देशविघातक शक्तींचा मुकाबला करण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची : राज्यपाल रमेश बैस

मुंबई : माध्यम क्रांतीच्या आजच्या युगात पारंपरिक माध्यमांपेक्षा प्रभावी मत परिवर्तक, व्हिडिओ ब्लॉगर्स व खासगी चॅनेल्सद्वारे निर्मित बातम्या व विश्लेषण पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. योग्य माहितीच्या आधारे अपप्रचारांचा सर्व माध्यमांतून मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. या दृष्टीने माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज (३ मे २०२३) मुंबईत केले.

मुंबईच्या विश्व संवाद केंद्राच्या वतीने २००१पासून दर वर्षी देण्यात येणारे देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते राजभवनातील दरबार हॉल येथे समारंभपूर्वक देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राज्यपालांच्या हस्ते मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व समाजमाध्यम क्षेत्रातील १० पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक बाळकृष्ण ऊर्फ प्रमोद कोनकर यांना ज्येष्ठ पत्रकार सन्मान देऊन गौरवण्यात आले. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

‘मी १९७८ मध्ये नगरसेवक झालो. तिथपासून आजपर्यंतच्या काळात माध्यम क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. पूर्वी चहासोबत वृत्तपत्र वाचल्याशिवाय लोकांची दिवसाची सुरुवात होत नसे. आज माध्यमबाहुल्याच्या युगातदेखील मुद्रित माध्यमांचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे, त्यामुळे मुद्रित माध्यमे संपणार नाहीत. वृत्तपत्रे समकालीन घटनांचे अभिलेख असतात व पुढे त्याचेच रूपांतर इतिहासात होते,’ असे राज्यपालांनी सांगितले.

ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वापरल्या जाणाऱ्या अयोग्य भाषेबद्दल चिंता व्यक्त करून विद्यार्थी व युवकांच्या हाती योग्य व सुरक्षित मजकूर पडले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. ‘सत्य एक असते व सुजाण लोक ते वेगवेगळ्या दृष्टींनी पाहतात,’ या वचनाचा संदर्भ देताना ‘आजकाल बातम्यांना अनेक रंगांची आवरणे असतात, त्यामुळे सत्य शोधणे कठीण जाते,’ अशी टिप्पणी राज्यपालांनी केली.

प्रमोद कोनकर यांच्यासह दैनिक सकाळचे राजकीय प्रहसन लेखक प्रवीण टोकेकर, दीपक पळसुले, टाइम्स ऑफ इंडियाचे वैभव पुरंदरे, नीलेश खरे, जयंती वागधरे, यू ट्यूबर अनय जोगळेकर, लेखक अंशुल पांडे व समाजमाध्यम क्षेत्रातील निनाद पाटील व हृषीकेश प्रफुल्ल मगर यांना या वेळी पुरस्कार देण्यात आले. हृषीकेश मगर हेही रत्नागिरीतीलच आहेत.

’विश्व संवाद केंद्राने २५व्या वर्षात पदार्पण केले असून आजवर ७४ पत्रकारांना सन्मानित केले असल्याचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी सांगितले. विश्वस्त निशिथ भांडारकर यांनी प्रास्ताविक केले. अनय जोगळेकर व प्रवीण टोकेकर यांनी पुरस्कार विजेत्यांच्या वतीने सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाला इस्रायलचे मुंबईतील वाणिज्य दूत कोब्बी शोशानी, तसेच माध्यम क्षेत्रातील निमंत्रित आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

गेली ४४ वर्षे पत्रकारितेमध्ये असलेले श्री. कोनकर रत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक, आकाशवाणी आणि हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेचे रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी आहेत.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply