रत्नागिरी : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या (मुंबई) मदतीकरिता वीररत्न बाजीप्रभू या ऐतिहासिक नाटकाचे चार खेळ रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहेत. श्री महालक्ष्मी कलामंच (मुंबई) निर्मित या नाटकाचे चार प्रयोग वेरळ, पाचल, रत्नागिरी आणि लांजा येथे होणार असून विद्यार्थी, रसिक, पालकांनी नाटकाला यावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी पत्रकार परिषदेत केले.
वेरळ येथे रविवारी (दि. १२), पाचलमध्ये १३, रत्नागिरीत १४ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात व १५ मे रोजी लांजा हायस्कूलच्या रंगमंचावर हे प्रयोग होणार आहेत.
श्री. लाड म्हणाले, की रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर वसलेल्या राजापूर-लांजा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेली राजापूर-लांजा नागरिक संघ ही संस्था विकासात्मक कामे करत आहे. संस्थेमार्फत ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, नदी जलपूजन, वृक्षारोपण, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य वाटप, दिव्यांगांना मदत, स्थानिक नववधू सन्मान, वाचनालयांना पाठबळ, ग्रामीण संस्कृतीचे जतन असे उपक्रम राबवले जातात. संघ अमृतमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. संस्थेने गेल्या दशकभरात आपल्या कामाचे स्वरूप बदलत साहित्य, शिक्षण, संस्कृती, कला, क्रीडा, आरोग्य, कृषी पर्यटन व पर्यावरण क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करत आहे. संघाच्या उपक्रमांना बळ मिळण्याकरिता वीररत्न बाजीप्रभू या ऐतिहासिक नाटकाचे खेळ आयोजित केले आहेत.
या नाटकाचे लेखन विद्याधर शिवणकर, दिग्दर्शन प्रकाश लाड यांनी केले असून, सूत्रधार संजय मांडवकर आहेत. नाटकातले कलाकार मूळचे लांजा, राजापूरमधील असून, मुंबईत नोकरी, व्यवसायानिमित्त राहतात. हे प्रयोग रत्नागिरीत करण्याकरिता सर्व कलाकार उत्सुक असल्याचे श्री. लाड यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला शौकत गोलंदाज, भार्गव घाग, दिगंबर शिंदे उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

