मराठी भाषेच्या व्रतस्थ उपासक प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ, भाषाअभ्यासक, लेखिका आणि शिक्षिका प्रा. यास्मिन शेख यांचे सोमवारी (२४ ऑगस्ट २०२६) पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०१ वर्षांच्या होत्या. मराठी व्याकरण, प्रमाणलेखन आणि भाषाशास्त्रासाठी आयुष्य वेचलेल्या प्रा. शेख यांच्या निधनाने मराठीच्या अभ्यासविश्वातील एक व्रतस्थ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना या दोन मुली आहेत.

प्रा. शेख यांचा जन्म २१ जून १९२५ रोजी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुशा रुबेन होते. त्यांचा जन्म ज्यू कुटुंबात झाला होता. पुढे अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी जेरुशा रुबेन हे नाव बदलून यास्मिन शेख हे नाव स्वीकारले; मात्र धर्म बदलला नाही, असे त्यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

मराठी ही मातृभाषा नसतानाही तिच्या व्याकरणाचा, भाषाशास्त्राचा आणि प्रमाणलेखनाचा ध्यास घेऊन प्रा. शेख यांनी मराठीच्या अभ्यासक्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले. प्रा. श्री. म. माटे यांच्या त्या विद्यार्थिनी होत्या. श्री. पु. भागवत आणि ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार वसंत कानेटकर यांच्याबरोबरही त्यांनी काम केले. भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयांसाठी त्यांनी व्रतस्थ वृत्तीने जीवन वाहून घेतल्याचा उल्लेख त्यांच्या कार्यावरील विविध लेखांमध्ये आढळतो.

प्रा. शेख यांनी शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर सुमारे ३४ वर्षे अध्यापन केले. मुंबईतील शीव येथील एसआयईएस महाविद्यालयात त्या मराठी विभागप्रमुख म्हणूनही कार्यरत होत्या. निवृत्तीनंतरही त्यांचे अध्यापनाचे कार्य थांबले नाही. शासनाच्या स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअरमध्ये त्यांनी आयएएससह स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुमारे दहा वर्षे मराठी व्याकरण आणि भाषाशास्त्र शिकवले.

बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकांच्या संपादनातही त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यांनी सात वर्षे या कामात सहभाग घेतला. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘कार्यात्मक व्याकरण’ या पुस्तकाच्या निर्मितीतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

मराठी लिहिणाऱ्यांसाठी प्रा. शेख यांची दोन पुस्तके विशेष मार्गदर्शक आहेत. राज्य मराठी विकास संस्थेने १९९७ मध्ये प्रकाशित केलेला ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ हा त्यांचा महत्त्वाचा संदर्भग्रंथ. विद्यार्थी, शिक्षक, लेखक, अमराठी भाषक आणि दैनंदिन व्यवहारात मराठी लिहिणाऱ्या सर्वसामान्यांसाठीही हा ग्रंथ उपयुक्त आहे. त्यांचा ‘मराठी शब्दलेखनकोश’ हा आणखी एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ. मराठी साहित्य महामंडळाच्या शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार त्यांनी या कोशाची निर्मिती केली. वर्णमाला, जोडाक्षरलेखन, अंकलेखन यांसह प्रमाणलेखनाच्या विविध बाबतीत हा कोश मार्गदर्शक आहे. हस्तलेखनापासून मुद्रण आणि संगणकीय लेखनापर्यंत विविध स्तरांवर तो उपयुक्त असल्याचे भाषातज्ज्ञांनी नमूद केले आहे. या ग्रंथाला मराठी अभ्यास परिषदेचा भाषाविषयक लेखन पुरस्कारही मिळाला होता.

‘अंतर्नाद’ या वाङ्मयीन मासिकाच्या ‘व्याकरण सल्लागार’ म्हणूनही प्रा. शेख यांनी काम केले. भाषेतील बारकावे, शब्दांचे अचूक रूप, व्याकरण आणि प्रमाणलेखनाच्या शंकांबाबत अनेक लेखक आणि अभ्यासकांना त्यांचे मार्गदर्शन मिळत असे. वयाच्या नव्वदीनंतरही मुद्रिते तपासण्याचे आणि भाषेतील चुका काटेकोरपणे शोधण्याचे काम त्यांनी सुरू ठेवले होते.

वयाच्या ९८व्या वर्षीही त्या ‘लोकसत्ता’मधील ‘भाषासूत्र’ या सदरातून सातत्याने लेखन करीत होत्या. प्रमाणभाषेचे लेखन योग्य रीतीने व्हावे, भाषेच्या नियमांची बैठक टिकावी आणि मराठीचा सांस्कृतिक वारसा जपला जावा, ही त्यांची भूमिका होती. देश-विदेशातील वाचकांकडून येणाऱ्या भाषाविषयक शंकांचेही त्या निरसन करत असत. बोलीभाषेचे स्वतंत्र महत्त्व मान्य करतानाच ललित अथवा वैचारिक लेखन करताना प्रमाणभाषेचा वापर व्हायला हवा, असा त्यांचा आग्रह होता. मराठी बोलताना अनावश्यक परकीय शब्दांचा वापर करून आपण आपली भाषा प्रदूषित करू नये, अशी भूमिका त्यांनी सातत्याने मांडली.

मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्रातील योगदानाबद्दल प्रा. शेख यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचा ‘डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार’ त्यांना २०१७मध्ये प्रदान करण्यात आला. त्यांच्या भाषाविषयक कार्याचा विविध साहित्यिक आणि शैक्षणिक संस्थांकडूनही सन्मान करण्यात आला आहे.

२०२५ मध्ये मराठी भाषा विद्यापीठाने ‘मराठी भाषा जीवनगौरव पुरस्कार’ प्रा. शेख यांना दिला. व्याकरण, प्रमाणलेखन आणि भाषाविज्ञानातील त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या व्याकरणशास्त्र आणि लेखनशास्त्रातील कार्याची मराठी भाषेच्या इतिहासात कायमस्वरूपी नोंद राहील, अशा शब्दांत त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला होता. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नांदी संमेलनातही त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता; मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.

‘आपल्या मातृभाषेवर प्रेम करा’ ही प्रा. शेख यांची केवळ शिकवण नव्हती, तर त्यांच्या आयुष्याची भूमिका होती. व्याकरणासारखा अनेकांना क्लिष्ट वाटणारा विषय सहजपणे समजावून देणे, प्रमाणलेखनासाठी साधने निर्माण करणे आणि आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत मराठीच्या अचूक लेखनासाठी कार्यरत राहणे, ही त्यांच्या दीर्घ भाषासाधनेची वैशिष्ट्ये होती. त्यामुळे त्यांच्या कार्याचा परिचय करून देताना अभ्यासक डॉ. नीलिमा गुंडी यांनी त्यांचा उल्लेख ‘भाषायोगिनी’ असा केला होता.

‘भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे आणि समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे,’ हा विचार डॉ. यास्मिन शेख यांनी आपल्या कार्यातून सातत्याने समाजासमोर ठेवला. मराठी बोलताना परकीय शब्दांचा अनावश्यक वापर टाळावा आणि ललित तसेच वैचारिक लेखनात प्रमाण भाषेचा वापर व्हावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर आग्रह धरला. डॉ. यास्मिन शेख यांचा जीवनप्रवास हा सामाजिक सलोखा, वैचारिक समृद्धी आणि मराठी भाषेवरील निष्ठेचा अनोखा संगम होता. शतकभराचा समृद्ध जीवनप्रवास आणि मराठी भाषेसाठी केलेले त्यांचे अविरत कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मराठी भाषेच्या क्षेत्रातील एक समर्पित आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply