ग्रंथतुलेने ऐश्वर्यसंपन्न ठरलेला विवाह सोहळा

दागदागिने आणि ऐश्वर्याच्या प्रदर्शनाने नव्हे, तर ग्रंथतुलेने झालेला ऐश्वर्यसंपन्न विवाह सोहळा मनाला मोठी उमेद देऊन गेला.
……

मानवी जीवनात विवाह संस्काराला फार मोठे महत्त्व आहे. विवाहाचा मूलभूत हेतू म्हणजे संयमित आणि समतोल जीवन जगणे असा आहे. विश्वबंधुत्वाचा विचार करता एका माणसाने दुसऱ्या माणसावर, एका समाजाने दुसऱ्या समाजावर, एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर बंधुभावाने प्रेम केले पाहिजे, अशी भगवंताची शिकवण आहे. ही शिकवण केवळ मनुष्यप्राण्यापुरतीच मर्यादित नसून, सर्व जीवसृष्टीस लागू आहे. या बंधुभावाची सुरुवात खऱ्या अर्थाने विवाहाच्या संस्काराने दोन जीव जेव्हा एकत्र येतात, तेव्हापासूनच होते आणि म्हणूनच मानवी जीवनात विवाहास फार महत्त्वाचे स्थान आहे.मानवी जीवनात विवाह संस्काराला फार मोठे महत्त्व आहे. विवाहाचा मूलभूत हेतू म्हणजे संयमित आणि समतोल जीवन जगणे असा आहे. विश्वबंधुत्वाचा विचार करता एका माणसाने दुसऱ्या माणसावर, एका समाजाने दुसऱ्या समाजावर, एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर बंधुभावाने प्रेम केले पाहिजे, अशी भगवंताची शिकवण आहे. ही शिकवण केवळ मनुष्यप्राण्यापुरतीच मर्यादित नसून, सर्व जीवसृष्टीस लागू आहे. या बंधुभावाची सुरुवात खऱ्या अर्थाने विवाहाच्या संस्काराने दोन जीव जेव्हा एकत्र येतात, तेव्हापासूनच होते आणि म्हणूनच मानवी जीवनात विवाहास फार महत्त्वाचे स्थान आहे.

काळानुरूप जात, धर्म, पंथ यापेक्षा सामाजिक आर्थिक स्थिती यानुसार विवाहाचे स्वरूप बदलत आहे. पूर्वी आठ-दहा दिवस चालणारा लग्न सोहळा आता काही तासांतच उरकला जात आहे. या सर्व गोष्टी विषयावर सविस्तरपणे बोलता-लिहिता येईल.

लग्न म्हणजे जीवनातला मोठा आनंद सोहळा असला तरी त्यातील मानापमान, देणे-घेणे, पंगती हा विषय गमतीदार असतो. कळत्या वयापासून विविध समाजातील आणि स्वतः मी माझ्या समाजात धम्म संस्कार करत असल्याने यातील विविध अनुभव गमतीजमती अनुभवल्या आहेत. गरीब, सर्वसामान्य, मध्यवर्गीय ते उच्चभ्रू लोकांचे विवाह भव्य मांडव, हॉल आणि थ्री स्टार, फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पाहिले आहेत. जो तो ऐपतीप्रमाणे खर्चाचा देखावा करतो. विवाहपत्रिकेत भांड्यांचा आहेर नको, पुष्पगुच्छ नकोत, अशा सूचना हल्ली वाचायला मिळतात. समाजात आर्थिक स्थैर्य वाढत असल्याने पैशाचा आहेर नको, तुमच्या शुभेच्छा, उपस्थिती हाच आहेर असेही लिहिण्याचे प्रमाण वाढते आहे. पण या सगळ्यापेक्षाही मला आलेल्या एका लग्नपत्रिकेत चक्क, पुस्तकाचा आहेर द्या आम्ही वधूची ग्रंथतुला करून ती सर्व पुस्तके वाचनालयाला भेट देणार आहोत, अशी टीप वाचून आश्चर्यासह आनंद वाटला.

वाचनसंस्कृती लोप पावत आहे. लोकांनी ग्रंथालयात यावे, ग्रंथालय टिकल पाहिजे, केवळ पैसे, वर्गणी न देता आपण वाचलेली, नको असलेली पुस्तके लग्नाला येताना घेऊन या आम्हाला द्या आम्ही जिथे गरज आहे तिथे स्वतः देऊ, असे जेव्हा एखादा वधूपिता लग्नाच्या पत्रिकेत लिहितो, तेव्हा त्या पित्याचा अभिमान वाटतो. समाजाने खरेच आदर्श घ्यावा, स्वतः कार्यवाही करावी, अशीच ही घटना आहे.

माझे मित्र, मला ज्येष्ठ बंधूसमान असणारे ग्रंथ चळवळीतील एक प्रख्यात नाव चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे माजी अध्यक्ष, चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील सांस्कृतिक, साहित्य, कला क्षेत्रातील एक अग्रेसर नाव, विविध पुरस्कारप्राप्त कवी, साहित्यिक, बोली भाषेचे अभ्यासक अरुण गजानन इंगवले आणि आम्हा मित्रपरिवारातील सर्वांचे अरुणदादा यांची द्वितीय कन्या प्रज्ञा हिचा विवाह सोहळा सोमवारी, १२ जून २०२३ रोजी चिपळूण खेंड बायपासरोडजवळील संत शिरमणी नामदेव महाराज सभागृहात अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. रीतिरिवाजानुसार लग्नाचे धार्मिक विधी झाले. लग्नात नाचगाणी, गडबड गोंधळ जास्त असतोच. इथे तसे काहीच नव्हते. आलेले नातेवाईक, मित्तरमंडळी यांच्या हातात वस्तू, पाकिटाऐवजी पुस्तकांचे गठ्ठे होते. स्टेजवर फुलांच्या हारांनी सजविलेल्या भल्यामोठ्या तराजूत प्रथम वधूची ग्रंथतुला झाली. या कार्यक्रमाचे उत्तम निवेदन पत्रकार गडकिल्ले अभ्यासक लेखक धीरज वाटेकर, शाहीर प्रा. प्रदीप मोहिते यांनी केले.

सर्वप्रथम ग्रंथ, साहित्य, सांस्कृतिक, कला चळवळीतील प्रकाशजी देशपांडे यांनी, नंतर दादांचे चुलते, काकी, बहिणी, भाऊ, मेव्हणे, साडू, स्वतः दादा, सर्व नातेवाईक, डॉ. रेखाताई देशपांडे, प्रा. संतोष गोनबरे, ओक सर उभयता आम्ही वाचनालयामधील सर्व कार्यकर्ते, कर्मचारी यांनी एका पारड्यात पुस्तके ठेवली. आधी वधूची ग्रंथतुला झाली. भली मोठी रांग. मग वराची ग्रंथतुला. तरीही तेवढीच पुस्तके शिल्लक राहिली. मग ती पुस्तके स्टेजवर एका ओळीत गठ्ठ्यांनी ठेवण्यात आली. लोक त्यासोबत सेल्फी, फोटो काढत होते. स्टेजवर सर्वत्र पुस्तके, अरुणदादांचे नातेवाईक, मी, दादांचे दापोलीतील साडू प्रा. डॉ. महाडिक सर अशा सर्वांनी पुस्तकांचे व्यवस्थित गठ्ठे बांधले. काही वऱ्हाडी मंडळींना, छोट्या मुलांना गंमत वाटत होती.

एक वयोवृद्ध आजोबा सर्व पुस्तके न्याहाळीत होते. मी दोन मोठे ग्रंथ त्यांच्या हातात दिले. बाबा, तुम्ही हे घरी नेऊन वाचा, म्हटले. त्यांना खूपच आनंद झाला. काहींनी मला ही नवीन पद्धत कुठली, असे विचारले. एवढी पुस्तके यजमान कुठे ठेवणार, अशीही विचारणा झाली. मी म्हटले, बदलापूर (जि. ठाणे) येथील पाणवठा फाउंडेशन संचालित माऊली वाचनालयाला ही सर्व पुस्तके देणार आहेत. तसे पत्रिकेत लिहिले आहे. या पत्रिकेत स्वामी समर्थ यांच्या तैलचित्राचा फोटो आहे. तो फोटो वर चि. गणेश कळसकर यांनी काढला आहे. ते स्वतः चित्रकार, शिल्पकार आहेत, ते स्वतः गणेश कला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत. वधू प्रज्ञा दिल्लीत नॅशनल म्युझियममध्ये म्युझियालॉजीमध्ये मास्टर डिग्री करतेय. तिथे देशभरातून निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. महाराष्ट्रातून तिची निवड झाली आहे. पाचवीपर्यंत चिपळूणच्या परांजपे हायस्कूलमध्ये, पुढे बारावीपर्यंत पुण्यातील राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत मोठी प्राजक्ता आणि प्रज्ञा या बहिणींनी शिक्षण घेतले. नंतर पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात प्रज्ञा शिकली. दादांच्या या दोन्ही मुली शांत, संयमी आणि अभ्यासात हुशार आहेत.

अरुणदादा आणि वहिनींनी अतिशय दूरदृष्टीने आपल्या मुलींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. खूपच कष्ट, धावपळ केली. दादांना त्यांचे आईबाबा आणि पत्नी नसल्याचे मोठे दुःख आहे. पण ते उरात लपवून दादांची मुलींसाठी, त्यांच्या सुखासाठी धडपड सुरू आहे. मुलींची आई नसताना त्यांची लग्ने जुळवून त्यात कुठलीही उणीव न ठेवता आपले सर्व नातेवाईक, बहिणी, मेव्हणे, वहिनींच्या माहेरचे नातेवाईक यांच्या सहकार्याने पार पाडली. याचा मी एक साक्षीदार आहे. दादांची नि माझी गेल्या २८-२९ वर्षांची मैत्री. पण ती केवळ मैत्री न राहता कौटुंबिक बंधुत्वाचे संबंध निर्माण झाले आहेत. प्राजक्ता, प्रज्ञा, चिन्मयी आम्हा उभयतांच्या लाडक्या, माझा चिरंजीव डॉ. राजरत्नवर दादा-वहिनीची तेवढीच माया.

दादांचे पुस्तकप्रेम, वाचनवेड मला आणि आमच्या मित्रमंडळींमध्ये परिचित आहे. पुण्यामुंबईत कोठे संमेलनाला गेल्यावर येताना कमीत कमी पाच हजाराची, तर काही वेळा अगदी पंधरा-वीस हजारांची पुस्तके त्यांनी गाडीखर्च खिशात ठेवून आणली आहेत आणि वाचलेली शेकडो पुस्तके अनेक मित्रमंडळी आणि वाचनालयांना भेट दिली आहेत.

वाचनालयाच्या अनेक उपक्रमांमध्ये दादांच्या संकल्पनांचा विचार केला जातो. वाचन, ग्रंथ चळवळीत सातत्याने सक्रिय असलेला कार्यकर्ता पुस्तके, वाचन याचाच विचार करणार ना? एखादी गोष्ट प्रसिद्धीसाठी करणे आणि मनापासून करणे यात फरक असतो. फोटो, प्रसिद्धीपासून दादा दूर राहत असले तरी दादांसोबत वाचन, लेखन चळवळीत वावरणाऱ्या माझ्यासह अनेक जणांनी, लग्नात वायफळ खर्च करणाऱ्या व्यक्तींनी त्यांचा ग्रंथतुलाचा आदर्श घ्यायलाच हवा.

लग्न सोहळा, भोजन, ग्रंथतुला, हॉलवरची आवराआवर, प्रज्ञाला सासरी (चौसाळा, ता. जि. बीड) येथे जाण्यासाठी गाडी सुरू होईपर्यंत मी सर्व पाहत होतो. अत्यंत भावनिक क्षण, सर्वांचे डोळे पाणावलेले, दादांची घालमेल, डोळ्यांत अश्रू. मला म्हणाले, बघा ना राष्ट्रपाल, मुलं कधी मोठी होतात, आपण किती कष्ट करतो आणि अशी भर्रकन दुसऱ्याच्या घरी जातात!

खरेच आहे. असा खंबीर बाप जेव्हा आई आणि बापाची भूमिका यशस्वी निभावतो, तेव्हा माझ्यासारख्याकडे शब्दच नसतात. अनेक अडचणी, प्रसंगात दादा धीरोदात्तपणे वागत आले. म्हणूनच त्यांनी आपली सर्व दुःखे विसरून आदर्श लग्न सोहळा, वधूवराची ग्रंथतुला, आहेराची पुस्तके ग्रंथालयाला भेट देण्याचा चांगला उपक्रम राबविला. कारण पुस्तके जीवनाला नवी आशा नि जगण्याला नवी दिशा देतात, हे उत्तम वाचक असणाऱ्या दादांनी ओळखले, जाणले आहे. मी त्यांचे मनस्वी अभिनंदन करतो आणि चि. सौ. प्रज्ञा आणि चि. गणेश यांना त्यांच्या, ग्रंथतुलेने ऐश्वर्यसंपन्न ठरलेल्या विवाहानिमित्त सुखी संसार आणि यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा देतो.

  • राष्ट्रपाल भा. सावंत, चिपळूण
    (संपर्क ९४०३१४४३५६)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply