केलेल्या उपक्रमांची माहिती देत बदल कसा स्वीकारू या, याविषयावर सौ. दांडेकर यांनी सोप्या भाषेत विवेचन केले. त्या म्हणाल्या, आपली कुटुंब व्यवस्था टिकायला हवी आहे. तुम्ही स्वतःला सूचना द्या, म्हणजे त्या स्वीकारायला शिकाल. मुलांना वाचा सांगताना आपणसुद्धा वाचले पाहिजे. त्याकरिता प्रत्येकाचे योगदान हवे. परीक्षेतले गुण म्हणजे आयुष्य नाही. बदल मनातून व्हायला हवा आणि स्वीकारायला शिकले पाहिजे.
यावेळी बौद्धिक संपदा विभागातील यशस्वी उद्योजिका म्हणून भारत सरकारने गौरव केलेल्या सौ. शलाका टोळ्ये, पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल अमोघ पेंढारकर यांचाही विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या चैतन्य पाध्ये याचा पुरस्कार त्याच्या आईने स्वीकारला. पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी मनोगत व्यक्त करून कऱ्हाडे संघाचे आभार मानले. हैदराबादमध्ये २१ किमीची मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या राजीव टोळ्ये यांनाही यावेळी गौरवण्यात आले. पुरस्कारप्राप्त तन्मय हर्डीकर आणि सौ. कल्याणी तन्मय हर्डीकर हे दोघेही प्रकृतिअस्वाथ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित केले. त्यांच्या वतीने रुद्रांश लोवलेकर याने मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे, ठाणे कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे कार्यवाह संदीप कळके आणि पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते. जुई डिंगणकर हिने स्वागत गीत सादर केले. सौ. रेणुका मादुस्कर यांनी सूत्रसंचालन केले. सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

