रत्नागिरीत विश्व संवाद केंद्रातर्फे नागरी पत्रकारिता कार्यशाळा

रत्नागिरी : मुंबईतील विश्व संवाद केंद्रातर्फे आज महाविद्यालयीन व व्यावसायिक तरुण-तरुणी यांच्याकरिता झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात नागरी पत्रकारिता कार्यशाळा झाली.

कार्यशाळेत पत्रकार सुकांत चक्रदेव, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर, सोशल मीडियासंदर्भात पत्रकार अनिकेत कोनकर यांनी मार्गदर्शन केले. प्रसारमाध्यमे (मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल) व्याप्ती, मर्यादा, समाज आणि प्रशासनावर होणारा माध्यमांचा प्रभाव, पत्रकारितेसंबंधीचे मूलभूत कायदे यावर मार्गदर्शन करण्यात आले. बातमी म्हणजे काय, बातमी शोधावी कशी, बातमी कशी लिहावी, मजकुराचे सादरीकरण यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. मोबाइलच्या माध्यमातून बातमी चित्रित कशी करावी, चित्रीकरणाचे मूलभूत तंत्र, अपलोडिंगचे ज्ञान, सोशल मीडियाचा प्रभावी वापर यासंबंधी माहिती देण्यात आली. कार्यक्रमासंदर्भात प्रमोद कोनकर यांनी माहिती दिली आणि व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे उपस्थित होते. रवींद्र भोवड यांनी स्वागत केले.

सुकांत चक्रदेव यांनी सांगितले की, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले नियतकालिक सुरू केले. प्रगतीची कास धरणारे असे त्यांचे काम होते. केसरी वर्तमानपत्र रत्नागिरीतल्या अनेक गावात येत होते. त्याचे एकादशीला देवळात जमून सामुदायिक वाचनही केले जायचे. स्वातंतत्र्य मिळवण्यासाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान केले. स्वातंत्र्य, सुराज्य मिळण्यासाठी वर्तमानपत्रांनी भूमिका बजावली. तसेच रेडिओ, वाहिन्या, मोबाइल, इंटरनेटमुळे सोशल मीडिया प्रभावीपणे काम करत आहेत. चांगल्या गोष्टी कळण्यासाठी व चुकीच्या गोष्टी जनतेसमोर आणण्याकरिता पत्रकारांनी काम केले पाहिजे. अर्थात याला कायद्याची चौकट आहे. सकारात्मक बातम्याही आल्या पाहिजेत. समाजाचे भले व्हावे यासाठी कायद्याचा पाठिंबा आहे. कृतिशीलपणे सक्रिय राहा, असे आवाहनही श्री. चक्रदेव यांनी केले.

कोकणी माणूसचे संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी सांगितले, काय, कोण, कोठे, कधी, कशाला आणि का हे मराठीतील पाच ककार किंवा इंग्लिशमधील फाइव्ह डब्ल्यू वन एच हेच कोणत्याही बातमीचे किंवा पत्रकारितेचे सूत्र असते. कुतूहल निर्माण झाले तर त्यातून प्रश्न निर्माण होतात आणि त्यातूनच पत्रकारिता होऊ शकते. बातमीचे आकलन झाले पाहिजे. विषय स्वतः समजून घेऊन इतरांना समजावून सांगता आला पाहिजे. बातम्या तर सारेच देत असतात, पण आपल्याला आपले वेगळेपण निर्माण करता आले पाहिजे आणि ते ठरविता आले पाहिजे, तरच पत्रकारिता यशस्वी पद्धतीने होऊ शकते.‌ वाचन आणि व्यासंगसुद्धा पत्रकारितेसाठी अत्यावश्यक असतो.

अनिकेत कोनकर म्हणाले की, व्यावसायिक पत्रकारिता आणि नागरी पत्रकारिता यामध्ये फरक असतो. या दोन्ही प्रकारांमध्ये डिजिटल मीडिया म्हणून काम करता येते. पण कोणत्याही पत्रकारितेमध्ये विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची असते डिजिटल माध्यमात हिट्स आणि लाइक्सचे प्रमाण अधिक असेल तर लोकप्रियता वाढते. पण त्यासाठी स्वतःची अशी ओळख या माध्यमांवर तयार करावी लागते. स्वतःला आवडणाऱ्या कोणत्याही एखाद्या किंवा अनेक विषयांवरून व्हिडिओ प्रसारित करता येतात. ट्विटर, इंस्टाग्राम, ब्लॉग, फेसबुक, वेबसाइट अशा समाजमाध्यमांद्वारे दिलेल्या बातम्या आणि लेखांना, छायाचित्रांना त्वरित सर्वत्र प्रसिद्धी मिळते. म्हणूनच त्यामध्ये विश्वासार्हता आवश्यक असते. ती निर्माण केली तर बातम्या किंवा इतर कोणत्याही मजकुराच्या प्रसाराचा वेग वाढू शकतो. त्यातून भविष्यात उत्पन्नही मिळू शकते.

प्रास्ताविक करताना ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर म्हणाले की, प्रत्येकाला पत्रकारिता येईलच असे नाही. प्रशिक्षित पत्रकारांची आवश्यकता आहे. पण नेमकी पत्रकारिता कशी आहे, याची माहिती मिळण्यासाठी आजची कार्यशाळा आहे. डिप्लोमा, डिग्री कोर्स आहे. याविषयी कुतूहल जागृत व्हावे. पत्रकारितेच्या अभ्यासाला दिशा मिळावी, पत्रकारितेची मूलभूत माहिती व्हावी, यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. स्वातंत्र्यापूर्वीची पत्रकारिता व आताची पत्रकारिता याची माहिती ठेवणे आवश्यक आहे. त्याला वेगवेगळे आयाम आहेत. बदलत जाणारा हा विषय आहे. लोकांना माहिती देणे हे महत्त्वाचे आहे. फोनवरून माहिती द्यावी लागत होती, टपालाने बातम्या पाठवल्या जायच्या, आज मोबाइल, इंटरनेटमुळे घटना क्षणात कळते. काही वेळा अफवा पसरवल्या जातात. पण नेमके कळण्यासाठी मुळाशी गेले पाहिजे. ते पत्रकारितेतून साध्य होईल. प्रबोधन करण्याचे माध्यम आहे. खरे काय आहे त्याचा शोध घेतला पाहिजे व सकारात्मक पत्रकारिता केली पाहिजे.

अमेय रायकर यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply