राजापूर : ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे आज वेत्ये (ता. राजापूर) येथे कासवाची ६१ अंडी आढळून आली आहेत. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात या किनाऱ्यावर जिल्ह्यात सर्वप्रथम कासवांची पावले उमटणार आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे विणीच्या हंगामात अंडी घालण्यासाठी येतात. समुद्राचे विशिष्ट तापमान त्यांना मानवत असल्याने कोकणातील किनाऱ्यावर कासवे येत असल्याचे मंडणगड तालुक्यातील वेळासच्या किनाऱ्यावर सर्वप्रथम लक्षात आले. चिपळूणच्या निसर्गमित्र संस्थेचे भाऊ काटदरे यांनी त्यानंतर कासवांच्या संवर्धनाची मोहीम आखली. किनाऱ्यावरच्या लोकांना या कासवांचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे खाण्यासाठी कासवाची अंडी वापरणारे ग्रामस्थच नंतर या अंड्यांचे संरक्षक बनले. ठरावीक कालावधीनंतर अंड्यातून कासवे बाहेर पडून समुद्राच्या दिशेनेच झेपावतात, हे दृश्य पाहण्यासाठी तेथे कासव महोत्सव भरू लागला.

मंडणगडसह दापोली,चिपळूण, गुहागर आणि राजापूर तालुक्यातही कासवांचा वावर असल्याचे आढळले. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये अवकाळी पाऊस, प्रतिकूल हवामान आदींमुळे पर्यावरणामध्ये झालेल्या प्रतिकूल बदलांचा परिणाम झाल्याने सागरी किनारपट्टीच्या वाळूमध्ये अंडी घालण्यासाठी येणार्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचे आगमन यावर्षी लांबणीवर पडणार का, अशी शंका वाटत होती. मात्र यावर्षीच्या पहिल्याच आठवड्यात दरवर्षीप्रमाणे कासवे अंडी घालण्यसाठी राजापूर तालुक्यातील वेत्ये किनारपट्टीवर आली आहेत. समुद्र किनार्यावर फेरफटका मारताना कासवमित्र गोकुळ जाधव यांना ही अंडी आढळून आली. त्यांनी राजापूर वन विभागाचे वनपाल सदानंद घाटगे, सागर गोसावी आदींशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर किनार्यावरील वन्य प्राणी वा जंगली श्वापदांपासून त्या अंड्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली अंडी संरक्षित करण्यासाठी योग्य ती उपाययोजना केली आहे.
यावर्षी जिल्ह्यात प्रथमच राजापूर तालुक्यात ऑलिव्ह रिडले कासवाची अंडी सापडल्याने याच अंड्यांमधून सर्वप्रथम पिले बाहेर येऊन समुद्राकडे झेपावणार आहेत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड