रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४४.७३ टक्के मतदानाची नोंद झाली. चिपळूण विधानसभा मतदारसंघात ४६.७२ टक्के, रत्नागिरीत ४१ टक्के, राजापुरात ४१.४८ टक्के, कणकवलीत ४६.४ टक्के, कुडाळमध्ये ४८.४४ टक्के, तर सावंतवाडीत ४५.०१ टक्के मतदान झालं. प्रामुख्याने ग्रामीण भागांमध्ये मतदानाचं प्रमाण अधिक असून, नवमतदार, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचं मतदानाचं प्रमाण उल्लेखनीय आहे.
रत्नागिरी तालुक्यातल्या खेडशी गावातल्या स्वामी स्वरूपानंद वसाहत जिल्हा परिषद शाळेत सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांनी चालवलेलं मतदान केंद्र आहे. नऊ वाजेपर्यंत या केंद्रात ६९ पुरुष आणि ४७ महिलांनी मतदान केलं. या मतदानाची टक्केवारी ११.३१ टक्के एवढी आहे. अत्यंत शांततेत मतदान सुरू असून, सर्वांचं सहकार्य मिळत आहे, असं मतदान केंद्राधिकारी श्री. अकोले यांनी सांगितलं. मतदारांना ऊन लागू नये, म्हणून केंद्राबाहेर मांडव घालण्यात आला आहे. दुपारच्या वेळेत या केंद्रावर मोठी गर्दी झाली होती.
रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक १५-दामले हायस्कूल हे शहरातलं सर्वांत मोठं केंद्र असून, इथे सात मतदान केंद्रं आहेत. इथल्या एका केंद्रावर ११ वाजेपर्यंत सुमारे २० टक्के मतदानाची नोंद झाली, अशी माहिती क्षेत्रीय अधिकारी सोनल काळे यांनी दिली. तिथे दुपारच्या वेळीही मतदारांचा उत्साह दिसत असून, रांगा लागल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातल्या बोंडीवली गावातले १०३ वर्षं वयाचे रामचंद्र मैमाजी साळवी यांनी आपला मतदानाचा हक्क केंद्रावर येऊन बजावला. तसंच, चिपळूणमधले ४५ वर्षांचे दिव्यांग नागरिक कय्युम बशीर सुर्वे यांनीही मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं.
रत्नागिरी शहरातल्या गोदूताई जांभेकर महिला विद्यालयात आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे. मतदान कक्ष सजवलेला असून, नवमतदारांचं स्वागत गुलाबपुष्प देऊन केलं जात आहे, अशी माहिती मतदान केंद्र अधिकारी श्री. मावळंकर यांनी दिली. सेल्फी काढण्यासाठी होडी तयार करण्यात आली असून, कातळशिल्पांची माहिती देणारी मोठी पोस्टर्सही लावण्यात आली आहेत. स्वाक्षरी फलकही उभारण्यात आला आहे. मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मांडवही उभारण्यात आला आहे.
रत्नागिरी तालुक्यातल्या टेंभ्ये गावात दुपारी साडेबारापर्यंत सुमारे ४२ टक्के मतदान झालं होतं. तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिक आणि त्यातही महिला मतदारांची संख्या अधिक होती, अशी माहिती मतदान केंद्र अधिकारी श्री. म्हैस्के यांनी दिली.
रत्नागिरी नगर परिषदेच्या कोकणनगर इथल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी विद्यालयातल्या एका मतदानकेंद्राचं कामकाज युवा अधिकारी आणि कर्मचारी पाहत आहेत. या केंद्रावरचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. या केंद्रावर सर्व वयोगटातले मतदार असले, तरी त्यात बहुतांश प्रमाण युवा मतदारांचं आहे. सकाळ नऊनंतर इथे मतदारांची गर्दी वाढली अशी माहिती मतदान केंद्र अधिकारी स्वप्नील नेटके यांनी दिली.
रत्नागिरी तालुक्यातल्या कुरतडे या गावात मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. या गावात दुपारी एक वाजेपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. त्यातही महिलांचं प्रमाण अधिक आहे.
अनेक केंद्रांवर नवमतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केलं आणि इतरांनाही मतदानाचं आवाहन केलं.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि त्यांच्या पत्नी सौम्यश्री यांनी रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक १५-दामले हायस्कूल इथल्या मतदान केंद्रावर रांगेत उभं राहून मतदान केलं.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी रत्नागिरी शहरातल्या रा. भा. शिर्के प्रशाला मतदान केंद्रावर मतदान केलं.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक ५-परटवणे इथल्या मतदान केंद्रावर मतदान केलं.










कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

