लोकसहभागामुळे दापोली शहर पाणीटंचाईमुक्त : ममता मोरे

दापोली : शासकीय प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाल्यामुळेच दापोली शहर पाणीटंचाईमुक्त होऊ शकले, अशी प्रतिक्रिया दापोलीच्या नगराध्यक्षा सौ. ममता मोरे यांनी दिली.

जलव्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी दापोली नगरपंचायतीला राष्ट्रीय जल पुरस्काराने काल (दि. २९ मार्च) नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. तेथील विज्ञान भवनात काल तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण झाले. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे हा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल, बिश्वेश्वर टुडू आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी ११ श्रेण्यांमध्ये ५७ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

राष्ट्रपतींच्या हस्ते देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकविणारी राज्ये आणि संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. उर्वरित पुरस्कार केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राला एकूण चार राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आले. मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

उत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था श्रेणीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार नगराध्यक्षा सौ. ममता बिपीन मोरे, नगर पंचायतीचे पाणीपुरवठा अधिकारी स्वप्नील महाकाळ यांनी स्वीकारला. या पुरस्काराबाबत सौ. मोरे म्हणाल्या, दापोलीतील नारगोली धरण पुनरुज्‍जीवन मोहीम यशस्वी करून नगरंपचायतीने लोकसहभागातून पाणीटंचाईवर मात केली. त्याचबरोबर धरणाचेही मजबुतीकरण, खोलीकरण केले. त्यामुळे आता भरपूर पाणीसाठा होत आहे. यामुळे नगर पंचायत टँकरमुक्त झाली आहे.

पश्चिम झोनमधील उत्कृष्ट ग्रामपंचायत श्रेणीतील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी ग्रामपंचायतीला मिळाला. उत्कृष्ट गैरसरकारी संस्थेच्या श्रेणीत औरंगाबाद येथील ग्रामविकास संस्था गैरसरकारी संस्थेला आणि विवेकानंद संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला संयुक्तरीत्या तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुद्रित आणि प्रसार माध्यमांनी जल व्यवस्थापनात केलेल्या उत्कृष्ट कामांच्या श्रेणीमध्ये पुण्यातील ॲग्रोवन दैनिकाला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नगराध्यक्षांचे मनोगत

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply