सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर रुजतोय नव्या आशेचा अंकुर

सावंतवाडी : जैवविविधता कमी होतेय; डोंगर उघडेबोडके होताहेत; वानरं-माकडं, हत्तींपासून बिबट्यांपर्यंत अनेक वन्यजीव मानवी वस्तीत येताहेत अशी परिस्थिती कमी-अधिक फरकाने सगळीकडेच अनुभवायला मिळते आहे. त्यावर कोणते उपाय करता येतील, याबद्दल चर्चा झडत आहेत. नियतकालिकांची पानं आणि वेबसाइट्सची पेजेस याबद्दलच्या माहितीने भरभरून वाहत आहेत. ती परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे हात मात्र तुलनेने फारच थोडे आहेत. या मोजक्या हातांमध्ये समावेश होतो तो सावंतवाडीतले (जि. सिंधुदुर्ग) अँड्र्यू फर्नांडिस आणि त्यांचे दोन मुलगे डॅनियल आणि फ्रँकलीन यांचा. माकडांनी फणस खाऊन टाकलेल्या आठळ्या रुजवून त्यांची रोपं तयार करून ती सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर नेऊन लावण्याचा उपक्रम अँड्र्यू यांना सुचला आणि त्यांच्या शाळकरी मुलांनी तो तडीस नेला. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

सावंतवाडीतले अँड्र्यू फर्नांडिस हे पेशाने सुतार. लाकडी देव्हारे, चौरंग, दरवाजे-खिडक्यांपासून ख्रिश्चन धर्मीयांच्या अंत्यसंस्कारांसाठी आवश्यक असलेल्या कॉफिन्सपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांच्या कौशल्यातून साकारतात. महत्त्वाचं म्हणजे अँड्र्यू, त्यांचे आई-वडील, पत्नी आणि मुलं अशा सर्वांचा गरजेनुसार कमी-अधिक प्रमाणात या कामात हातभार असतो. सामाजिक कामांचा वारसा अँड्र्यू यांना वडिलांकडूनच मिळालेला. शिवाय अँड्र्यू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते. त्यामुळे समाजाला उपयोगी होतील, अशा कामांचे विचार त्यांच्या डोक्यात सतत घोळत असतात. सावंतवाडी शहरातल्या स्पीड ब्रेकर्सवर पांढरे पट्टे आखणं, कोरोना काळात भाजीवाले आणि दुकानांसाठी सोशल डिस्टन्सिंगचे गोल आणि चौकोन आखून देणं वगैरे अशी अनेक कामं सिंधुमित्र संस्थेच्या माध्यमातून करण्यात त्यांचा पुढाकार होता. तसंच, कोरोनापूर्व काळात मुंबई-गोवा महामार्गाच्या काही भागात झाडं लावण्याचा उपक्रमही त्यांनी त्या संस्थेच्या माध्यमातून राबवला होता.

आपल्या मुलांच्या मनातही निसर्गप्रेम रुजवण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा उपक्रम त्यांना २०२१च्या मे महिन्यात सुचला. त्यांच्या घराजवळच्या फणसाच्या दोन झाडांवर बरेच फणस धरले होते. कमी उंचीवर असलेले फणस काढून खाता येतात; मात्र खूप उंचावरचे फणस माकडं-वानरं खाऊन टाकतात आणि त्याच्या बिया म्हणजेच आठळ्यांचा खच सगळीकडे पडतो. त्यांचा योग्य उपयोग व्हावा म्हणून पत्र्यावर पडलेल्या या आठळ्या गोळा करून त्यांची रोपं रुजवण्याचा उपक्रम त्यांनी राबवला. सातवीतला डॅनियल आणि पाचवीतला फ्रँकलीन या दोघांनाही तो उपक्रम आवडला. वडिलांच्या मार्गदर्शनानुसार त्या दोघांनीही आठळ्या गोळा करून त्यांची रोपं रुजवली. काही रोपं पिशवीत भरली, तर काहींच्या मुळाशी मातीचे सीडबॉल्स तयार केले. अशी सुमारे २५० रोपं त्यांनी पावसाचा जोर कमी झाल्यावर साधारण ऑगस्ट महिन्यात सावंतवाडीतल्या नरेंद्र डोंगराच्या उतारावर नेऊन ठेवली. नरेंद्र डोंगरावर जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ही रोपं ठेवण्यात आली. निसर्गतःच त्यांनी जमिनीत मूळ धरावं असा उद्देश त्यामागे होता.

अँड्र्यू म्हणाले, ‘निसर्गाकडून आपण खूप काही घेत असतो. त्याला आपण काही तरी द्यायला हवं आणि मुख्य म्हणजे ही भावना आपल्या पुढच्या पिढीच्या मनात रुजायला हवी, यासाठी मी हा उपक्रम राबवला. हा अगदीच छोटा उपक्रम असला, तरी त्यातून मुलांच्या मनात बीज अंकुरलं हे महत्त्वाचं आहे. त्यांना एकदा कल्पना सांगितल्यावर त्यांनीच ही रोपं तयार करून लावली. आताही सीडलिंग ट्रेमध्ये पपईची रोपं रुजवण्याचा उपक्रम त्यांनी स्वतःहून हाती घेतला आहे. आमच्या लहानपणी सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर घनदाट जंगल होतं. आता मात्र अनेक कारणांनी ते विरळ होत चाललं आहे. त्यामुळे वानरं-माकडं मानवी वस्तीत येण्याचं प्रमाण वाढलं आहे. डोंगरावर फळझाडं लावली आणि ती जगवली, तर वानर-माकडांना डोंगरावरच खाद्य मिळेल आणि ते वस्तीत येणार नाहीत. खरं तर आमच्या लहानपणीच हा उपक्रम का सुचला नाही, याची खंत वाटते. आता मुलांना अशा उपक्रमाची गोडी लागली तर त्याचा नक्की उपयोग होईल. पुढच्या वर्षी ते त्यांच्या मित्रांना घेऊन आणखी थोड्या मोठ्या प्रमाणावर असा उपक्रम राबवणार आहेत. या वर्षी लावलेल्या २५० झाडांपैकी २० झाडं जगली, तरी खूप आहे; पण पुढच्या वर्षी हा उपक्रम अधिक शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्याचा मानस आहे.’

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जेव्हा नरेंद्र डोंगरावर फेरी मारली, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा दारूच्या बाटल्यांचा नि प्लास्टिक पिशव्यांचा अक्षरशः खच पाहायला मिळाला. निसर्गाचं ओरबाडून घेणं आणि त्याची शक्य तितकी वाट लावणं, या गैरप्रवृत्तीचा वेग वाढलेला असताना डॅनियल आणि फ्रँकलीन यांच्यासारख्या कोवळ्या अंकुरांना खतपाणी घालणं खूप महत्त्वाचं आहे.

निसर्गाचाच एक घटक असलेल्या माणसाने स्वतःमध्ये धर्मांच्या भिंती घातल्या असल्या, तरी त्याचं जगणं-मरणं निसर्गाशीच निगडित आहे. झाडांनी तयार केलेला ऑक्सिजनच सर्वांना जगण्यासाठी लागतो. मेल्यानंतरही चितेवरून अग्न्यार्पण व्हायचं की कॉफिनमध्ये चिरनिद्रा घ्यायची, हे दोन्ही पर्याय झाडांच्या लाकडांशीच निगडित आहेत. म्हणूनच आपल्याला जगवणारी, वाढवणारी झाडं लावणं, ती जगवणं, त्यांना वाढवणं हे आपलं कर्तव्यच आहे. त्या अर्थाने, कविवर्य ग्रेस म्हणतात तसं ‘झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया!’ हे जीवनाचं तत्त्वज्ञानच जणू फर्नांडिस कुटुंबीयांच्या कामातून पाहायला मिळतं. अशा या मोजक्या हातांना समाजातून हत्तीचं बळ मिळण्याची गरज आहे.
(सोबत व्हिडिओ)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply