सिंधुसाहित्यसरिता – काठावरचेच ओठावर…!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभावान, मात्र फारशा परिचित नसलेल्या साहित्यिकांची ओळख करून देणारे ‘सिंधुसाहित्यसरिता’ हे पुस्तक आज, देवदीपावलीच्या मुहूर्तावर प्रकाशित होत आहे. ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून उत्साही सदस्यांनी सिंधुसाहित्यसरिता अक्षरमंच नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘सिंधुसाहित्यसरिता’ लेखमाला करोना लॉकडाउनच्या कालावधीत प्रसिद्ध केली. त्या लेखमालेची सुधारित आवृत्ती सत्त्वश्री प्रकाशन अर्थात कोकण मीडियाने पुस्तक रूपात आणि ई-बुक रूपात प्रकाशित केली. (पुस्तक खरेदीची लिंक लेखाच्या शेवटी दिली आहे.) त्या निमित्ताने, पुस्तकाचे संपादक सुरेश ठाकूर आणि प्रकाशक प्रमोद कोनकर यांचे हे मनोगत…
…….
साहित्यरसिक मित्रहो! आज ‘सिंधुसाहित्यसरिता’ हा ग्रंथ आपल्या हाती प्रदान करीत असताना मला झालेला आनंद शब्दांत व्यक्त होणारा नसला, तरीही आपल्या सर्वांशी संपर्काचे दुसरे कोणतेही माध्यम नसल्याने तो शब्दांतच व्यक्त करीत आहे. ते व्यक्त होणे म्हणजेच ‘सिंधुसाहित्यसरितेच्या काठावर बसलो असताना ओठावर आलेले विचार!’ तेच हे ‘काठावरचे ओठावर!’

शुभारंभ करतानाच कोकण मराठी साहित्य परिषदेचे आमचे कुलदैवत आणि आधुनिक मराठी कवितेचे ‘कविकुलगुरू केशवसुत’ यांच्या पवित्र स्मृतींना प्रथम वंदन करतो. आमच्या लिहित्या हातांचे ‘कुलपती’ पद्मश्री मधु मंगेश कर्णिक उर्फ सर्वांचेच मधुभाई यांनाही अभिवादन करतो. आमचे मधुभाई म्हणजेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक. आजचा हा आमचा ग्रंथ याच कुळात जन्म घेत असल्यामुळे त्यांना अभिवादन केल्याशिवाय मलाच काय, कोणालाही पुढे मार्गक्रमण करणे रुचणार नाही. श्रद्धेय मधुभाईंचे आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी सदैव राहोत.

मार्च २०२०पासून आजपर्यंत गेले नऊ महिने करोना महाराक्षसाचा ससेमिरा जगातील सर्वांच्याच मागे लागला. आमचीही पाठ तो कशी सोडणार? पण मित्रहो, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने करोनाला पाठ न दाखवता आपल्या ५० विविध साहित्यविषयक उपक्रमांनी त्याला आपला हसरा चेहराच दाखविला. करोना त्या अक्षर भुलभुलैयाला भाळला. त्यामुळे आम्हा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जवळजवळ २७५ आजीव सदस्यांचे जीवन आनंदात गेले आणि हे कार्यक्रम ऑनलाइन/सोशल मीडियावर बघून सुमारे अडीच लाख साहित्यरसिकांचे जीवन आनंदी आणि करोनामुक्त झाले. शेवटी अक्षरांची शक्ती ही सर्व संकटांशी शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूल आदी होऊन सामना करते, हेच अक्षरांनी सिद्ध करून दाखविले.

‘कवितेच्या बनात’पासून ‘सूर राहू दे’पर्यंत, ‘मालवणी गजालीं’पासून कथाकथनापर्यंत आणि ‘गुरुर्ब्रह्मा’पासून पुस्तक परीक्षणापर्यंत असे ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे विविधरंगी उपक्रम कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून सादर झाले. आज ५१वा उपक्रम म्हणजे ‘सिंधुसाहित्यसरिता’ या पुस्तकाचे प्रकाशन!

माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांवर ‘सिंधुसाहित्यसरिता’ ही लेखमाला सुरू करावी, असे माझ्या सहज मनात आले. माझा जिल्हा ही साहित्यातील नरदुर्गांची खाण आहे, हे सर्वांनाच ज्ञात आहे; पण ज्यांनी साहित्याच्या विविध क्षेत्रांत आपापली अक्षरलेणी कोरून ठेवली आहेत, मात्र आज ते आपल्यापासून पैलतटावर आहेत, अशा साहित्यिकांवर ही लेखमालिका व्हावी, असा विचार आला. काही साहित्यिकांची प्रसिद्धी सर्वदूर पसरलेली आहे; पण काहींची प्रसिद्धी म्हणावी तेवढी झाली नाही, असे २१ साहित्यिक पहिल्या भागात निवडण्यात आले. त्यांत कवी, लेखक, नाटककार, पत्रकार आदी विविध क्षेत्रांतील विभूती होत्या. माझ्या ‘कोमसाप-मालवण’च्या १६ नवीनच लिहित्या हातांनी माझे हे आव्हान लीलया पेलले आणि उगम झाला ‘सिंधुसाहित्यसरिते’चा!

‘कोमसाप-मालवण’च्या १६ लेखकांनी प्रवाहित केलेली ही २१ साहित्यिकांची ‘सिंधुसाहित्यसरिता’ लेखमाला! याचा शुभारंभ मी व्हॉट्सअॅप ग्रुपवरच २५ सप्टेंबर २०२० रोजी केला. कारण हा दिवस म्हणजे आमचे वक्ता दशसहस्रेषु असे साहित्यरसिक बॅ. नाथ पै यांचा जन्मदिवस! ज्यांच्या जिभेवर सरस्वतीने केवळ वासच केला नाही, तर ती सदैव नृत्यच करीत होती की काय असे त्यांच्या भाषणांनी आम्हाला वाटायचे. म्हणून शुभारंभाचे पुष्प बॅ. नाथ पै यांनाच अर्पण केले. आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपबरोबरच ही लेखमाला ‘साप्ताहिक कोकण मीडिया’च्या kokanmedia.in या वेबसाइटवरही प्रसिद्ध करण्यात आली. ही लेखमाला उदंड गाजली. लेखमालेचे पुस्तक व्हावे म्हणून अनेक जणांनी इच्छा व्यक्त केली. माझे मित्र अनिकेत कोनकर यांच्या प्रयत्नांमुळे आणि दुर्दम्य आशावादामुळे आज याचा ग्रंथ होत आहे. त्याचप्रमाणे आमच्या प्रत्येक उपक्रमाचे नेहमी भरभरून कौतुक करणाऱ्या श्रीमती नमिता कीर (कार्याध्यक्षा, कोमसाप) यांची प्रेरणाही या पुस्तकामागे महत्त्वाची आहे.
गझलभूषण आणि सिंधुपुत्र मधुसूदन नानिवडेकर यांनी आपल्या रसपूर्ण प्रस्तावनेने पुस्तकाची उंची वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. सर्व साहित्यिक दिवंगत झालेले… काहींचे तपशील संदर्भग्रंथांमधून मिळणेही कठीण होते. अशा वेळी माझ्या नवीन लेखकांना अनेक हातांनी सहकार्य केले. त्यांचे ऋण मी कसे फेडू? त्यांचे हात लाभले याचे मोल फार आहे.

रुजारिओ पिंटो, रवींद्र वराडकर, राजाभाऊ खांडाळेकर, अरविंद म्हापणकर (सर्व मालवण), प्रमोद पेडणेकर (वराड-मालवण), मोतीराम टोपले, विकास गोवेकर, प्रा. जी. ए. बुवा, प्रभाकर भागवत (सावंतवाडी), संपदा प्रभुदेसाई, वैभव साटम (आयनल-कणकवली), अनुराधा दीक्षित, उल्का जोशी (वाडा-देवगड), मधुरा आठलेकर (वेंगुर्ला), श्रीमती वृंदा आकाराम राणे (माणगाव-कुडाळ), प्रिया अनंत आचरेकर, सुरेश गावकर (आचरे-मालवण), सुनील कांबळे-हेतकर (हेत – वैभववाडी), श्रीकांत आपटे (फोंडाघाट) आणि सर्वांना नेहमीच मार्गदर्शन करणारे मधुसूदन नानिवडेकर आदींनी या पुस्तकासाठी बहुमोल सहकार्य केले.

तसेच ग्रुपवर सादरीकरण होत असताना मंदार सांबारी (आचरे), रश्मी रामचंद्र आंगणे (ओसरगाव-कणकवली), स्वराशा कासले (कणकवली) आणि गुरुनाथ ताम्हणकर (बागायत-मालवण) यांचे फार मोलाचे सहकार्य लाभले. करोना काळात ग्रंथालये बंद असतानाही माझ्या लिहित्या हातांना ग्रंथ उपलब्ध करून देण्याचे जिल्ह्यातील अनेक ग्रंथालये आणि ग्रंथपाल यांचे सहकार्य फार मोलाचे आहे. या अक्षरमालेची प्रसिद्धी सर्वदूर करण्यास रामचंद्र विष्णू आंगणे (उपशिक्षणाधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग) यांचे मिळालेले सहकार्य शब्दांत व्यक्त करणे कठीणच. सत्त्वश्री प्रकाशनाचे (कोकण मीडिया) प्रमोद कोनकर यांनी या पुस्तकाचे प्रकाशन वेळेत आणि दर्जेदार करून देण्याचे आव्हान स्वीकारले आणि त्याची पूर्तता केली, म्हणून त्यांचेही आभार! मंगेश म्हस्के (अध्यक्ष – कोमसाप, सिंधुदुर्ग), तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेची सर्व कार्यकारिणी आणि सदस्य यांचेही सहकार्य लाभले. त्यांचेही आभार.

सर्वांत महत्त्वाचे माझे लेखक! त्यांनी मी त्यांच्यावर दिलेली जबाबदारी स्वीकारली, अभ्यासपूर्ण पद्धतीने निभावली आणि त्याचमुळे हा ‘साहित्यसरितेचा अक्षरसोहळा’ साजरा होत आहे. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच.

आज देवदीपावली! मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा, शके १९४२. हा खरेच अक्षरांचा शुभमुहूर्त! कोकणात तर दिवाळीपेक्षा देवदीपावलीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. कारण मंदिरातील देवकार्याचा शुभारंभ याच शुभमुहूर्तावर होतो. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेच्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ या लेखमालेने आज आम्ही आमच्या अक्षरदेवतेचे पूजन आणि औक्षण करतो. आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान डॉ. विद्याधर करंदीकर जरी आज देहरूपाने आमच्यात नसले, तरी त्यांनी रचलेल्या आरतीनेच माझ्या मनोगताची अर्थात ‘काठावरून ओठावर’ आलेल्या विचारांची सांगता…

ज्ञानसूर्याची करावी नित्य हो आराधना
‘बुद्धी दे’, तेजोमयाला हीच केवळ प्रार्थना।
‘लोपु दे अज्ञान अमुचे’ मागणे ईशाप्रति
भक्तिरंगी रंगली ही अक्षरांची आरती।।

 • सुरेश श्यामराव ठाकूर, आचरे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग
  संपादक, सिंधुसाहित्यसरिता
  मोबाइल : ९४२१२६३६६५
  ई-मेल : surshyam22@gmail.com

  ………

नवीन साहित्यवृक्ष रुजावेत (प्रकाशकांची भूमिका)

सिंधुसाहित्यसरिता हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांचा थोडक्यात परिचय करून देणारा लेखसंग्रह प्रकाशित करताना आनंद होत आहे. समाजमनाचे प्रतिबिंब आपल्या साहित्यात उमटविणारे दिग्गज साहित्यिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात तयार झाले. अनेक साहित्यिकांनी समाजाला दिशा देण्याचे मोठे काम केले. अशा निवडक साहित्यिकांचा परिचय या संग्रहात करून देण्यात आला आहे. अनेक नवोदितांनी ही जबाबदारी पेलली आहे; पण जुन्याचे, जुन्या काळाचे, जुन्या लेखकांचे गुणगान करून केवळ भागणार नाही. त्या दीपस्तंभांच्या प्रकाशात जुन्या वाटेने चालत राहण्यापेक्षाही नव्या वाटा निर्माण झाल्या पाहिजेत. त्या चोखाळल्या गेल्या पाहिजेत.

केवळ स्मरणरंजन आणि स्वप्नरंजनात रममाण होण्यापेक्षा समाजाचे प्रतिबिंब साहित्य निर्माण करणार असेल, तर बदलत्या काळातील नवी आव्हाने, कोकणातल्या नव्या समस्या, त्याविषयीची उपायोजना सुचविणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी पूर्वसुरींची मदत व्हावी, एवढाच सिंधुसाहित्यसरिता संग्रहाचा उद्देश आहे. त्यातून प्रेरणा घेऊन या सरितेच्या काठावर नवीन साहित्यवृक्ष रुजावेत, ते मोठे व्हावेत आणि त्यांनी कोकणचे वेगळेपण आपल्या उंचीने पुन्हा एकदा दाखवून द्यावे, अशी अपेक्षा आहे. अशा वृक्षांना रुजण्यासाठी, उभे राहण्यासाठी पुस्तकनिर्मितीच्या रूपातून मदत करायला प्रकाशक म्हणून मला निश्चितच आवडेल.

 • प्रमोद कोनकर, रत्नागिरी
  प्रकाशक (सत्त्वश्री प्रकाशन), संपादक (कोकण मीडिया)
  (कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस)
  मोबाइल : ९४२२३८२६२१, ९८२२२५५६२१
  ई-मेल : kokanmedia@kokanmedia.in

  (सिंधुसाहित्यसरिता या छापील पुस्तकाची किंमत २०० रुपये आहे. पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ई-बुक गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध असून, त्याची किंमत १५० रुपये आहे. ई-बुक खरेदीसाठी https://bit.ly/2IlFV7C या लिंकवर क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media