‘कोमसाप-मालवण’तर्फे जागतिक पुस्तक दिनी ज्येष्ठांना ग्रंथभेट

आचरा : कोकण मराठी साहित्य परिषदेची मालवण शाखा आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघ-आचरे पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आज (२३ एप्रिल) जागतिक पुस्तक दिन आचऱ्यातील यशवंत मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला. आचरे येथील ज्येष्ठ नागरिक स्नेहमेळाव्यात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी कोकणाचे नेते बॅ. नाथ पै यांची विविध चरित्रात्मक पुस्तके ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी, तसेच विविध पुरस्कारप्राप्त मान्यवरांना प्रदान केली.

या वेळी सुरेश ठाकूर म्हणाले, ‘जगप्रसिद्ध नाटककार शेक्सपियरचा जन्म २३ एप्रिल १५६४ रोजी, तर मृत्यू २३ एप्रिल १६१५ रोजी झाला. म्हणून ही दुहेरी महत्त्वाची तारीख जागतिक ग्रंथदिन म्हणून साजरी केली जाते. शेक्सपियरने जगाला उत्तमोत्तम नाटकांची भेट दिली. हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लियर, मॅक्बेथ, रोमिओ अँड जुलिएट, ज्युलियस सीझर अशा एकापेक्षा एक सरस शोकांतिका त्याने लिहिल्या. या वर्षी साहित्यरसिक बॅ. नाथ पै यांची जन्मशताब्दी. त्यांच्या सुश्राव्य भाषणात नेहमी शेक्सपियरच्या नाटकातील सुवचने यायची. त्यांचे आवडते नाटककार विल्यम शेक्सपियर. म्हणून बॅ. नाथ पै यांच्या चरित्र ग्रंथांचे वाटप आज करण्यात आले आहे.’

आदिती पै, डॉ. विद्याधर करंदीकर, शंभू बांदेकर, जयानंद मठकर, वासू देशपांडे, किशोर पवार आदी लेखकांची बॅ. नाथ पै यांच्यावर लिहिलेली पुस्तके ज्येष्ठ मान्यवरांना देण्यात आली. डॉ. सुधीर शिवेश्वरकर, चंद्रशेखर हडप, बाबाजी भिसळे, अशोक कांबळी, अरुंधती कांबळी, लक्ष्मण आचरेकर, अनिल पारकर, सुरेश गावकर, जकारीन फर्नांडिस, बाजेल फर्नांडिस, प्रकाश पुजारे, श्रीकांत सांबारी, वामन रेडकर, सुधाकर कोदे, गोपाळ खेडेकर आदी ज्येष्ठ नागरिकांना ग्रंथदान करून जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला.

‘ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी’चे जीवनगौरव पुरस्कार विजेते डॉ. सुधीर शिवेश्वरकर यांनी या अभिनव योजनेबद्दल ‘कोमसाप-मालवण’चे आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply