डाळपस्वारीचे दिवस

आचरा (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री देव रामेश्वर संस्थानची डाळपस्वारी दर तीन वर्षांनी येते. यंदाची डाळपस्वारी २५ फेब्रुवारी ते दोन मार्च २०२१ या कालावधीत होणार आहे. यंदाच्या डाळपस्वारीवर करोनाचे सावट असले, तरी हा उत्सव नवे चैतन्य देणारा असतो. त्या निमित्ताने, डाळपस्वारी या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाबद्दल ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला हा लेख…
…….

‘एऽऽ ठाकूर वतनदार, कौलकरी माझो, नव्या काय सांगूचा नाय! ज्याप्रमाणे तुझे वाडवडील या पाषाणावर, या मांडणेवर, या गावात आणि या बारात जसे वागळे, तसे असलेले चार तुम्ही वागा, वागल्यावर अन्न, वस्त्र, निवारा मिळून कुटुंबाचे संरक्षण होईल आणि चाकरी माझ्या पाषाणाकडे राजी होयत,’ असे चक्क मालवणी बोलीभाषेतून आपल्या ग्रामदेवतेचे, रामेश्वराच्या मांडणीचे तरंग आपल्याशी संवाद साधतात आणि क्षणार्धात आपले सर्व तन-मन रोमांचित होऊन जाते. तो परिणाम असतो ग्रामदेवतेच्या आशीर्वादाचा!

त्या एका अलौकिक आशीर्वादाने प्रत्येक आचरेवासीयाला वर्तमानाची जाण येते! भविष्याची दिशा समजते! त्या आपुलकीच्या दोन शब्दांत, आपल्या पूर्वजांबद्दल आदर, वाडवडिलांच्या सद्भावनेबद्दल जिव्हाळा, त्यांच्या प्रयत्नांबद्दल प्रेम, त्यांच्या ईश्वरनिष्ठेबद्दलची आपुलकी आपल्या तनामनात हळूहळू भिनू लागते आणि सर्वांग ‘रामेश्वर’ होते. हे तन-मन रोमांचित करणारे दिवस असतात डाळपस्वारीचे…! आचऱ्याच्या शाही डाळपस्वारीचे!!

डाळपस्वारीच्या वेळी आमच्या रामेश्वराच्या ‘मांडणीसमोर’ आरती (तळी) ठेवून जे जे भक्त नतमस्तक होतात, त्यांना देव अगदी अशाच प्रकारे चक्क त्याच्या कुटुंबाचे आडनाव घेऊन आपुलकीने हाक मारतो! चार आपुलकीचे शब्द सांगतो आणि आशीर्वाद देतो! काही वेळा ‘वतनदार’ या शब्दाऐवजी पेठकरी, कौलकरी, वृत्तीक असे मगदुराप्रमाणे शब्द बदलत असतात; पण अंतरीचा भाव मात्र तोच असतो. ते शब्द प्रत्येक ‘आचरेकर’ कानात साठवून ठेवतो! कारण प्रत्यक्षात ज्या रामेश्वर भक्तावर कठीण प्रसंगी निर्णय घेण्याची पाळी येते, त्या त्या वेळी ‘वाडवडील जसे वागले तसे असलेले चार तुम्ही वागा!’ हा बावीस अक्षरी मंत्रच जणू त्यांची विचारबुद्धी चिरंतन जागृत ठेवतो!

अलीकडे सरकारची ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना रूढ होत चालली आहे; पण त्यापूर्वी किती तरी वर्षांपूर्वीची ‘देव आपल्या दारी येतो, आपले दुःख समजावून घेतो आणि आपल्याला धीर देतो’ ही संकल्पना! आज एकविसाव्या शतकात आपणाला दिङ्मूढ करून जाते! ‘डाळपस्वारी’ हा आगळावेगळा प्रकार प्रामुख्याने दक्षिण कोकणात, मालवणी भागातच पाहायला मिळतो.

कोकणातील देव, गावरहाटीप्रमाणे दर वर्षी अगर तीन वर्षांतून एकदा आपापल्या शाही लवाजम्यासहित गावातील प्रत्येक वाडीवर (त्या त्या भागातील प्रत्येक प्रमुख देवस्थानात) जातात. त्या त्या देवस्थानचा ‘लागभाग’ (प्रसाद) त्याला अर्पण करतात. यालाच ‘डाळप’ असे म्हणतात. ‘डाळप’ करण्यासाठी देवाची जी स्वारी निघते ती ‘डाळपस्वारी!’

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्याातील आमच्या आचरे गावची ‘डाळपस्वारी’ संस्थानी थाटाची आणि अगदी आगळीवेगळी अशीच असते. आचरे गावची रामनवमी, आचरे गावची गावपळण जशी बहुचर्चित आणि सुप्रसिद्ध, तसाच आचरे गावच्या डाळपस्वारीचा नावलौकिकही सर्वत्र झालेला! ते डाळपस्वारीचे पाच दिवस आचरेवासीयांसाठी भावभक्तीने मंतरलेले असतात, सुगंधित झालेले असतात.

तरंग निघाले

डाळपस्वारीच्या वेळी संस्थान आचरे देवस्थानचे रामेश्वर, रवळनाथ, पावणाई, विठ्ठलाई आणि काळकाई देवांचे तरंग आपल्या शाही लवाजम्यासहित, ताशा-सनईच्या ताल-सुरात, वाजतगाजत, छत्र, चामर, नौबत, रणशिंगे, निशाण, अब्दागिरे, भगवे बावटे यांच्या डौलात, मृदुंगाच्या ठेक्यावर, झुलव्याच्या पावलावर समस्त गावच्या प्रजाजनांसमवेत वाडीवाडीवर डाळपस्वारीला प्रवेश करतात, त्या वेळचे ते दृश्यच मुळी स्वर्गीय असते! ‘काय त्या तरंगांची लोभस रूपे!’… रामेश्वराचा आणि रवळनाथाचा पूर्ण चांदीचा, आशीर्वादाचा हात असलेला तरंग! पावणाई देवी आणि काळकाई देवी यांचे देखणे, हसरे, मातेच्या वात्सल्याचे तरंग आणि विठ्ठलाई देवीचा मुठीच्या आकारासारखा तटस्थ आणि धीरगंभीर तरंग! आणि त्या पाच तरंगांच्या मध्ये महत्त्वपूर्ण असा ‘बाराचा पूर्वस’ अशा मांडणीचा ज्या वेळी झुलवा सुरू होतो, त्या वेळी ते वातावरण वेगळ्याच भावभक्तीने भरून गेलेले असते. ‘॥ धीं ऽऽ त धिन्ना धातिन्ना ॥ तिन्ना तिट तिन्ना ॥’ ही मृदुंगावरची वाढत जाणारी थाप आणि त्या तालावर थिरकणारी तरंगांची पावले!! ते दृश्यच मुळी नयनांना स्वर्गीय भासते.

शाही संस्थानी थाट

आचरे गावची ‘डाळपस्वारी’ साधारण दर तीन वर्षांनी येते. रामेश्वर देवाला कौल लावून संस्थान श्रीदेव रामेश्वराचे प्रमुख मानकरी मिराशी, कानविंदे, सुखटणकर, आदी बारापाच बैठक घेऊन आणि येणाऱ्या अडीअडचणींचा विचार करून डाळपस्वारीचे नियोजन करतात. संस्थानच्या राजअभिषेकींना (सरजोशी) विचारून डाळपस्वारीचा मुहूर्त निश्चित केला जातो. तो माघ शुद्ध पंचमीच्या जवळपासचा असतो. तो मुहूर्त चुकल्यास व काही अडचणी आल्यास पुढील महिन्यातील ‘पंचमी’जवळचे मुहूर्त निश्चित केले जातात. डाळपस्वारीचा मुहूर्त आणि तारीख निश्चित झाल्यावर ती बातमी क्षणात मुंबईपर्यंत पोहोचते.

वाडीवाडीवर स्वागत

कोकणातील बहुसंख्य ग्रामस्थांची कुटुंबे नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत व इतरत्र स्थायिक झाठेली आहेत. आपल्या वाडीवर देव कधी येणार, या तारखेचा अंदाज बांधून रेल्वे, आरामबस, एसटीची आरक्षणे होऊ लागतात. आपल्या ग्रामदेवतांचे तरंग, आपल्या इतर देवांसमवेत आपल्या वाडीवर, आपल्या घरी, आपल्या दारी येत आहेत या सुवार्तनेच त्यांच्याही अंगात ‘डाळपस्वारी’ संचारते आणि त्यांचे पाय गावी वळतात.

आचऱ्याच्या एकूण बारा वाड्या, देऊळवाडी, वरची चावडी, भंडारवाडी, बौद्धवाडा, काझीवाडा, गाऊडवाडी, जामडूल, पिरावाडी, हिर्लेवाडी, नागोचीवाडी, पारवाडी आणि डोंगरेवाडी! या बारा वाड्यांत ‘डोंगरेवाडी’ सोडून इतर वाड्यांत रामेश्वर देवस्थानची शाही डाळपस्वारी जाते. बहुधा पूर्वीच्या काळी ‘डोंगरेवाडी’ भागात माणसांचे वास्तव्य नसल्याने व तेथे संस्थान आचरेचे देवस्थान डाळपाचे स्थान नसल्यामुळे त्या ठिकाणी देव डाळपस्वारीसाठी जात नसावेत असे वाटते. तेथील भक्त पारवाडी व रामेश्वर मंदिर येथे आपल्या तळ्या ठेवतात.

डाळपस्वारीचा मुहूर्त ठरल्यावर ज्या वाडीवर, ज्या रस्त्याने देवाचे आगमन होणार, ते रस्ते श्रमदानाने स्वच्छ केले जातात, त्यांची डागडुजी केली जाते. त्यासाठी गावकरी लोक सढळ हस्ते तनाची आणि धनाचीदेखील मदत करतात. आपले ग्रामदैवत, आपले ग्राम, त्यावरील प्रेम कित्येक लाखांची कामे श्रमदानाने करून जाते. रस्त्यावरून देव जाणार म्हणून कमानी, तोरणे उभारली जातात. रांगोळ्यांचे सडे पडतात. आसमंत धूप-दीपमय होऊन जातो. मलयगिरीचा चंदनगंध पायवाटांनादेखील येतो, की ज्या पायवाटांना देवांची पावले लागतात.

देवांसोबत आलेल्या भाविकांसाठी वाडीवाडीवर महाप्रसाद, चहापान, गूळ-पाणी आदींची व्यवस्था मोफत केली जाते. प्रामुख्याने बाग-जामडूल, आचरे हिर्लेवाडी, आचरे पारवाडी येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांना महाप्रसाद तर असतोच; पण संपूर्ण डाळपस्वारीत दर अर्ध्या-अर्ध्या किलोमीटरवरही ‘खानपानाची’ सोय समस्त भाविकांसाठी विनामूल्य केली जाते. हे सर्व गावकऱ्यांनी आपल्याच गावकऱ्यांसाठी केलेले! माणसातच ‘देव’ मानला जातो तो हा असा.

देव डाळपस्वारीला निघण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ज्याला अक्षरशः संधिकाल म्हणतात अगर मालवणी भाषेत ‘कातरवेळ’ असेही संबोधतात, अशा वेळी रामेश्वर देवस्थानचे ‘देवतरंग’ त्याच्या जवळच असलेल्या गणपती मंदिराच्या पुढील बाजूस जाऊन गावरहाटीप्रमाणे ८४ खेड्यांचा अधिपती ‘बाराचा पूर्वस’ आणतात. त्या ठिकाणी एका कांबळ्यावर नारळ ठेवून गाऱ्हाणी होतात. त्या वेळचे वातावरण तर बरेच गंभीर आणि गूढ झालेले असते. मृदुंगांची वाढत जाणारी थाप आणि अवसरांचे सुरू होणारे जाप (गाऱ्हाणी) यांनी थोरामोठ्यांच्या अंगलाही ‘कंप’ सुटू लागतो. पूर्वी आमच्या बालपणी घरातील वडीलधारी माणसे हा सोहळा पाहण्यास आम्ही घाबरू म्हणून आम्हाला नेणे टाळायचे. अलीकडे छोट्या मुलांची आणि स्त्रियांची हा सोहळा पाहतानाची वाढलेली गर्दी आणि खेचाखेची पाहून आम्हाला त्यांचा हेवा वाटतो. असो, कालाय तस्मै नमः ।

बाराच्या पूर्वसाची घडी प्रथम मानाच्या मिराशी (वर्षिलीच्या) मानकऱ्याकडे दिली जाते. ती घडी तो घट्ट छातीशी धरून पाच तरंगांतच विलीन होतो. तुतारी निनादते, रणशिंगे फुंकली जातात. नौबत झडते, डंका दणाणू लागतो आणि पुन्हा झुलव्याच्या पावलांवर एका अनामिक ओढीने देवाचे तरंग रामेश्वर मंदिराकडे प्रयाण करतात. रामेश्वर मंदिरात पूर्व रीतीप्रमाणे सर्व गाऱ्हाणी होऊन (त्याला मालवणी भाषेत ‘जापसाल’ असे म्हणतात) देवतरंग तेथेच मंदिरात स्थिरावतात, त्या रात्रीपुरते!

दुसऱ्या दिवसापासून डाळपस्वारीचा खऱ्या अर्थाने शुभारंभ! त्या वेळी गावातील सर्व आबालवृद्ध मंदिराकडे जमतात; मात्र बाराचा ‘पूर्वस’ मिराशी मानकऱ्यांकडून घाडीवसाजवळ ‘गाऱ्हाणी’ होऊन हस्तांतरित करण्यात येतो आणि खऱ्या अर्थाने देवाच्या डाळपस्वारीला सुरुवात होते. त्या वेळी देव आपल्या गावातील सर्व प्रजाजनांसोबत डाळपस्वारीला निघतात. भाविक सर्व रस्ते रांगोळ्यांनी अलंकारित करतात. ज्या रस्त्याने देवांचे तरंग जाणार आहेत, तेथे दुतर्फा दर्शन घेणाऱ्या भाविकांची गर्दी असते. प्रत्येक वाडीवर प्रत्येकाच्या देवाला ठेवायच्या आरतीच्या (ज्याला मालवणी भाषेत ‘तळी’ असे म्हणतात) जागा ठरलेल्या असतात. देवाचे तरंग वरीलप्रमाणे (मालवणी भाषेत आपल्या मानकरी भक्तासमवेत) संवाद साधतात आणि त्यांना आगळेच बळ देतात. सर्व गावात देवाची स्वारी फिरत असताना गिरावळ मंदिर, वरची चावडी, ब्राह्मण मंदिर (गाऊडवाडी), ब्राह्मण मंदिर (हिर्लेवाडी) आदी ठिकाणी देवांचा मुक्काम त्या गावातील मंदिरात असतो. आपल्या ग्रामदेवतांचे तरंग, शाही थाटाच्या मिरवणुकीचे वातावरणच आणि गावातील सर्व पाच ते सहा हजार स्त्री-पुरुष मुले, माणसे, देवाच्या स्वारीबरोबर अख्खा गाव फिरत आहेत हे आगळे वातावरणच वेगळा बंधुभाव निर्माण करते.

आचरे जामडूलहून पिरावाडीत… होडीतून…

या डाळपस्वारीतील फुरसाई मंदिरातील प्रमुख डाळप, गिरावळ मंदिराकडील नारळाची रास पोटाळण्याचा प्रसंग, जामडूलमधून पिरावाडीत देवतरंगांचे होडीतून आगमन, शिवापूरच्या बांधावरून, माडाच्या झावळीच्या चुडीच्या प्रकाशात देवतरंगांचे त्वेषाने धावत जाऊन भक्तांना भेट देणे, तसेच ठिकठिकाणची देवतरंगांची आनंदी वृत्तीची झुलवा नृत्ये, ही केवळ प्रेक्षणीय नसून दर्शनीयही असतात.

आचरे जामडूलहून पिरावाडीत… होडीतून…

अशा प्रकारे जवळजवळ पाच दिवस प्रत्येक वाडीतील देवस्थानांना भेटी देऊन शेवटच्या रात्री देवाचे तरंग आपल्या प्रजाजनांसोबत मूळ महास्थळी, रामेश्वराच्या पिंडीच्या दर्शनासाठी जातात. त्या वेळी रामेश्वराच्या प्रांगणातील पाषाणी पापडीवरील़ तरंगाच्या गतिमान फेऱ्या, गोलाकार फिरणारी, कमळाचा आकार घेणारी निळी, लाल तरंगांची पितांबरे, डोळ्यांचे पारणे केव्हाच फेडून जातात. तरंगाच्या आणि पिंडीचा गळाभेटीचा सोहळा तर मन हेलावून टाकतो.

शेवटी श्रद्धा कशाला म्हणायचे आणि ‘अंधश्रद्धा’ म्हणजे काय, हा प्रश्न ज्या वेळी पडतो, त्या वेळी कुणाचेही आर्थिक, मानसिक, भावनिक आणि शारीरिक शोषण न करता गाव विकासासाठी पायाभूत ठरणाऱ्या ‘डाळपस्वारी’सारख्या पारंपरिक दैवी प्रथा एकविसाव्या विज्ञान शतकातही प्रत्येकाला हव्याहव्याशा वाटतात. त्याच भक्तांना धीर देतात. जगण्याचे बळ देतात.

आळंदीची ज्ञानेशाची पालखी आणि देहूची तुकोबांची पालखी दर आषाढीला पंढरीला जाते. त्यांच्यासोबत ‘थवा वैष्णवांचा’ गात-गात, नाचत आपलं दुःख विसरून स्वर्गीय सुखाच्या ओढीने चालत असतो. त्या वैष्णवांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आपल्या देवतरंगांसोबत सर्व सुख-दुःख विसरून गावात जाणाऱ्या आचरे गावच्या या शिवभक्तांच्या मुखकमलावरील समाधान, शेवटी दोन्ही सारखेच !! म्हणूनच आचरे देवस्थानात ‘शैव वैष्णवांचा’ मिलाफ वेळोवेळी झालेला आढळतो. हे सर्व पाहण्याचे भाग्य डाळपस्वारीच्याच दिवसांत लाभते!

त्या दिवसांत देवांसमवेत प्रत्येक वाडीवर प्रत्येकाचे पाय लागतात! सुखदुःखांची देवाणघेवाण होते! श्रीदेव रामेश्वराची ‘अनामिक शक्ती’ भक्ताला आगळे चैतन्य देते! कारण या डाळपस्वारीत देवांचा देव असा रामेश्वर, धवल अशा उच्च कैलासावरून पायी त्यांच्या प्रांगणात येऊन भक्तांना शक्ती देत असतो! शीलाच्या चंद्राचे दर्शन भक्तांना देत, चारित्र्याचा मार्ग सांगत असतो. ज्ञानाची गंगा मस्तकी धारण करत, संसाराचे सुखामृत पाजत असतो. यापेक्षा सुख-सुख ते काय? हा योगायोग दर तीन वर्षांनी येतो. ‘त्रिनेत्र जटाधारी मस्तकी वाहती रे गंगा’ असे ज्याचे वर्णन करतात, त्या श्रीदेव रामेश्वराचे आगळेवेगळे दर्शन या डाळपस्वारीतच दिसते! म्हणूनच डाळपस्वारीचा तो स्वर्गीय सोहळा आणि रामेश्वराच्या भक्तांच्या प्रतीक्षेची आंतरिक ओढ, जर खऱ्या अर्थाने कोणाला अनुभवायची असेल तर आचरे गावची… ‘एक तरी ‘डाळपस्वारी’ अनुभवावीच…’

  • सुरेश श्यामराव ठाकूर
    (ललित लेखक, स्तंभलेखक; कार्योपाध्यक्ष, बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण; कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष; अ. भा. साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष)
  • पत्ता : १२८, आचरे-पारवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६१४
  • मोबाइल : ९४२१२ ६३६६५
  • ई-मेल : surshyam22@gmail.com

हा लेख सुरेश ठाकूर यांच्या ‘शतदा प्रेम करावे’ या पुस्तकातील आहे. हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनाने प्रकाशित केले असून, त्याचे ई-बुक बुकगंगा डॉट कॉमवर उपलब्ध आहे. ते खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply