महावितरण कर्मचाऱ्यांचा मध्यरात्री ‘प्रकाश’जागर

रत्नागिरी : महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री ‘प्रकाश’जागर करून रत्नागिरी शहरातील सुमारे ३५ हजार वीजग्राहकांची खंडित झालेली सेवा पूर्ववत करून दिली.

मध्यरात्री विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती करणारे महावितरणचे कर्मचारी

गेल्या १३ जूनच्या रात्रीची सुमारे साडेनऊची वेळ.. रत्नागिरीच्या हार्बर उपकेंद्राला विद्युतपुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवर बिघाड झाला. रत्नागिरी शहराला विद्युत पुरवठा करणारी दोन उपकेंद्रे बंद पडली. शहरातील सुमारे ३५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. याबाबतची सूचना उपकेंद्रातील यंत्रचालकाने तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना दिली. तात्पुरती उपाययोजना करून रत्नागिरी शहर शाखाधिकारी कौस्तुभ वासावे यांनी पर्यायी विद्युत वाहिनीद्वारे २० मिनिटांच्या आत बाधित वीजपुरवठा पूर्ववत करून ग्राहकांना दिलासा दिला. मात्र हा वीजपुरवठा वारंवार चालू-बंद होत होता. त्यामुळे बिघाड शोधून दुरुस्ती करणे भाग होते.

श्री. वासावे यांनी सहकारी जनमित्रांना घेऊन ३३ केव्ही विद्युत वाहिनीवरील बिघाड शोधण्यासाठी रात्रीची गस्त सुरू केली. अंधार, मुसळधार पाऊस अशा परिस्थितीत वीज कर्मचाऱ्यांची रत्नागिरीतील खालची आळी भागात हार्बर उपकेंद्र ते कुवारबाव उपकेंद्र या ३३ केव्ही विद्युत वाहिनीची पाहणी करण्यात आली. रात्रीची वेळ व कमी मनुष्यबळ असल्याने त्यांनी एमआयडीसी शाखाधिकारी गणेश पखवाने आणि शिरगाव शाखाधिकारी राम बोबडे यांना कळविताच ते सहकारी जनमित्रांसह कार्यस्थळी दाखल झाले. या शोधकार्यात क्रांतीनगरजवळील विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. बिघाड सापडला, मात्र दोन वाहिन्या एकाच खांबावर असल्याने तो दुरूस्त करण्यासाठी शिरगाव उपकेंद्राचा विद्युत पुरवठा बंद करावा लागणार होता. शिवाय १३ मीटर उंचीचा वीजखांब, त्यावर चढून काम करणे कठीण होते. अशा विपरीत परिस्थितीत ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची जाणीव ठेवणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांनी, जनमित्रांनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसायचेच नाही, असा निर्धार केला. रात्री साडेबारा वाजता दुरुस्तीचे काम सुरू झाले. वीज खांबावर चढलेल्या रूपेश लांबे आणि त्यांना साह्य करणाऱ्या मुकुंद चितळे या जनमित्रांना शाखाधिकारी सूचना देत होते. त्यातच ग्राहकांच्या फोनला उत्तर देत होते. रवी विटकर, सत्यजित सणगरे हे जनमित्र मदतीला होते.

अखेर नादुरुस्त पिन इन्सुलेटर बदलून रात्री सव्वा वाजता तिन्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला अन् ३५ हजार ग्राहकांच्या घरात पुन्हा उजेड आला. उजेड पुन्हा मिळवून देणाऱ्या या वीज कर्मचाऱ्यांवर ग्राहकांकडून कौतुकाचा वर्षाव झाला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply