रत्नागिरी : यापुढील काळात कुरतडे गावासारख्या ग्रामीण भागात तंत्रशिक्षण आणि संगणक शिक्षणावर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली.
कुरतडे (ता. रत्नागिरी) येथील कुरतडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श हायस्कूलचा रौप्यमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. रौप्यमहोत्सवानिमित्ताने दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन समारंभाला संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती प्रभाकर आंबर्डेकर, हरचिरी पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेंद्र झापडेकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. देवयानी झापडेकर, कुरतडे गावच्या सरपंच सौ. रहाटे तसेचे संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते. विश्वस्त सौ. मृदुला वैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महेंद्र झापडेकर यांनी संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
रौप्यमहोत्सवाची आठवण म्हणून संस्था आणि प्रशालेची माहिती असणाऱ्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. पहिल्या दिवशी माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा घेण्यात आला. संध्याकाळच्या सत्रात शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. शाळेच्या २५ वर्षांच्या वाटचालीमध्ये ज्या ज्या व्यक्तींचे संस्थेला आणि शाळेला हस्ते परहस्ते सहकार्य लाभले, त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रौप्यमहोत्सवाकरिता दिनदर्शिकेतील जाहिरातींकरिता देणगी उपलब्ध करून देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्रशालेत कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी श्रीसत्यनारायणाची पूजा झाली, तर सायंकाळी माजी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पार पडले.

असे आहे कुरतडे येथील आदर्श हायस्कूल
रत्नागिरीपासून २५ किलोमीटर अंतरावर डोंगरमाथ्यावर असलेल्या दुर्गम कुरतडे गावात प्रभाकरकाका आंबर्डेकर यांनी कुरतडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना ३ ऑक्टोबर १९९८ रोजी करून मुंबईत त्याची नोंदणी केली. कुरतडे पंचक्रोशी तसेच हरचिरी, आगवे, मांडवकरबाडी, चांदोर, बागपाटोळे, तोणदे, भाटकरकोंड, कीरबाग, डुगवे, खंडकरकोंड इत्यादी गावांचे सर्वेक्षण करून आढावा घेण्यात आला. संकलित माहितीनुसार परिसरातील सातवीनंतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी होती. त्यामुळे तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण घेता यावे, या उद्देशाने आदर्श हायस्कूल सुरू करण्यात आले. शाळेत आठवी आणि नववीच्या वर्गांना १९९९ साली मान्यता मिळाली आणि २००१ साली ४४ विद्यार्थ्यांची दहावीची पहिली तुकडी परीक्षेला बसली. सुरुवातीपासूनच शाळेने दहावीचा निकाल चढता ठेवला आहे. गेल्या वर्षी शाळेचा निकाल १०० टक्के लागला. शाळा ग्रामीण भागात असली तरी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शैक्षिणक सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या शाळेत आठवी ते दहावीपर्यंतचे १०७ शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये ५५ विद्यार्थिनी आहेत. तीन वर्गांकरिता मुख्याध्यापकांसह पाच शिक्षक, एक क्लार्क, दोन शिपाई कार्यरत आहेत. शाळेभोवती सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे.
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही शालेने उल्लेखनीय यश मिळविले आहे. प्रशालेला प्रशस्त क्रीडांगण असल्यामुळे मैदानी खेळ तसेच इनडोअर गेमही शिकवले जातात. शाळेचे विद्यार्थी सतत तीन वर्षे कुस्ती स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आठवीपासूनच संगणकाची ओळख होण्याच्या दृष्टीने शाळेत संगणक कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये विद्यार्थी संगणकाचे ज्ञान घेतात. विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांच्यासाठी मोफत जादा तासिका घेतल्या जातात. शिष्यवृत्ती आणि दहावी मार्गदर्शन तसेच व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. हस्तकला, क्राफ्ट, चित्रकला, बाठा कलम बांधणी इत्यादी स्वयंरोजगारावर आधारित उपक्रमांची शिबिरे घेण्यात येतात.
भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी शाळेत वेगवेगळे उपक्रम, सण, उत्सव साजरे केले जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता जास्तीतजास्त प्रयत्न केला जातो. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडामहोत्सव, शिबिरे, शैक्षिणक सहलीचे आयोजन केले जाते. सामाजिक बांधिलकी जपण्याकरिता संस्थेतर्फे महिला मेळावे, हळदीकुंकु समारंभ, शेतकरी मेळावे, माजी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केले जाते. वेळोवेळी वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये ग्रामस्थ आणि पालकांचा सहभाग असतो.
शाळेच्या भरघोस यशामध्ये संस्था सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. अध्यक्षा श्रीमती ज्योती प्रभाकर आंबडेकर यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असते. त्यामुळे प्रभाकर काकांनी लावलेल्या या आदर्श हायस्कूलरूपी रोपट्याने रौप्यमहोत्सवी वर्षात सहज पदार्पण केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

