‘आस्था’मध्ये रविवारी श्रवणदोष असणाऱ्या बालकांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर

रत्नागिरी : येथील आस्था सोशल फाउंडेशनतर्फे येत्या रविवारी (दि. १८ जून) श्रवणदोष असणाऱ्या बालकांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मोफत मार्गदर्शक शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

रत्नागिरीतील आस्था सोशल फाउंडेशन ही दिव्यांगांसाठी समर्पित संस्था आहे. संस्थेतर्फे जन्मतः श्रवणदोष असणाऱ्या, ऐकण्याचा त्रास असलेल्या किंवा अस्पष्ट बोलणाऱ्या, बोलताना अडचण येणाऱ्या अशा सर्व बालकांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मोफत मार्गदर्शक शिबिर होणार आहे.

रत्नागिरीत मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या आवारात आस्था थेरपी सेंटरमध्ये सकाळी ११ ते ४ या वेळेत हे शिबिर होणार आहे. शिबिरात पवई (मुंबई) येथील डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटलमधील प्रसिद्ध कान नाक घसा सर्जन डॉ. काश्मीरा चव्हाण लहान मुलांची तपासणी करणार आहेत. त्यांना आवश्यक असणाऱ्या संदर्भ सेवा देऊन त्यांच्या पालकांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. ऑडिओलॉजिस्ट श्रीमती प्राजक्ता भोगटे यादेखील मुलांच्या बोलण्यासंदर्भातील समस्यांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिराला येताना पालकांनी मुलांचे पूर्वतपासणी केलेले रिपोर्ट सोबत आणावेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोणतेही श्रवण आणि वाचादोष असलेले बालक उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, लवकरात लवकर योग्य निदान होऊन बालके आवश्यक उपचारानंतर मुख्य प्रवाहात यावे, यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे, असे आस्था दिव्यांग हेल्पलाइनचे प्रमुख समन्वयक आणि स्पीच थेरपिस्ट संकेत चाळके यांनी सांगितले.

जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी त्यांच्या संपर्कातील अशा बालकांच्या पालकांना या शिबिराची माहिती द्यावी, असे आवाहन आस्थाच्या सचिव आणि प्रकल्प संचालक श्रीमती सुरेखा पाथरे यांनी केले आहे.

शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून पालकांनी १० ते ६ या वेळत फोन करून ९८३३३५७५०६ किंवा ९८३४४४०२०० या क्रमांकावर नोंदणी करावी.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply