पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना ‘उन्हातले चांदणे’ कार्यक्रमाद्वारे कुडाळमध्ये अभिवादन

कुडाळ : ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘प्राप्तकाल’ या नव्या कादंबरीचे २५ मार्च रोजी प्रकाशन झाले. २८ एप्रिल २०२२ रोजी ते ९२व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. याचे औचित्य साधून ‘कोकण मराठी साहित्य परिषद-सिंधुदुर्ग’तर्फे २८ मार्च रोजी कुडाळमधील संत राऊळ महाराज महाविद्यालयात ‘उन्हातले चांदणे’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मधुभाईंच्याच साहित्यातील निवडक अंशांचे अभिवाचन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना करून मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणातील नवसाहित्यिकांना आणि साहित्यप्रेमींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे सर्वांना ते उन्हातल्या चांदण्यासारखे वाटतात, अशी संकल्पना ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (कार्यक्रमाचा काही अंश दर्शविणारा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

या कार्यक्रमाची मूळ संकल्पना माणगावमधील विठ्ठल कदम यांची. ‘कोमसाप-सिंधुदुर्ग’चे अध्यक्ष मंगेश मसके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. ‘कोमसाप’चे कुडाळमधील युवा कार्यकर्ते आणि मंदार मसके यांनी या कार्यक्रमाची पूर्वतयारी केली. या कार्यक्रमात मधुभाईंच्या ‘कोकणी ग वस्ती,’ ‘करुळचा मुलगा,’ ‘सूर्यफूल,’ ‘भाकरी आणि फूल,’ ‘संधिकाल,’ ‘जुईली,’ ‘माझा गाव माझा मुलुख’ आणि ‘तारकर्ली’ या पुस्तकांतील काही अंशांचे अभिवाचन करण्यात आले. अनुक्रमे सुरेश ठाकूर, उषा परब, आनंद वैद्य, वृंदा कांबळी, विठ्ठल कदम, अरुण मर्गज, मंगेश मसके रुजारिओ पिंटो यांनी हे अभिवाचन केले. सूत्रसंचालन सुरेश ठाकूर यांनी केले. एक वेगळ्याच प्रकारचा भावनिक सोहळा या निमित्ताने पार पडला.

मधुभाई या अक्षरसोहळ्याने भारावून गेले. ‘वयाच्या दहाव्या दशकात पदार्पण करताना माझ्याच साहित्यकृतीने माझे केलेले अभिष्टचिंतन ही माझ्यासाठी अलौकिक बाब होती. अशा संकल्पना आरती प्रभूंनाच सुचत,’ असे ते म्हणाले. ‘कोमसाप’च्या वाढीबद्दल मार्गदर्शनपर भाषणही त्यांनी केले. या वेळी मधुभाईंनी ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे काम, तसेच अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या कामाबद्दल ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांचे त्यांना जवळ घेऊन ‘हे आमचे कोकणचे छोटे साने गुरुजी’ अशा शब्दांत कौतुक केले.

या कार्यक्रमात ‘कोमसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ यांचेही भाषण झाले. या कार्यक्रमाला गुरुनाथ ताम्हणकर, पांडुरंग कोचरेकर, मंदार सांबारी, सुभाष गोवेकर, प्रभाकर धुरी, मोहन रणसिंग, प्रा. एस. टी. आवटे, डॉ. दीपाली काजरेकर, जयवंती सावंत, नकुल पार्सेकर, विनयश्री पेडणेकर, संतोष वालावलकर, रूपेश पाटील, प्रतिभा चव्हाण, अरुण पणदूरकर, सुभाष गोवेकर, संतोष सावंत, अभिमन्यू लोंढे, महेश परुळेकर, अनुष्का रेवंडकर, अंजली मुतालिक, राजन कुडाळकर, मनोहर सरमळकर आदी मान्यवर, तसेच ‘कोमसाप’च्या मालवण, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग शाखांचे सदस्य आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(कार्यक्रमाचा काही अंश दर्शविणारा व्हिडिओ सोबत दिला आहे.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply