चिपळूण : चिपळूण येथे विद्याभारतीच्या सरस्वती विद्यामंदिर या शिशुवाटिकेमध्ये संस्कृतभारतीच्या संस्कृत बालकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाचा संस्कृत विभाग, भाषा अध्ययन केंद्र आणि विद्याभारती या संस्थांच्या सहकार्याने हे संस्कृत बालकेंद्र सुरू करण्यात आले आहे.
उद्घाटनाच्या कार्यक्रमात विद्याभारतीच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक म्हटले. डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख डॉ. सौ. माधवी जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संस्कृतला महत्त्व दिलेले असल्याने आणि लहान मुलांमध्ये भाषाग्रहणक्षमता अधिक असल्यामुळे लहान वयात मुलांना संस्कृत शिकवले पाहिजे. विद्याभारतीच्या प्रमुख सौ. छाया मुसळे यांनी बालकेंद्र सुरू करण्याची आपली अनेक दिवसांची इच्छा पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
विद्याभारतीच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जान्हवी टाकळे यांनी चिपळूणला असे बालकेंद्र आवश्यक होते, असे सांगितले. बालकेंद्राच्या शिक्षिका गायत्री पोंक्षे यांनी मुलांची आणि संस्कृतची आवड असल्याने बालकेंद्राचे काम करण्याची उत्सुकता दर्शविली. संस्कृतभारती संस्थेने प्रशिक्षणाची व्यवस्था करून बालकेंद्र चालवण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या मनोगतात बालकेंद्राच्या प्रमुख शिक्षिका सौ. स्मिता सरदेसाई यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी युनायटेड इंग्लिश स्कूल आणि गुरुकुलाच्या संस्कृत शिक्षिका सौ. दुहिता जोशी, विद्याभारती प्राथमिक शाळेच्या श्रीमती जाधव, श्रीमती कदम मॅडम, श्री. गुणिजन आदी उपस्थित होते.
विद्याभारतीच्या प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना संस्कृतभारतीच्या संस्कृतं वदतु या पुस्तिकेचे वाटप डीबीजे महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि संस्कृतभारती कार्यकर्ता आयुष आगवेकरने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांभवी पोंक्षे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शांतिमंत्राने झाली.
संस्कृत बालकेंद्र दर रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत सरस्वती विद्यामंदिर, विद्याभारती शिशुवाटिका, परशुरामनगर येथे येत्या रविवारपासून सुरू होत आहे. तेथील नावनोंदणीसाठी सौ. स्मिता सरदेसाई (9011475207) आणि डॉ. सौ. माधवी जोशी (9975165842) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

