Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

ॲड. दीपक पटवर्धन सहकार क्षेत्रात राज्याला दीपस्तंभ : अतुल काळसेकर

Advertisements

रत्नागिरी : ॲड. दीपक पटवर्धन महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रासाठी दीपस्तंभ आहेत, असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी काढले.

पतसंस्था राज्य फेडरेशनच्या कार्याध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली. त्यानिमित्ताने स्वामी स्वरूपानंद पतसंस्था आणि दक्षिण रत्नागिरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री. काळसेकर अध्यक्षपदावरून बोलत होते. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

श्री. काळसेकर म्हणाले की,पतसंस्था राज्य फेडरेशनच्या कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड होणे ही कोकणातील सहकार क्षेत्रातील अभिमानाची गोष्ट असून हा कोकणाचा सन्मान आहे. पटवर्धन म्हणजे सहकार क्षेत्रातील कायदेशीर बाबींची सर्व माहिती असणारे अभ्यासू नेतृत्व आहे. पतसंस्थांच्या वसुलीसाठी राज्य फेडरेशनने विशेष पुढाकार घेऊन त्यासाठी योग्य धोरण आणणे गरजेचे आहे. त्यासाठी ॲड. पटवर्धन यांनी जास्त लक्ष द्यावे.

व्यासपीठावर स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे, द. रत्नागिरी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर,रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष थेराडे,जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, राजापूर भाजपा तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, लांजा भाजपा तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर, संगमेश्वर भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, रत्नागिरी भाजपा तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, भाजपा शहराध्यक्ष सचिन करमरकर, खारवी समाज पतसंस्था अध्यक्ष संतोष पावरी, देवरूखच्या नगराध्यक्षा सौ. मृणाली शेट्ये, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी उपस्थित होते.

ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी निवडून आलेले नवनियुक्त सरपंच अमर रहाटे (धामणसे), श्रीकांत मांडवकर (पिरंदवणे), लक्ष्मण सारंग (गावडे आंबेरे), नीलेश लोंढे (फणसवणे), तन्वी कोकजे (निवळी) यांचा कमळ सन्मान देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र स्टेट मिनी ऑलिंपिकमध्ये यश संपादन केलेल्या तनया महेश मिलके (रौप्य पदक), आर्यन प्रशांत घडशी (रौप्य पदक), निपुण सचिन लांजेकर (कास्य पदक), करण महेश मिलके (कास्यपदक) यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ॲड. पटवर्धन म्हणाले की, काम करत असताना आपले मागे कोण उभे आहे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. राज्य फेडरेशनच्या निवडणुकीची व्याप्ती खूप मोठी होती, परंतु रत्नागिरीतील सर्व पतसंस्थांनी खूप मोलाची मदत केली. सहकारमहर्षी कै. गोविंदराव निकम यांनी रत्नागिरी मध्यवर्ती बँकेत जे मोलाचे मार्गदर्शन केले, ते माझ्या जीवनातील सहकार क्षेत्रातील टर्निंग पॉइंट ठरले. राजकारण आणि सहकार या क्षेत्रात काम करताना योग्य अंतर ठेवून काम करणे गरजेचे आहे. राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्षपद ही मोठी जबाबदारी असून सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने वेगळ्या उंचीवर जाऊ, असा विश्वास ॲड. पटवर्धन यांनी व्यक्त केला.

यावेळी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे संचालक जयप्रकाश पाखरे, सरपंच अमर रहाटे, श्रीकांत मांडवकर, जिल्हा फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष थेराडे, नगर वाचनालयाचे चंद्रशेखर पटवर्धन, मुन्ना खामकर, सचिन वहाळकर, संतोष पावरी, राजापूर कुणबी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी मनोगत व्यक्त केले.

समारंभालाल जिल्ह्यातील पतसंस्थांचे प्रमुख, सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक नगर वाचनालयाचे आनंद पाटणकर, तर आभार प्रदर्शन स्वामी स्वरूपानंद पतपेढीचे व्यवस्थापक मोहन बापट यांनी केले.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version