नौकाभ्रमण मोहिमेची रत्नागिरीत सांगता

रत्नागिरी : सेकंड महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटने आयोजित केलेल्या नौकाभ्रमण मोहिमेची आज रत्नागिरीत सांगता झाली. प्लास्टिकमुक्त सागर असा संदेश देत ही मोहीम राबविण्यात आली.

गेल्या १५ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या या मोहिमेदरम्यान भगवती बंदर, वरवडे, जयगड, तवसाळ, बोऱ्या, दाभोळ, धोपावे, अंजनवेल, वेलदूर आणि काळबादेवी या बंदरांना छात्रांनी भेट दिली. समुद्रात १७७ नॉटिकल मैल अंतर पार करण्यात आले. त्यात नेव्ही, आर्मी, एअरफोर्सच्या छात्रांचा समावेश होता. या मोहिमेचा सांगता समारंभ आज येथील भगवती जेटीवर जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत झाला. काळबादेवीतून नौका वल्हवत आणि वाऱ्याची दिशा सांभाळत आज सकाळी तीन नौका आणि ६० छात्र भगवती बंदरात दाखल झाले. त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले. यावेळी
जिल्हाधिकारी म्हणाले की, युवा वयात तुम्हाला मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग करून घ्या. यूपीएससी परीक्षा द्याल, तेव्हा अशा प्रशिक्षणाची चांगली संधी आहे. विद्यार्थ्यांनी अष्टपैलू व्हावे. तसेच आयपीएस होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. सर्व एनसीसी छात्रांचे त्यांनी अभिनंदन केले.

सेकंड महाराष्ट्र नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर के. राजेश कुमार यांनी या मोहिमेतसंदर्भातील माहिती दिली. एनसीसीचे ३५ छात्र आणि २५ विद्यार्थिनी मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. दहा दिवसांत ३० पथनाट्ये सादर करण्यात आली. सागरी लाटा आणि वाऱ्याशी सामना करत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, भरती-ओहोटी, वाऱ्याचा विचार करून नौका वल्हवत पुढे जाणे आणि समुद्रातील कोणत्याही संकटाशी सामना करण्याकरिता सज्ज राहणे यासाठी ही मोहीम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे एनसीसी छात्रांनी मनोगतामध्ये सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांना जहाजाची प्रतिकृती देऊन कमांडिंग ऑफिसर के. राजेश कुमार यांनी सन्मानित केले. बोट पुलिंगबद्दल कॅटेड कॅप्टन विवेक कोलते आणि कॅडेट सार्जंट श्रुती शुक्ला यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ढाल देऊन गौरवण्यात आले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply