रत्नागिरी : येथील ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक बाळासाहेब पाटणकर यांना ज्ञान फाउंडेशनचा लोकनेते भाई वैद्य स्मृति गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २४ जून रोजी पुण्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
श्री. पाटणकर यांनी पीटीआय वृत्तसंस्थेसाठी अनेक वर्षे बातमीदार म्हणून काम केले. रत्नागिरी टाइम्स दैनिकातील इस्लामी जगत या त्यांच्या सदरामधील संकलित लेखांचे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे. श्री. पाटणकर यांनी सामाजिक क्षेत्रातही काम केले असून रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
कुर्डूवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे यांनाही पत्रकारिता पुरस्कारार्थी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. श्री. पाटणकर आणि श्री. कोरे यांच्या पुरस्कारांचे वितरण माजी साहित्य संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते केले जाणार असून यावेळी आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य आणि पुणे महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्वर्गीय भाई वैद्य यांच्या जयंतीनिमित्ताने शनिवार, २४ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातील नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते आणि सचिव सौ. अर्चना मुंद्रा यांनी केले आहे.
………
भाई वैद्य लिहितात …
बाळासाहेब पाटणकर यांना ज्यांच्या नावे पुरस्कार दिला जाणार आहे, त्याच भाई वैद्य यांनी श्री. पाटणकर यांच्या इस्लामी जगत या पुस्तकाविषयी आपल्या मृत्यूपूर्वी प्रस्तावना लिहिली आहे, हा एक योगायोग आहे.
भाई वैद्य यांनी लिहिले आहे,

रत्नागिरी टाइम्समधून बाळासाहेब पाटणकर यांनी दर शुक्रवारी ‘इस्लामी जगत ‘या सदरामध्ये सातत्याने २५ वर्षे लिखाण केले. हा एक विक्रमच मानावा लागेल. त्यांचे सदर अत्यंत लोकप्रिय होते. माझ्या अंदाजानुसार, या सदराखाली त्यांनी हजार-बाराशे तरी लेख लिहिलेले असावेत. त्यातील निवडक १०० लेखांचे पुस्तक प्रकाशित होत आहे, ही गोष्ट फार मोलाची आहे.
‘इस्लामी जगत’ या पुस्तकामध्ये राजकारणावर २० लेख आहेत. या लेखांमध्ये त्यांनी डॉ. राममनोहर लोहिया, एस. एम. जोशी इत्यादी समाजवादी नेत्यांबाबत भरभरून लिहिले आहे. त्यांनी चले जाव चळवळीचीही दखल घेतलेली आहे. धार्मिक प्रश्नावरील १६ लेखांमध्ये शबे मेराज, कुराण इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन केलेले असून या विषयांवरील त्यांची पकड जबर असल्याचे ध्यानी येते. या लेखनामध्ये त्यांनी जे कुराण आणि अनेक ग्रंथांमधील विविध संदर्भ दिले आहेत, त्यावरून धार्मिक आणि अन्य ग्रंथांवरील त्यांचे प्रभुत्वही ध्यानी येते. राष्ट्रीय एकात्मतेवरील त्यांचे १० लेख असून त्या विषयावरील त्यांचा आग्रह अत्यंत जोरकस आणि महत्त्वाचा आहे. भारतीय संविधानाबद्दल त्यांचा आदरभाव जात-धर्मापलीकडील असून बावनकशी आहे.
Follow Kokan Media on Social Media

