रत्नागिरी : कोकणाचे बाबा आमटे अशी ओळख निर्माण केलेले कुडाळचे संदीप परब यांच्याशी गोळप कट्टाच्या ४४ व्या कार्यक्रमात शनिवारी, १७ जून २०२३ रोजी संवाद साधला जाणार आहे.
श्री. परब सामाजिक कार्यकर्ते आहेत. गावात प्राथमिक शिक्षण झाल्यावर ते मुंबईत नशीब अजमावण्यासाठी गेले. तेथे मोटारी धुण्यासारखी कामे आणि इतर अनेक नोकऱ्या त्यांनी केल्या. नोकरी करत असताना त्यांनी समाजसेवेची पदवी घेतली. नंतर मुंबईतील भिकारी, निराधार, वृद्ध, रोगी, मनोरुग्ण यांची भयंकर स्थिती पाहून ते व्यथित झाले. त्यातून त्यांनी जीवन आनंद आश्रम संस्थेची स्थापना केली आणि गेली २० वर्षे अशा अनेक निराधारांची सेवा करत आहेत. निराधारांना आधार द्यावा असा विचार करणारे, निराधार, वृद्ध यांच्यासाठी शासन दरबारी झगडणारे, मुंबई, गोवा, कुडाळ येथे निराधार, रोगी, वृद्ध, मनोरुग्ण यांच्यासाठी आश्रम चालवणारे श्री. परब यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. पणदूर येथील त्यांच्या जीवन आनंद आश्रमात सध्या १९४ निराधार आहेत. आजपर्यंत सुमारे ४५० हून अधिक निराधार, रोगी, मनोरुग्णांना त्यांनी आधार दिला आहे. निराधार लोकांसाठी त्यांनी आयुष्य वाहून घेतले आहे. हितचिंतक आणि देणगीदार यांच्या मदतीवर आश्रमाचा खर्च ते चालवतात.
गोळप कट्टा कार्यक्रमात श्री. परब आपला आणि संस्थेचा प्रवास उलगडणार आहेत. त्यानंतर प्रश्नोत्तरे होतील. कार्यक्रम संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेत सुरू होईल. गोळप येथील पाटणकर कार्यालयात होणार असलेल्या या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गोळप कट्टातर्फे
अविनाश काळे (९४२२३७२२१२) यांनी केले आहे.
श्री. परब यांच्या आश्रमातील लोकांची सेवा हितचिंतकांच्या मदतीवरच सुरू असल्यामुळृ कार्यक्रमानंतर ज्यांना आश्रमासाठी कोणत्याही प्रकारची मदत करायची असेल, त्यांच्याकडून आश्रमासाठी जुने स्वच्छ कपडे, भांडी, धान्य, कडधान्ये, मसाले, आर्थिक मदत इत्यादी कोणत्याही स्वरूपात आणि कोणत्याही प्रमाणात स्वीकारली जाईल. संस्थेला 80G प्रमाणपत्र असल्याने आर्थिक देणगीदारांना आयकरात सूट मिळेल. शक्य असेल त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media

