मालवणी म्हणजे मने जोडणारी बोलीभाषा : सुरेश ठाकूर

मालवण : ‘मालवणी भाषा ही मने जोडणारी आणि भेदभाव संपवणारी गोड अशी बोलीभाषा आहे. कोकण किनारपट्टीवर अजूनही मराठीच्या चौदा बोलीभाषा आहेत; पण मालवणी भाषेच्या गोडव्याने आणि प्रेमळ आदरातिथ्य संस्काराने या भाषेचा झेंडा आज भाषानगरीत डौलाने फडकत आहे,’ असे मत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि लेखक सुरेश श्यामराव ठाकूर यांनी व्यक्त केले.

अलीकडेच मालवणमधील बॅ. नाथ पै सेवांगणमध्ये बॅ. नाथ पै नगर येथे कोकणी भाषा परिषदेचे ३२वे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनातील परिसंवादात ‘कोकण किनार्‍यावरील पारंपारिक कला आणि व्यवसाय’ या विषयावर ठाकूर बोलत होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हरिश्‍चंद्र नागवेकर होते. तसेच, शैलेशचंद्र रायकरदेखील यात सहभागी झाले होते. या अधिवेशनात सर्व जण आपले विचार कोकणी भाषेतून मांडत असताना सुरेश ठाकूर यांना संयोजकांनी मालवणी बोलीतून आपले विचार मांडण्याची खास परवानगी दिली. कोकणी अधिवेशनातील परिसंवादात मालवणी भाषेचे जोरदार स्वागत झाले.

सुरेश ठाकूर यांनी पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्ट्यातील जिल्ह्यांमधील कला आणि व्यवसायांचा मालवणी भाषेतून आढावा घेतला. पारंपरिक कलांची माहिती त्यांनी दिली. नमन, खेळे, जाखडी नृत्य, शिमगोत्सव नृत्य, भजन, आरती, फुगड्या, दशावतार, चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या आदी पारंपरिक कलांचा ठाकूर यांनी आपल्या भाषणातून घेतला. कोकणातील व्यवसाय, शेती, बागायती, पर्यटन आदींचा परामर्श घेत असताना मालवणी माणसे व्यवसायात का मागे पडत आहेत, याची कारणेही त्यांनी विशद केली.

‘ह्या बोलीत प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आहे. म्हणून ही भाषा कितीही संकटे आली तरी आपले अस्तित्व टिकवून ठेवणारी आहे,’ असे उद्गार ठाकूर यांनी काढले. शैलेशचंद्र रायकर यांनी गोवा प्रदेशातील कला आणि व्यवसाय यावर आपले विचार मांडले. डॉ. हरिश्चंद्र नागवेकर यांनी मालवणी आणि कोकणी संस्कृतीचा परामर्श आपल्या अध्यक्षीय भाषणात घेतला.

कोकणी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक दामोदर मावजो या वेळी उपस्थित होते. त्यांनी सुरेश ठाकूर यांच्या मालवणी भाषेतील सादरीकरणाचे कौतुक केले. या परिसंवादाला श्रीम. उषा राणे (अध्यक्ष), गौरेश वेर्णेकर (कार्यवाह), रुजारिओ पिंटो (सदस्य), अशोक काणेकर (सदस्य) आदी अखिल भारतीय कोकणी भाषा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत अनेक मान्यवर साहित्यिक आणि रसिक उपस्थित होते.

सुरेश ठाकूर यांच्या भाषणाची एक झलक दर्शविणारा व्हिडिओ

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply