सुरेश ठाकूर यांना अष्टावधानी गुरू पुरस्कार जाहीर

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य, शिक्षण आदी क्षेत्रांतील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व असलेल्या सुरेश ठाकूर यांना यंदाचा बापूभाई शिरोडकर स्मृती अष्टावधानी गुरू पुरस्कार जाहीर झाला आहे. बॅ. नाथ पै सेवांगण-कट्टा यांच्यातर्फे दर वर्षी हा पुरस्कार दिला जातो. १७ जानेवारी २०२२ रोजी बॅ. नाथ पै सेवांगण-कट्टा (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथे दुपारी तीन वाजता हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ आणि मालवणच्या बॅ. नाथ पै सेवांगणाचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

‘आमच्या संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या बापूभाई शिरोडकर स्मृती अष्टावधानी गुरू पुरस्कारासाठी ठाकूर सर यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची निवड करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे,’ अशी भावना ‘बॅ. नाथ पै सेवांगण-कट्टा’चे अध्यक्ष किशोर शिरोडकर यांनी व्यक्त केली. शिरोडकर यांच्यासह कार्यवाह श्याम पावसकर, कोषाध्यक्ष अरविंद शंकरदास यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

सुरेश ठाकूर यांनी प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख म्हणून काम केले आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी विविध शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले. त्यातून त्यांनी विद्यार्थी तर घडवलेच; पण शिक्षण आणि पालकही घडवले. त्या अर्थाने त्यांनी अष्टापैलू, अष्टावधानी कामगिरी बजावली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला आणि कोकण मराठी साहित्य परिषद या संस्थांच्या मालवण शाखेचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळले. त्यातून त्यांनी साने गुरुजींचे विचार आणि साहित्य चळवळ बहरवली.

बालनाट्य व कथाकथन तंत्र-मंत्र प्रसार-प्रचाराचे कार्य करताना त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी अनेक संस्थांच्या सहकार्याने बालनाट्य शिबिरे घेतली. राज्यभरातील अनेक शाळा-महाविद्यालयांतून त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना कथाकथनाबद्दल मार्गदर्शन केले आहे. व्यक्तिमत्त्व विकास शिबिरेही त्यांनी आयोजित केली होती.

१९९२ साली सुरेश ठाकूर यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता. आदर्श कथामाला कार्यकर्ता पुरस्कार २०००, आदर्शक कथा निवेदक पुरस्कार, साहित्यातील योगदानाबद्दल जयवंत दळवी पुरस्कार, ललित गद्यासाठीचा स्व. सौ. लक्ष्मीबाई आणि राजाभाऊ गवांदे पुरस्कार २०१६ असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ‘शतदा प्रेम करावे’ हे त्यांच्या ललित लेखांचे पुस्तक असून, ते वृत्तपत्रांसाठीही नियमितपणे लेखन करतात.

सुरेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून लॉकडाउनमध्ये ‘कोमसाप-मालवण’च्या सदस्यांनी ‘माझी शाळा-माझे शिक्षक’ ही लेखमाला लिहिली. तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्धीपराङ्मुख साहित्यिकांबद्दलची सिंधुसाहित्यसरिता ही लेखमालाही ‘कोमसाप-मालवण’च्या सदस्यांनी लिहिली. त्या लेखमालेचे पुस्तक सिंधुसाहित्यसरिता या नावाने रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनाने प्रकाशित केले असून, त्याचे संपादन सुरेश ठाकूर यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply