राज्यस्तरीय नाट्यगीत स्पर्धेत रत्नागिरीच्या तन्वी मोरेचा द्वितीय क्रमांक

रत्नागिरी : शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आयोजित केलेल्या नाट्यगीत गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या तन्वी मोरेने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहाच्या रंगमंचावर पार पडलेल्या या अंतिम फेरीत राज्यभरातील २१ स्पर्धक सहभागी झाले होते.

शतक महोत्सवानिमित्त राज्यभर ‘नाट्यकलेचा जागर’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यपद गायन, नाट्यछटा आणि नाट्य अभिवाचन अशा सहा स्पर्धांचा समावेश होता. नाट्यगीत गायन स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यभरातील एकूण २२ केंद्रांवर पार पडली होती. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची मिळून प्राथमिक फेरी रत्नागिरीत झाली. या केंद्रातून तन्वी मंगेश मोरे हिची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. ६ मे रोजी मुंबईत माटुंगा येथे अंतिम फेरी झाली. राज्यभरातील २१ स्पर्धकांच्या सहभागात ही फेरी अत्यंत चुरशीची झाली. तन्वीने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून रत्नागिरीची मोहोर उमटवली.

अंतिम फेरीकरिता ज्ञानेश पेंढारकर, शुभदा दादरकर आणि मधुवंती दांडेकर या ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध रंगकर्मी गायक कलाकारांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या वेळी सिनेकलाकार आणि नाट्यपरिषदेचे पदाधिकारी विजय गोखले, सविता मालपेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नाट्यगीत गायन स्पर्धेतील विजेत्या कलाकारांचा एक कार्यक्रम मुंबईत करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन या वेळी परीक्षक शुभदा दादरकर यांनी दिले. स्पर्धेत तन्वीसोबत सार्थक बाविकर (कोल्हापूर), रिदम पाटील (लातूर), ओंकार पाटील (कोल्हापूर), वेद मुळे (बीड), तनय नाझीरकर (पुणे), राधा ठेंगडी (नागपूर), विकास चव्हाण (अहमदनगर) यांनी यश संपादन केले.
तन्वीच्या यशाबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे समीर इंदुलकर यांनी, तसेच तिच्या गुरू विनया परब यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply