मुंबई : येत्या शनिवारी (दि. ३ डिसेंबर) गीता जयंतीच्या निमित्ताने गीत गीतामृत हा सांगीतिक कार्यक्रम बोरिवली येथे होणार आहे.
श्रीमद्भगवद्गीता एक प्राचीन ग्रंथ. ‘गीतोपनिषद’ म्हणूनही तो ओळखला. गीतेमधील १८ अध्यायामध्ये ७०० श्लोक आहेत. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाला उच्च जीवन जगण्याची प्रेरणा देणारा हा ग्रंथ आहे. ‘गीते’च्या माहात्म्याला परिचयाची गरज नाही. ही अमृतवाणी साक्षात ईश्वरी आहे. कृष्णाच्या मुखातून प्राप्त झाली आहे. ही ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोगाचा त्रिवेणी संगम आहे. भगवद्गीतेवर अनेक मान्यवरांनी नाटक, नृत्य आणि संगीताचे असंख्य कार्यक्रम आणि साहित्यप्रकार जगभरात विविध माध्यमांमधून प्रकट झाले आहेत.
त्याच पद्धतीने ‘गीत गीतामृत’ या अभिनव कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. यापैकी या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रीमद्भगवद्गीतेचा अर्थ सोप्या भाषेत सांगितला जातो. त्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आजकाल गीता कोठे ऐकायला मिळते आणि कोणाकडे एवढा वेळ आहे, असे प्रश्न उपस्थित होतात. त्याला गीत गीतामृत हा एक उत्तम पर्याय आहे. ईश्वराने सांगितलेला गीतेतील कर्मयोग संगीताशी नाते जोडणार आहे. या कार्यक्रमातून तो प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. वास्तविक गीतेवरील गाण्यांचा कार्यक्रम ही कल्पना प्रत्यक्षात आणणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे, कारण या विषयाचा विस्तार अफाट आहे. पण तरीही प्रतिभावान गीतकार कविवर्य नारायण दातार यांनी लिहिलेल्या गीत गीता या पुस्तकात हा विषय प्रभावीपणे मांडला आहे. त्यामध्ये ५३ गीते आहेत.

या कार्यक्रमातील गाणी अतिशय काळजीपूर्वक निवडण्यात आली आहेत, जेणेकरून गीतेचा संदेश प्रेक्षकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचेल. तीन तासांच्या या कार्यक्रमात कृष्णाने पहिल्या तीन अध्यायांमध्ये अर्जुनाला सांगितलेला कर्मयोग १२ गाण्यांच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या मध्यापर्यंत ही गीते सादर केली जातात. मग वेळ लक्षात घेऊन इतर गाण्यांमधून गीतेचे काही महत्त्वाचे विषय निवडून ते १३ गाण्यांमधून सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
संपूर्ण कार्यक्रमाचा समतोल राखण्यासाठी अर्जुनविषाद, अर्जुनाला युद्धाची तयारी करण्यासाठी प्रवृत्त करणे, विश्वरूपदर्शन इत्यादी विषय विविध गीतांमधून मांडण्यात आले आहेत. ही गीते साकारण्यासाठी विविध रागांचा वापर आणि तालांची निवड करण्यात आली. त्याद्वारे आवश्यक संगीत सादरीकरण कुशलतेने करण्यात आले आहे.
भगवद्गीता म्हणजे कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे. त्यात विविध विषयांची पद्धतशीर मांडणी आहे. त्यानुसार कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांशी संवाद साधताना विषय सांगणारे अस्खलित आणि अर्थपूर्ण सादरीकरण करण्यात आले आहे. कार्यक्रमाची संकल्पना, संगीत दिग्दर्शन प्रदीप धोंड यांचे असून प्रसाद कुलकर्णी यांच्या ओघवत्या निवेदनातून हा कार्यक्रम पुढे जातो. सौरभ कानुळकर (तबला), गणेश मेस्त्री (पखवाज), तन्मय मेस्त्री (संवादिनी), रवींद्र राहाटे (व्हायोलीन), संतोष पवार (तालवाद्य) यांची संगीतसाथ तसेच ध्वनिमुद्रित वाद्यांचा अचूक आणि संयमी वापर करून गीतेच्या विषयाचे गांभीर्य आणि भव्यता सांगण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून जाणीवपूर्वक केला आहे.
आपल्या धर्मग्रंथातील गीतेचे जीवनदायी तत्त्वज्ञान प्रत्येकाला त्याच्या आवडत्या संगीताद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रयत्न आहे. गीतेच्या रूपात ईश्वराचा संदेश श्रोत्यांपर्यंत आणि श्रोत्यांना त्या महान ग्रंथापर्यंत पोहोचवण्याकरिता कुतूहल वाढवण्याच्या उद्देशाने हा एक विशेष कार्यक्रम आहे. येत्या शनिवारी (दि. ३ डिसेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता बोरिवली (पूर्व) येथील श्रीकृष्ण नगरातील श्रीकृष्ण मंदिरात होणार असलेल्या या विनामूल्य कार्यक्रमाचा आवर्जून आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

